Kolhapur News : राज्य शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे शिवारांमध्ये वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. महिला शेतमजूर नोंदणीपासून ते जमा झालेले पैसे काढण्यापर्यंत व्यस्त असल्याने शेतीकामाला दांडी पडत आहे. सर्वच बँकामध्ये प्रचंड गर्दी आहे.
एका दिवसात होणाऱ्या कामाला दोन ते तीन दिवस लागत असल्याने तितके दिवस महिला शेतकरी मजूर शेतीकामाला येत नसल्याचे चित्र आहे. ऐन खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांची मशागतीची कामे खोळंबत आहेत. यामुळे शेतकऱ्याला नाइलाजास्तव शेतीकामे प्रलंबित ठेवावी लागत आहेत.
सुरुवातीच्या काळात योजनेत सहभागी होण्यासाठी गावांमध्येच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्या वेळी रक्कम खात्यात येण्यास सुरुवात झाली, त्या वेळी मात्र महिलांनी योजनेत सहभागी होण्यासाठी एकच गर्दी केली. एकाच वेळी बॅक खाते काढणे, आधार क्रमांक बँकेला लिंक करणे, महिलांचे जमा झालेले पैसे त्यांना देणे ही कामे एकदम आली. यामुळे बँकांच्या व्यवस्थापनावर मोठा ताण आला.
अनेक निरक्षर महिलांनी पैसे मिळणार नाहीत म्हणून या योजनेत सहभाग घेतला नव्हता. पण अन्य महिलांना रकमा मिळत असल्याने कागदपत्रे गोळा करण्यापासून ते नोंदणीपर्यंत व पैसे काढण्यासाठी एकच झुंबड गावांबरोबर नजीकच्या शहरातही उडत आहे. यामुळे शेतीकामापेक्षा याच कामाला प्राधान्य दिले जात आहे. अनेक ठिकाणी शेतमजूर महिला एकत्रित कामासाठी जातात.
आता योजनेचा फायदा घेण्यासाठी या महिलांही एकत्रच जात असल्याने महिला मजुरांची मोठी टंचाई जाणवत आहे.सध्या खरीप पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकांची मशागत करणे गरजेचे आहे. पूर येऊन गेल्याने शेतातील स्वच्छतेलाही शेतकरी झटत आहे. रखडलेल्या ऊस लागवडीच्या हालचाली वेगात आहेत.
या सर्व कामांसाठी पुरुष मजुरांबरोबर महिला मजुरांचीही मोठी मदत लागत आहे. पण महिला मजुरांचा कामावर येण्यासाठी प्रतिसाद नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे.
पूर ओसरल्यानंतर वाफसा आल्याने एकदम मशागतीची कामे आली. गेल्या आठ दिवसांपासून महिला मजूर शेतकामासाठी येण्यास राजी नाहीत. बँकेची कामे वेळेत होत नसल्याने येवू शकत नसल्याचे कारण दिले जात आहे.- राजू शिंदे, शेतकरी
पैसे येतील की नाही या साशंकतेमुळे आम्ही योजनेत भाग घेतला नव्हता, परंतु पैसे आल्याने शेतमजूर महिलाही सहभाग घेत आहेत. अनेकींची बॅंक खाते नसल्याने व बँकात गर्दी वाढल्याने यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जात आहे. यामुळेच आम्हाला शेतीत मजुरीला जाणे अशक्य होत आहे.- हिराबाई गायकवाड, महिला शेतमजूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.