Silk Production Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming : आभ्यासातून रेशीम शेतीत साधली प्रगती

Silk Production : परभणी जिल्ह्यातील बोरगव्हाण (ता.पाथरी) येथील राधेश्याम खुडे हे अल्पभूधारक शेतकरी. अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतलेल्या राधेश्याम यांनी शेती कामी असल्याने रेशीम शेतीची जोड देण्याचे ठरविले. त्यासाठी गावातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन रेशीम शेतीस सुरुवात केली.

Team Agrowon

शेतकरी ः राधेश्याम खुडे
गाव ः बोरगव्हाण, ता. पाथरी, जि.परभणी
एकूण क्षेत्र ः २.५ एकर

परभणी जिल्ह्यातील बोरगव्हाण (ता.पाथरी) येथील राधेश्याम खुडे हे अल्पभूधारक शेतकरी. अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेतलेल्या राधेश्याम यांनी शेती कामी असल्याने रेशीम शेतीची जोड देण्याचे ठरविले. त्यासाठी गावातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन रेशीम शेतीस सुरुवात केली.
मागील १० वर्षांपासून ते रेशीम शेती करत आहेत. परिसरात अभ्यासू रेशीम उत्पादक शेतकरी म्हणून राधेश्याम यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. रेशीम कीटकांसाठी दर्जेदार तुती पाला उपलब्ध होण्यासाठी तुती लागवडीत काटेकोर व्यवस्थापनावर त्यांचा भर असतो.

तुती लागवड ः
- २०१३ मध्ये दीड एकरांत तुती लागवडीचे नियोजन केले. लागवडीपूर्वी दीड एकरांत ७ ट्रॉली शेणखत टाकले.
- त्यानंतर ५ फूट बाय ३ फूट बाय २ फूट अंतरावर जो़डओळ पद्धतीने तुती लागवड केली. या पद्धतीमध्ये ३ फुटांवरील जोडओळीत तुतीच्या दोन झाडांमध्ये २ फूट अंतर तर दोन जोडओळींमध्ये ५ फूट अंतर राखले आहे. सिंचनासाठी दोन ओळींमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे.
- लागवडीसाठी तुतीच्या व्ही १ या वाणाची निवड केली. या वाणाच्या पानांचे एकरी २७ ते ३० टन उत्पादन मिळते. गावातील एका शेतकऱ्याकडून तुती बेणे खरेदी केले.
चार डोळे असलेल्या अंदाजे ८ ते १० इंच आकाराच्या काड्या तयार केल्या.
- लागवडीपूर्वी तुती बेण्यास शिफारशीप्रमाणे प्रक्रिया केली. आणि नंतर लागवड केली.
- लागवड साधारण जून महिन्यात केल्यामुळे सिंचनाची तितकी आवश्यकता भासली नाही.
- लागवडीनंतर १५ दिवसांनी बुरशीनाशकांची आळवणी केली.
- साडेचार ते पाच महिन्यांनी पहिली छाटणी केली. त्यावेळी १८ टन तुती पानांचे उत्पादन मिळाले. त्यावर २०० अंडीपुंजाची पहिली बॅच घेतली. त्यातून १६४ किलो कोष उत्पादन मिळाले.
- त्यानंतर साडेतीन महिन्यांनी दुसरी छाटणी केली. तिसऱ्या छाटणीपासून दर ४० दिवसांनी छाटणीस करून बॅचचे नियोजन केले.

