Gondia News : प्रभारी कृषी विकास अधिकाऱ्याने कृषी सेवा केंद्र चालकांकडून तपासणीआड पैसे वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्षांनी या बाबत थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
त्यामुळे या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्ह्यात खरिपाच्या तोंडावर खताची साठेबाजी होत शेतकऱ्यांवर वाढीव दराने खत खरेदीची वेळ आली आहे. याविषयी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी प्रमोद कागदीमेश्राम यांना काही कृषी सेवा केंद्राची तपासणी करा, अशी सूचना केली.
परंतु नव्या शासन आदेशानुसार कृषी विकास अधिकाऱ्यांचे तपासणीचे अधिकार काढल्याचे सांगत हे काम करण्यास श्री. कागदीमेश्राम यांनी नकार दिला. मात्र त्यानंतर काही वेळातच ते आमगाव येथील जय भवानी कृषी सेवा केंद्र व त्यानंतर कटीपार येथील कृषी सेवा केंद्राची तपासणी करून पैशाची मागणी करीत असल्याचे व्यावसायिकांनी फोनवरून हर्षे यांना कळविले.
त्यानंतर गोरेगाव तालुक्यातूनही श्री. कागदीमेश्राम यांनी पैशाच्या मागणीबाबत फोनवरून व्यावसायिकांनी माहिती दिली. या वेळी फोनवरून श्री. मेश्राम यांच्याशी उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांनी संवाद साधला असता त्यांनी चूक झाल्याची कबुली दिली.
मात्र श्री. हर्षे यांनी ही बाब गांभीर्याने घेत थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मृगनाथन यांना या बाबत माहिती देत श्री. मेश्राम यांच्यावर कारवाईची सूचना केली.
भरारी पथकाचा प्रमुख म्हणून मला तपासणीचे अधिकार आहेत. काही कृषी सेवा केंद्राची तपासणी केली आणि एका कृषी केंद्रात खताचा सशंयास्पद साठा आढळल्यानंतर त्याला विक्री बंदचे आदेश दिले. यात पैसे मागण्याचा विषय कोठे आला.- प्रमोद कागदीमेश्राम, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया
तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संबंधित कृषी अधिकाऱ्याचा प्रभार काढण्याचे प्रस्तावित आहे. या संदर्भाने गोंदिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सूचना देत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत ही कारवाई केली जाईल.- उमेश घाटगे, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर
खत तपासणीचे अधिकार नाहीत असे श्री. कागदीमेश्राम यांनी सांगितले. मात्र त्यानंतर ते तपासणीआड पैशाची मागणी करीत असल्याच्या अनेक तक्रारी कृषी व्यावसायिकांनी केल्या. त्यामुळे त्यांचा पदभार काढावा, अशी शिफारस ‘सीईओं’कडे केली आहे.- सुरेश हर्षे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, गोंदिया
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.