Water Management Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : गाळ अन् वाळू पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

डॉ. नागेश टेकाळे

Water Management Update : अमृतासमान पाण्याचे मोल जाणून, त्याचे व्यवस्थापन करणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते. पुराणामध्ये सांगितलेल्या कथेमध्ये सागर मंथनातून अमृताचा कलश बाहेर आला आणि तो प्राप्त करण्यासाठी देव आणि दानवांमध्ये भांडण सुरू झाले.

या झटापटीत त्या कलशामधील अमृताचे थेंब अनेक ठिकाणी पडत गेले. हे थेंब जिथे पडले, तिथे आजही कुंभमेळे भरतात. म्हणजे कधीकाळी पुराणात पडलेल्या दोन चार अमृताच्या थेंबाना आजही आपण एवढा मान देतो, पण आपल्या सभोवती असलेल्या अमृतासमान पाण्याकडे दुर्लक्ष करतो, ही किती खेदजनक बाब.

विविध यंत्रे आणि विद्युत ऊर्जेच्या साह्याने खोल भूगर्भामधील हे जलरूपी अमृत आपण बाहेर काढतो. ते काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करत बोअरवेलची खोली वाढवत जातो आणि किती इंच पाणी लागले याची फुशारकी मारत राहतो.

यामध्ये पाण्याचा उत्तम व काटेकोर वापरासंदर्भात आपण एकमेकांशी स्पर्धा करत नाही. पाण्याच्या अयोग्य वापरामुळे जमिनीच्या वाळवंटीकरणाकडे आपला प्रवास सुरू झाला आहे. पुराणकाळातील देव आणि दैत्य या दोघांनाही अमृताचे मोल कळले होते.

आम्हा माणसांना जलरूपी अमृत मुबलक मिळाल्यामुळे मोल कळत नाही, ही स्थिती आहे. मात्र या दुर्लक्षामुळे माणसांचे भवितव्यच धोक्यात येत चालले आहे. पाणी व्यवस्थापन हा आजचा कळीचा मुद्दा ठरत आहे.

जल व्यवस्थापनामध्ये दोन मुख्य प्रकारचे पाणी येते, पावसाचे पडणारे पाणी आणि भूगर्भामधील उपसा होणारे पाणी. पावसाचे पाणी व्यवस्थापनामध्ये आपण अज्ञानी असून जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत कोसळणाऱ्या मॉन्सूनच्या पावसातील ९० टक्के पाणी वाहून जाते.

जे दहा टक्के पाणी साठलेले दिसते ते तलाव, धरणे, विहिरी, बंधारे यात. महानगरामध्ये गृह, संकुलांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सक्तीचे असले तरी त्यातून भूगर्भात पावसाचे पाणी मुरू शकते, जलसाठा वाढू शकतो यावर कोणीही विश्‍वास ठेवावयास तयार नाही. कारण शहरातील बहुतांश भागामध्ये रस्ते, सिमेंट, पेव्हमेंट ब्लॉक हेच पसरलेले दिसते. यावरून वाहणारे पाणी सरळ जाते गटारीमध्ये, तेथून नाले, नद्यांमध्ये.

इथे मातीचा कण दिसताना मुश्कील तिथे पाणी मुरणार कोठे? आता तर ग्रामीण भागातही टोलेजंग बंगले उभे दिसतात, पण एखादा अपवाद वगळता कुठेही रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जात नाही. नळ योजनांमुळे धरणाचे पाणी पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याने आपलीही काही जबाबदारी आहे, याची जाणीवही कुणाला राहिलेली नाही.

दोन हास्यांतील विरोधाभास...

मेवाड जिल्ह्यातील काही गावात आम्ही पाण्याचे दुर्भिक्ष जवळून पाहिले. गावात पाण्याचा थेंब नाही, दूर कुठे तरी एखाद्या शेतामधील विहिरीस पाणी असल्यास महिला वर्ग पहाटेच उठून तेवढे अंतर चालत जाऊन पाणी आणतो. काही श्रीमंताघरी टँकर येत असला, तरी त्यांच्या टाक्यांमध्ये पाणी भरताना टँकरचे गळणारे पाणी थेंब थेंब गोळा करताना अनेक छोट्या मुलांना मी पाहिले आहे.

त्यांच्या चेहऱ्यावर थेंबभर पाण्यामुळे उमलणाऱ्या आनंदामुळेच पाण्याला अमृत म्हणायचे मला सुचले. त्या श्रीमंत मालकाच्या हास्यापेक्षाही गोरगरिबांच्या पोरांच्या चेहऱ्यावर हास्य मला अधिक मोलाचे वाटते. या दोन हास्यामधील विरोधाभास हे आपल्या फसलेल्या जल व्यवस्थापनाचे द्योतक आहे.

जल व्यवस्थापनाचे गणित

पाणी व्यवस्थापनामध्ये दोन घटक अतिशय महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे गाळ आणि वाळू. हे दोन्ही नैसर्गिक असले तरी त्यातील पहिल्याच्या अधिक प्रमाणातील निर्मितीमध्ये मानवाचा वाटा मोठा आहे. मानवाच्या विविध कृत्यांमुळे वाहत्या पाण्यासोबत माती वाहून जाऊन गाळ तयार होतो.