बॅचनुसार छाटणी नियोजन ः
- छाटणीनंतर दोन जोडओळीमध्ये नांगरणी करून रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जातात. नत्र, स्फुरद, पालाश मिळून एकरी ७० ते ७५ किलो खत दिले जाते.
- खतांच्या मात्रा दिल्यानंतर लगेच वखरणी केली जाते. त्यामुळे खत मातीमध्ये बुजून खतांचा वापर कार्यक्षम वापर होतो.
- आंतरमशागत, खत व्यवस्थापन केल्यानंतर ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते.
- बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील जैविक घटक (बायोमिक्स) ची फवारणी केली जाते. त्यामुळे दर्जेदार पानांचे उत्पादन मिळते.
- छाटणीनंतर तुतीची दीड फूट वाढ झाल्यानंतर १५ व्या दिवशी सूक्ष्म अन्नद्रव्यांची पहिली फवारणी घेतली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वेस्ट डी- कंम्पोजर एकरी ५०० लिटर या प्रमाणात ठिबकद्वारे दिली जाते.
- तुती वाढीच्या २५ ते ३०दिवसांदरम्यान सूक्ष्म अन्नद्रव्यांची दुसरी फवारणी केली जाते. ४२ दिवशी छाटणी सुरु होते.
- हिवाळ्यामध्ये तापमान कमी असते. त्यामुळे झाडांची वाढ मंदावते. वरील खत मात्रे व्यतिरिक्त १९ः१९ः१९ या विद्राव्य खतांची २० व्या दिवशी मात्रा दिली जाते. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची अतिरिक्त एक फवारणी केली जाते. या काळात छाटणीचा कालावधी ५ ते १० दिवसांनी वाढतो.

संगोपनगृहातील व्यवस्थापन ः
- रेशीम कीटकांसाठी तुती लागवडीजवळील जमिनीवर २६ बाय ६० फूट आकाराच्या संगोपनगृहाची उभारणी केली आहे. त्यात बायव्होल्टाइन जातीच्या रेशीम कीटकांचे संगोपन केले जाते.
- प्रति बॅच २८० ते ३०० अंडीपुंजापासून २५० ते ३०० किलो कोष
उत्पादन मिळते.
- आजवरच्या अनुभवातून विविध प्रयोग करत तसेच व्यवस्थापनात सुधारणा करत दर्जेदार रेशीम कोष उत्पादन घेत आहोत.
- दोन वर्षापूर्वी आणखी एका क्षेत्रावर २२ बाय ६६ फूट आकाराचे रेशीम कीटक संगोपनगृह उभारले आहे. सध्या दोन कीटक संगोपनगृह आहेत. त्यामुळे सलग बॅच घेणे शक्य होते. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
- हवामान बदलानुसार संगोपनगृहातील व्यवस्थापन तंत्रामध्ये आवश्यक ते बदल केले जातात. थंडी, वाढलेले तापमान, वारे या पासून संरक्षणासाठी शेडभोवती गोणपाट लावले जातात. त्यामुळे रेशीम कीटक संगोपनासाठी आवश्यक तापमान राखणे शक्य होते.
- रेशीम कोषाची बंगलोर जवळील रामनगरम आणि पूर्णा (जि.परभणी) येथील कोष मार्केट विक्री केली जाते.

मागील महिनाभरातील कामकाज ः
- जून महिन्यातील ३०० अंडीपुंजाच्या बॅचपासून ३ क्विंटल १८ किलो उत्पादन कोष मिळाले. उत्पादित सर्व कोषाची विक्री रामनगरम येथील मार्केटमध्ये केली. त्यास प्रतिकिलो ५५३ रुपये दर मिळाला.
- कोष विक्री पूर्ण झाल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता केली.
- ३ जुलैला रेशीम कोष उत्पादनासाठी २७५ अंडीपुंजाची नवीन बॅच सुरु केली आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी रेशीम कीटकांना दर्जेदार तुती पाने कापून देत आहे.

आगामी नियोजन ः
- नवीन बॅचमधील कोष साधारण २८ ऑगस्टला काढणीस येतील.
- कोष विक्री झाल्यानंतर कीटक संगोपनगृहाची स्वच्छता केली जाईल.
- तुती बागेमध्ये आंतरमशागत आणि खतांच्या मात्रा देण्याची कामे जातील.
- रेशीम कीटकांसाठी दर्जेदार पाने उपलब्ध झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पुढील बॅचचे नियोजन केले जाईल.
-----------------
- राधेश्याम खुडे,८८८८९३१७९३
(शब्दांकन ः माणिक रासवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT