Soil Nutrient Index : मातीतील पोषणद्रव्यांचा निर्देशांक

Soil Management : मातीतील पोषणद्रव्यांचा निर्देशांक याबाबतची माहिती या लेखातून पाहुयात.
Soil Management
Soil ManagementAgrowon

डॉ. चंद्रशेखर पवार, डॉ. सतीश पाटील

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांमध्ये जलसंधारणाचे उपचार झाल्यानंतर उपजाऊ जमिनीवर कमीत कमी किंवा शून्य मशागत पद्धतीचा अवलंब, बांधबंदिस्ती, गवताळ बांध किंवा नैसर्गिक आच्छादन या माध्यमातून मातीची धूप थांबवली जाते.

पिकामध्ये शक्य तिथे जमिनीवर आच्छादन, शेणखत, एकात्मिक पोषणद्रव्य व्यवस्थापन, आंतरपिके किंवा मिश्र पिके यांच्या माध्यमातून देखील मातीची धूप थांबवता येते. यातून मातीमध्ये सेंद्रिय कर्ब आणि एकूणच पोषणद्रव्यांमध्ये वाढ होते.

त्याचा फायदा पिकांची उत्पादकता वाढण्यामध्ये होतो. म्हणूनच पाणलोट विकास व्यवस्थापनाचा महत्त्वाचा घटक म्हणून जमिनीमधील पोषणद्रव्यांमध्ये झालेला बदल महत्त्वाचा ठरतो. त्याचे मापन करण्यासाठी मातीतील पोषणद्रव्यांचा निर्देशांक (Soil Nutrient Index, SNI) अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

तक्ता क्रमांक १- पोषणद्रव्यांची सर्वसाधारण वर्गवारी

सेंद्रिय कर्ब --- नत्र --- स्फुरद --- पालाश

कमी उत्पादकता (<०.५ टक्के) --- कमी उत्पादकता (<२५०किलो प्रति हेक्टर) --- कमी उत्पादकता (<११ किलो प्रति हेक्टर) --- कमी उत्पादकता (<१२० किलो प्रति हेक्टर)

मध्यम उत्पादकता (०.५ टक्के- ०.७५ टक्के) --- मध्यम उत्पादकता (२५० - ५०० किलो प्रति हेक्टर) --- मध्यम उत्पादकता (११ - २५ किलो प्रति हेक्टर) --- मध्यम उत्पादकता (१२०-२८० किलो प्रति हेक्टर)

उच्च उत्पादकता (> ०.७५ टक्के) --- उच्च उत्पादकता (>५०० किलो प्रति हेक्टर) --- उच्च उत्पादकता (>२५ किलो प्रति हेक्टर) --- उच्च उत्पादकता अन्य (>२८० किलो प्रति हेक्टर)

(स्रोत : व्ही. एन. शारदा आणि अन्य, इंडियन जर्नल ऑफ सॉइल कॉन्झर्व्हेशन, २०१२ पान १-१२)

पाणलोट क्षेत्र उपचारानंतर जमिनीवरून वाहणारे पाणी (अपधाव) अडविले जात असल्यामुळे मातीतील आर्द्रता वाढते. या आर्द्रतेमुळे हजारो सूक्ष्म जैव प्रक्रिया नैसर्गिकरीत्या कार्यान्वित होतात.

त्याचा एकूण परिणाम पोषणद्रव्याच्या वाढीवर होतो. त्यास थोडीशी रासायनिक खतांची जोड दिल्यास आणखी फायदा दिसून येतो. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे, ही खूप क्लिष्ट व वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्याच प्रमाणे पिकांची उत्पादकता संपूर्ण मातीतील पोषणद्रव्यांवर अवलंबून आहे. मातीतील पोषणद्रव्यांचा निर्देशांकाबाबत या लेखामध्ये माहिती घेऊ.

Nl+२Nm+३Nh

मातीतील पोषणद्रव्यांचा निर्देशांक (SNI) = -------- भागिले -----------------

Nl+Nm+Nh

या सूत्रामध्ये एन म्हणजे मातीचे नमुने l (low) म्हणजे पोषणद्रव्यांची कमी उपलब्धता, m (medium) म्हणजे पोषणद्रव्यांची मध्यम उपलब्धता, h (high) म्हणजे पोषणद्रव्यांची भरपूर उपलब्धता. त्यास भागिले त्या गावात तपासलेले एकूण नमुने. (म्हणजेच शंभर नमुने.)

उदा.

वरील सूत्राप्रमाणे एखाद्या गावामध्ये आपण एकूण शंभर मातीचे नमुने तपासले असे गृहीत धरू.

कोणत्याही शासकीय, बिगर शासकीय किंवा स्वयंसेवी संस्था/ यंत्रणांनी पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रम राबविण्यापूर्वी पायाभूत स्थिती (बेंच मार्क) जाणून घेण्यासाठी म्हणून प्रकल्पपूर्व परिस्थितीमध्ये मातीच्या नमुन्यांचे परीक्षण करून घेतले पाहिजे. कारण प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर त्याचे यश तपासण्यासाठी प्रकल्प पश्चात पुन्हा माती परीक्षण करून पोषण द्रव्यांच्या वाढीबाबत आपण शहानिशा करू शकतो.

Soil Management
Soil Nutrient Management : चुनखडीयुक्त जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन कसे करणार?

तक्ता क्र. १

अ.क्र.. --- पोषणद्रव्यांची वर्गवारी --- प्रकल्प पूर्व माती नमुने संख्या (१००) --- अ.क्र. --- पोषणद्रव्यांची वर्गवारी --- प्रकल्प पश्चात माती नमुने संख्या (१००)

१ --- कमी उपलब्धता (l) --- ३५ --- १ --- कमी उपलब्धता (l) --- २०

२ --- मध्यम उपलब्धता(m) --- ४० --- २ --- मध्यम उपलब्धता(m) --- २०

३ --- भरपूर उपलब्धता(h) --- २५ --- ३ --- भरपूर उपलब्धता (h) --- ६०

मातीतील पोषणद्रव्यांचा निर्देशांक --- १.९ (वरील सूत्राप्रमाणे) --- मातीतील पोषणद्रव्यांचा निर्देशांक --- २.४ (वरील सूत्राप्रमाणे)

माती परीक्षणानुसार उपलब्ध झालेल्या किमती आपण वरील सूत्रामध्ये भरल्यानंतर खालील तक्त्याप्रमाणे निष्कर्ष मिळतात. या निर्देशांकाची किंमत १ ते ३ या दरम्यान कितीही येऊ शकते. जेवढी जास्त किंमत तेवढी मातीत पोषणद्रव्यांची उपलब्धता अधिक.

तुलनात्मक तक्ता क्र. २

प्रकल्पपूर्व माती नमुने संख्या

SNI = ३५ + (२ × ४०) + (३ × २५) / १००

= ३५ + ८० + ७५ / १००

= १९० / १००

= १.९

प्रकल्प पश्चात माती नमुने संख्या

SNI = २० + (२ × २०) + (३ × ६०) / १००

= २० + ४० + १८० / १००

= २४० / १००

= २.४

माती नमुन्याचा विश्‍लेषण अहवाल-

शेतकरी नाव - प्रीती सचिन चौधरी, मु. पो निजामपूर (टा) ताल, आर्वी, जि. वर्धा.

नमुना क्रमांक. १४५ (सर्वे नंबर १४८/१)

सौ. प्रीती चौधरी या महिला शेतकरी असून, त्यांनी गावातील १३ महिलांना एकत्र करत ‘प्रेरणा महिला बचत गट’ सुरू केला. या महिला गटाने पाणी फाउंडेशनने २०२३ मध्ये आयोजित केलेल्या ‘फार्मर कप’ स्पर्धेमध्ये भाग घेतला. तत्पूर्वी त्यांनी गट शेती, शेतीमध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांची पेरणी व व्यवस्थापन, पीक उत्पादकता वाढ इ. बाबत प्रशिक्षण घेतले.

त्यानुसार या सर्व महिलांनी आपल्या शेतात उताराला आडवी नांगरणी करणे, पूर्ण कुजलेले शेणखत माती आड करणे, पिकांच्या दोन ओळी व दोन रोपांमधील योग्य अंतर यांचा अवलंब व्यवस्थापनामध्ये केला. महत्त्वाचे म्हणजे माती परीक्षण करून घेतले. (त्याचा अहवाल म्हणजेच तक्ता क्रमांक ३.) पूर्वी या महिलांना कपाशीचे सरासरी प्रति एकरी उत्पादन केवळ पाच ते सहा क्विंटल निघत असे.

या संपूर्ण प्रशिक्षण व क्षमता बांधणीमुळे त्याच शेतातील आजचे उत्पादन १२ ते १३ क्विंटल प्रति एकरपर्यंत (म्हणजेच जवळपास दुप्पट) पोहोचले आहे. या महिला शेतकरी गटाला फार्मर कप स्पर्धेत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला आहे. मातीतील पोषणद्रव्यांचे वाढलेली उपलब्धता या सर्व प्रक्रियेमध्ये महत्त्वाची ठरली.

Soil Management
Soil Nutrient : जमिनीतील अन्नद्रव्यांचा उपसा, पुरवठा यामधील तफावत कमी करावी

तक्ता क्रमांक ३

अ.क्र. --- मातीचे गुणधर्म --- निष्कर्ष --- परिणाम

१ --- सामू --- ७.६६ --- सर्वसाधारण (पिकास मानवणारे)

२ --- क्षारता (मिलि मोहज) --- ०.७८ --- सर्वसाधारण

३ --- सेंद्रिय कर्ब (टक्के) --- ०.२३ --- कमी

४ --- नत्र (किलो प्रति हेक्टर) --- १७६ --- कमी

५ --- स्फुरद (किलो प्रति हेक्टर) --- २३ --- कमी

६ --- पालाश (किलो प्रति हेक्टर) --- ४८१ --- अत्यंत भरपूर

पिकाचे नाव --- नत्र (किलो प्रति हेक्टर) --- स्फुरद (किलो प्रति हेक्टर) --- पालाश (किलो प्रति हेक्टर)

कपाशी : कोरडवाहू (बीटी)

विद्यापीठ शिफारस मात्रा --- ६० --- ३० --- ३०

निष्कर्षानुसार शिफारस --- ७५ --- ३७.५ --- १५

रासायनिक खत --- युरिया --- सुपर फॉस्फेट --- म्युरेट ऑफ पोटॅश

प्रमाण (किलो प्रति हेक्टर) --- १६३ --- २३४ --- २५

पिकाचे नाव- सोयाबीन

विद्यापीठ शिफारस मात्रा --- ३० --- ६० --- ३०

निष्कर्षानुसार शिफारस --- ३७.५ --- ७५ --- १५

रासायनिक खत --- युरिया --- सुपर फॉस्फेट --- म्युरेट ऑफ पोटॅश

प्रमाण (किलो प्रति हेक्टर) --- ८१ --- ४६९ --- २५

(डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सेलूसरा ता. जि. वर्धा यांचा अहवाल, २०२२-२३ )

प्रेरणा शेती महिला गटातील अन्य सदस्या सौ. विमल भांगे यांना सोयाबीनचे उत्पादन १३ क्विंटल मिळाले. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी तेवढ्याच क्षेत्रात त्यांना जेमतेम पाच ते सहा क्विंटल सोयाबीन निघत होते. याचा सरळ अर्थ असा निघतो की जमिनीची आरोग्य पत्रिका पीक उत्पादनासाठी महत्त्वाची आहे.

पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमांमध्ये अशा एकात्मिक व्यवस्थापनाच्या पद्धतींचा अंतर्भाव करणे सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. पिकांसाठी खतांच्या मात्रा वापरताना कृषी विद्यापीठांच्या पीकनिहाय शिफारशीमध्ये आपल्या मातीतील उपलब्ध पोषणद्रव्यांच्या प्रमाणानुसार योग्य ते बदल करून वापरल्या पाहिजेत.

त्याचा निश्चित फायदा होतो. या शेती गटातील महिलांनी आपल्या शेतातील मातीचे नमुने तपासून ज्या पोषणद्रव्यांची कमतरता आहे, अशा पोषणद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची मदत घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रासायनिक खते व सेंद्रिय खते याचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळेच उत्पादकता वाढलेली दिसली.

हिवरेबाजार सारख्या अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावामध्ये पाणलोट व्यवस्थापनामुळे उन्हाळ्यातील चौथे पीकही घेणे शक्य झाले असल्याचे पोपटराव पवार मोठ्या पोटतिडकीने सांगत असतात. अशाच प्रकारच्या पीक उत्पादन वाढीच्या अनेक यशोगाथा आंध्र प्रदेश मधील कोतापल्ली, कर्नाटक मधील गोंतामार या गावांच्या रूपाने समोर आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com