हा पाणी साठ्यामध्ये अतिरिक्त साठलेला गाळ हा पाणी व्यवस्थापनाचे गणित संपूर्णपणे बिघडवून टाकतो. वाळू हा घटक पाणी व्यवस्थापन शाश्‍वत करण्याचे उत्तम सूत्र बनतो. जल व्यवस्थापनाचे हे गणित समजून घेताना आपला भूगोल अतिशय पक्का हवा. वाहते पाणी थांबविण्यासाठी आपण मोठमोठी धरणे, नाले बंधारे, नद्या, तलाव बांधत असलो तरी त्यात साचत गेलेल्या गाळामुळे पाणीसाठाच कमी राहतो.

गाळाची उत्पत्ती शेतजमिनीबरोबर उघडे बोडक्या डोंगरदऱ्यामधून होत असते. पाण्याच्या स्रोताजवळ केलेल्या जाणाऱ्या रासायनिक शेतीमुळे मातीचे बंध जोडून ठेवणाऱ्या कोट्यवधी उपयुक्त जिवाणू समूहावर आघात होतो.

मातीचे कण सुटे होऊन जलस्रोतांच्या तळाशी साठतात. पाण्यामुळे कणामध्ये आकर्षण वाढून घट्ट होतात. या घट्टपणे साठलेला गाळामुळे पाण्याच्या तळाखालचे नैसर्गिक झरे बंद होतात. भूगर्भामध्ये मुरण्यात अडथळा निर्माण होतो.

धरणामध्ये पहिल्या काही पावसातच साठलेले पाणी ओसंडून वाहू लागते. त्यासाठी दरवाजे उघडल्याने धबाधबा वाहणाऱ्या पाण्याची छायाचित्रे वृत्तपत्रात येतात. काही क्षण आनंद होत असला तरी या धरणाचे भरणे हा भासमान असते. अशी धरणे जानेवारी अखेरीस मृतसाठ्यावर येतात.

नद्यांच्या काठावरील रासायनिक शेती सर्व गणित बिघडून टाकते. या शेतीतील सुपीक माती धरणात जाते. पुन्हा पीक वाढविण्यासाठी रासायनिक खतांवरील अवलंबित्व वाढत जाते. अशा रासायनिक खतावर जगणाऱ्या शेत जमिनीत सूक्ष्म वाळूच्या कणांचे प्रमाण जास्त असते, यालाच वाळवंटीकरण म्हणतात.

शेताचे वाळवंटीकरण आणि जलस्रोतात गाळ निर्मिती या दोन्हीही मानवनिर्मित प्रक्रिया आहेत. शेतकऱ्यांना यामागचे मूलभूत विज्ञान समजले पाहिजे. जल विज्ञान सांगते, की नदी असो अथवा धरण, त्यांच्या दोन्हीही काठांवर पाचशे ते हजार मीटर अंतरावर रासायनिक शेती करू नये. ही जागा देशी वृक्ष लागवडीसाठी राखून ठेवावी.

विविध प्रकारचे गवत, झुडपे, वृक्ष,वेली या किनाऱ्यावर वाढून त्यांची स्वतंत्र परिसंस्था निर्माण करतात. त्यामुळे पाण्यामध्ये येणाऱ्या गाळावर नियंत्रण राहते. जलस्रोतांचे संरक्षण करण्याबरोबरच बाष्पीभवनावरही नियंत्रण ठेवू शकतात. अगदी अपरिहार्य कारणामुळे अशा काठावर शेती करायची वेळ आलीच तर ती संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीची असावी.

अशा शेतीमधून मातीचे कण वाहण्याची क्षमता कमी असते. जमीन उताराची असल्यास उताराच्या बाजूवर मोठ्या प्रमाणावर वाळा लागवड करावी. वाळ्याची तंतुमय मुळे माती अडविण्याचे मोलाचे कार्य करतात. अनेक ठिकाणी उताराच्या बाजूवर खोल चर तयार करून पाण्याकडे वाहणारी माती अडवली जाते आणि पुन्हा ती वावरात आणली जाते.

महाराष्ट्र शासनाची ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना कितीही चांगली असली तरी ती हजारो कोटी रुपये खर्च करूनही लहान मोठ्या धरणे गाळमुक्त करू शकेल काय, यात शंका आहे. उलट या रकमेतील महत्त्वाचा वाटा जर धरण काठावर देशी वृक्ष लागवड आणि सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी वापरला तर अधिक फायदा होईल असे वाटते.

या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून त्यासाठी विशेष अनुदान दिल्यास अधिक उपयोगी राहील असे वाटते. त्यातही भरडधान्ये आणि जमिनीवर पसरणाऱ्या वेल वर्गीय पिकांना अवश्य प्राधान्य देण्याची गरज आहे.

लेखक - ई-मेल - nstekale@gmail.com (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT