Dr. Chandrasekhar Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Erosion : मातीची धूप-धोका निर्देशांक

Team Agrowon

डॉ. चंद्रशेखर पवार , डॉ. सतीश पाटील

Soil Erosion Index : नैसर्गिक प्रक्रियेसोबतच मानवी हस्तक्षेपामुळे जगभरामध्येच जमिनीची धूपेची तीव्रता आणि पर्यायाने जमिनीची हानी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मातीच्या धूपेचे सर्वसाधारणपणे सालकाढी (Sheet), ओघळपाडी (Rill) व घळपाडी (Gully) व हवेमुळे (Wind) होणारी धूप असे काही प्रकार पडतात. भारतामध्ये एकूण भौगोलिक क्षेत्रातील उपजाऊ, बिगर उपजाऊ जमिनीपैकी १२०.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्र वेगवेगळ्या कारणांनी बाधित आहेत. त्यातील ८२.६ दशलक्ष हेक्टर क्षेत्र (६८.४ टक्के) हे केवळ पाण्यामुळे होणाऱ्या धूपेमुळे आहे.

या ६८.४ टक्के क्षेत्रापैकी ४९ टक्के क्षेत्रामध्ये माती वाहून जाण्याचा हेक्टरी दर १० टन प्रतिवर्ष यापेक्षा अधिक आहे. देशामध्ये ५.११ अब्ज टन इतके मातीचे वहन होते. त्यापैकी ३४.१ टक्के माती ही धरणांमध्ये गाळाच्या स्वरूपात साठली जाते. २३ टक्के माती समुद्रामध्ये वाहून जाते. जवळपास ४३ टक्के माती आपली मूळची जागा बदलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते. जमिनीच्या या धूपेमुळे देशामध्ये धरणांमधील पाणीसाठा क्षमता प्रति वर्ष १.२ टक्क्याने कमी होत आहे.

(यासाठी ४९३७ मोठ्या धरणातील पाणलोट क्षेत्रातील माती वहन होण्याचा दर लक्षात घेतला आहे.) या समस्येमुळे धरणांचे सरासरी २५ वर्षे (सरासरी ८ ते ५३ वर्षे कालखंड) आयुष्य कमी होते, असे भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या डेहराडून (उत्तराखंड) येथील भारतीय मृदा व जलसंवर्धन केंद्राच्या अभ्यासातून पुढे आले आहे. देशातील या समस्येसंदर्भात पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापनामध्ये अत्यंत काळजीपूर्वक काम करण्याची गरज संस्थेने व्यक्त केली आहे. आपल्या भागातील मातीचा धूप-धोका निर्देशांक (Soil Erosion Risk Index, SERI) तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्याचे सूत्र आणि अधिक माहिती या लेखातून घेऊ.

माती धूपेची समस्या

मातीच्या धूपेची समस्या महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपात आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १८ टक्के क्षेत्रात मध्यम ते अधिक स्वरूपात मातीची धूप होत असल्याचे राष्ट्रीय कृषी परिषदेने नमूद केले आहे. या धूपेमुळे अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये तृणधान्य, कडधान्य, तेलबिया व डाळवर्गीय पिकांचे वार्षिक १५ टक्के नुकसान होते. त्याचा एकूण अन्नधान्य उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. भारतामध्ये केवळ पाण्यामुळे होणाऱ्या धूपेमुळे २७ अवर्षण प्रवण क्षेत्रातील तृणधान्य तेलबिया व डाळवर्गीय पिकांचे सर्वसाधारण नुकसान १३.४ दशलक्ष टन इतके होते. त्याची २०१४ -१५ या वर्षासाठी एकत्रित किंमत रु. २९,२०० कोटी इतकी आहे. ( शारदा यांचा अहवाल, २०१६).

पाण्यामुळे होणाऱ्या धूपेतून अन्नद्रव्यांचे वहन होते. नत्र, स्फुरद, पालाश व गंधक यांचे अनुक्रमे ४.९१ ते ९.६१, ०.३८७ ते २.३१, ४.४३ आणि १.२७ ते १.६५ दशलक्ष टन इतके आहे. या पोषणद्रव्याच्या वहनाद्वारे होणाऱ्या नाशाचा आर्थिक हिशोब काढला तर देशामध्ये अनुक्रमे रु. १३,५०० ते २९,३००, रु.१,८५० ते ८,३२०, रु. १७,३०० आणि रु. ५,८९० ते ७,७९० कोटी इतका २०२० च्या बाजारभावाप्रमाणे निघतो. (शारदा व ओजस्वी, २०२० यांचा अहवाल)

पाण्यामुळे होणाऱ्या मातीच्या धूपेमुळे देशामध्ये ११५ दशलक्ष टन प्रति वर्ष सेंद्रिय कर्बाचे चलन वलन (displacement) होते. त्यातून ३४.६ दशलक्ष टन प्रति वर्ष कार्बन हा अवकाशामध्ये सोडला जातो.

या प्रकारच्या धूपेवर नियंत्रण मिळविल्यास १९ ते २७ दशलक्ष टन प्रति वर्ष कार्बनचे उत्सर्जन कमी होऊ शकेल. (मंडल यांचा अहवाल, २०२०). म्हणजेच माती आणि पाणी यांच्या जपवणूकीसोबतच पर्यावरणासाठीही पाणलोट क्षेत्र विकास व व्यवस्थापनाचे महत्त्व आपल्या लक्षात येईल.

महाराष्ट्रातील विशेषतः घाट व कोकणात मातीच्या धूपेची समस्या अतिशय तीव्र आहे. मातीची धूप या समस्येचा परिणाम केवळ मानवी आयुष्यावरच होतो, असे नाही तर पर्यावरणीय नैसर्गिक परिसंस्था, सागरी परिसंस्था, नदी परिसंस्था अशा अनेक घटकांवर होत असतो. भूपृष्ठावरून वाहून जाणारी मातीतील नैसर्गिक मूलद्रव्ये /पोषणद्रव्ये समुद्रात जात असल्याने तेथील अन्नसाखळीवर विपरीत परिणाम होतो. विशेषतः अशा पाण्यामध्ये सर्वात मोठे भक्षक (उदा. व्हेल मासे, शार्क मासे इ.) फार काळ जिवंत राहू शकत नाहीत. अर्थात, याबाबत अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

शाश्वत विकासाच्या संकल्पनांमध्ये माणसांच्या भावी पिढ्यासोबतच पर्यावरण आणि निसर्गाचा विकासही अंतर्भूत करण्याची आवश्यकता यातून व्यक्त होते. आजच्या पिढीने त्यासाठी मनापासून काम करण्याची गरज आहे.

मातीचा धूप-धोका निर्देशांक(SERI) = n

∑ एकसंध पाणलोट क्षेत्रातील वाहून जाणाऱ्या मातीचा प्रमाणित दर (टन प्रति हेक्टर प्रति वर्ष)

i = १

--------------------------------------------

n

∑ एकसंध पाणलोट क्षेत्रातील सद्यःस्थितीतील वाहून जाणाऱ्या मातीचा दर (टन प्रति हेक्टर प्रति वर्ष)

i = १

या सूत्राप्रमाणे आपणास देशातील कोणत्याही पाणलोट क्षेत्रातील वाहून जाणाऱ्या मातीच्या धूपेचे प्रमाण प्रमाण काढता येते. यासाठी, त्या त्या पाणलोट क्षेत्रातील वाहून जाणाऱ्या मातीचा प्रमाणित दर व सद्यःस्थितीतील वाहून जाणाऱ्या मातीचा दर (टन प्रति हेक्टर) माहिती असावा लागतो. मृदा व जल संवर्धन केंद्र (डेहराडून) यांनी महाराष्ट्रासाठी ठरवून दिलेला प्रमाणित माती वाहून जाण्याचा दर हा ४.२ टन ते ११.२ टन (सरासरी ८ टन) प्रति हेक्टर प्रति वर्ष असा आहे. (ICAR अहवाल, २०२३)

हा निर्देशांक कसा काढायचा, हे एका उदाहरणातून पाहू.

एका एकसंध पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे १२ टन प्रति हेक्टरी प्रतिवर्ष इतका मातीचा वाहून जाण्याचा दर आहे. मात्र त्या क्षेत्रासाठी प्रमाणित दर आठ टन प्रति हेक्टरी प्रतिवर्षी इतका आहे, तर वरील सूत्रानुसार या निर्देशांकांची किंमत ०.६६ इतकी येते. या निर्देशांकांची किंमत शून्य ते एक यादरम्यान कितीही येऊ शकते. ही किंमत शुन्यापेक्षा जास्त आली, याचा अर्थ असा निघतो की या ठिकाणाहून वाहून जाणाऱ्या मातीचे प्रमाण धोकादायक स्थितीमध्ये आहे. त्यासाठी मूलस्थानी संरक्षणाची आवश्यकता आहे.

वरील सूत्रामध्ये ही माहिती टाकल्यानंतर,

८ टन माती प्रति हेक्टर प्रति वर्ष

मातीचा धूप-धोका निर्देशांक (SERI) =

१२ टन माती प्रति हेक्टर प्रति वर्ष

मातीचा धूप-धोका निर्देशांक (SERI) = ०.६६

राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेने देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी माती वाहून जाण्याचे प्रमाणित दर काढलेले आहेत. सद्यःस्थितीमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (Geographical Information System, GIS) मुळे याची अद्ययावत माहिती तालुका व जिल्हास्तरीय कृषी कार्यालयांमधून उपलब्ध होऊ शकते. पाणलोट विकास व व्यवस्थापनाच्या सामाईक मार्गदर्शक सूचना -२००८ नुसार देशामध्ये कार्यरत असणाऱ्या शासकीय, बिगर शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना केंद्र शासनाने भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. याचे उदाहरण म्हणून कृष्णा नदीच्या ३४ क्रमांकाच्या पाणलोटाची माहिती पाहू.

तक्ता : भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर करून कृष्णा नदीच्या ३४ क्रमांकाच्या पाणलोट होणारी मातीची धूप

अ.क्र. मातीच्या धूपेची वर्गवारी क्षेत्र

(वर्ग कि.मी.) मातीवहन दर

(प्रति हेक्टर प्रतिवर्ष)

१. अल्प १४४.७९२ ०.४- १०.००

२. कमी ३९.६४८ १०.००- २०.००

३. मध्यम ६२.२५९ २०.०१- ३२.००

४. अधिक २०.०५४ ३२.००- १००

एकूण पाणलोट क्षेत्र २६६.७५३

कृष्णा नदीच्या ३४ क्रमांकाच्या पाणलोटामध्ये आम्ही अभ्यासादरम्यान भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर मातीचा वाहून जाणारा दर काढण्यासाठी केला. त्यानुसार या पाणलोट क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र २६६.७५ वर्ग किलोमीटर आहे. त्यापैकी १४४.७९ भौगोलिक क्षेत्रात सरासरी प्रतिवर्षी माती वाहून जाण्याचा दर चार टन ते दहा टन प्रति हेक्टर प्रति वर्ष यादरम्यान मिळाला. हे प्रमाण प्रमाणित दरापेक्षा खूपच अधिक आहे. सुमारे ४० वर्ग किलोमीटर भौगोलिक क्षेत्रात कमी प्रमाणात (Moderate) म्हणजेच दहा ते वीस टन माती वहन प्रति हेक्टर प्रतिवर्ष मिळाला. ६२ वर्ग किलोमीटर भौगोलिक क्षेत्रांमध्ये मध्यम (Medium) स्वरूपात म्हणजेच २० टन ते ३२ टन माती वहन प्रति हेक्टर प्रतिवर्ष मिळाला. उर्वरित २० वर्ग किलोमीटर क्षेत्रामध्ये खूप जास्त (High) प्रमाणामध्ये म्हणजेच सरासरी ३२ टन ते १०० टन माती वहन प्रति हेक्टरी प्रतिवर्षी इतका मिळाला.

जमिनीची धूप (मातीचे वहन) होण्यासाठी मातीची खोली, मातीचा प्रकार, पाणी मुरण्याची क्षमता, मातीची घनता, सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, त्या जमिनीचा उतार असे अनेक घटक कारणीभूत ठरतात. याशिवाय पाणलोट क्षेत्रामधील हवामान, आर्द्रता, सूर्यप्रकाशाची होणारी उपलब्धता, उपलब्ध पर्जन्य, जमिनीतील भौगोलिक, रासायनिक, जैविक घटकांचे चलन -वलन यासह अनेक प्रक्रिया महत्त्वाच्या ठरतात. सामान्यतः जमिनीची धूप काढण्यासाठी सुधारित वैश्विक माती धूप सूत्र ( Revised Universal Soil Loss Equation, RUSLE) वापरले जाते. या सूत्रासाठी एखाद्या पाणलोट क्षेत्रामध्ये मिळणारे पर्जन्यमान (R), मातीची धूप (K), उताराची लांबी (LS ), आच्छादन व्यवस्थापन (C) आणि संवर्धन पद्धती (P) इ. निर्देशांकांची माहिती असणे गरजेचे असते.

डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (इंदिरा महाविद्यालय, ताथवडे, पुणे.),

डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT