
Ahilyanagar News : खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम राबवली आहे. यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्या आहेत. अनियमितता आढळलेल्या तीन कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले असून चोवीस परवाने कायमस्वरूपी रद्द केले, असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खते, बियाणे योग्य दरात विकण्यासह अनेक बाबींविषयी पारदर्शकता ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरिही नेहमीप्रमाणे सवय असलेले काही कृषी साहित्य विक्रेते अनियमितता ठेवत असून, चढ्या दराने कापसाच्या व अन्य मागणी असलेल्या बियाण्यांची विक्री करत असल्याची दिसून येत आहे.
आतापर्यंत दोन दुकानांवर जादा दराने बियाणे विक्री केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हयात कृषी सेवा केंद्रांची व्यापक तपासणी मोहीम राबवली आहे. यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून येत आहेत. तपासणीत नियमबाह्य कामकाज करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करत राहुरी तालुक्यातील २ आणि नेवासा तालुक्यातील १ असे ३ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
कृषी विभागाच्या तपासणीत विविध त्रुटी उघड झाल्या असून, त्यामध्ये भाव फलक व साठा फलक नसणे, विक्री परवाना दुकानदाराने दर्शनी भागात न लावणे, साठा पुस्तके अद्ययावत नसणे, स्रोत परवान्यात नमूद नसणे, ग्राहकांना पावत्या न देणे, विक्री अहवाल दर महिन्याला सादर न करणे, टोल फ्री क्रमांक उपलब्ध नसणे आणि खतांची विक्री पॉस मशिनवरून न करणे अशा गंभीर त्रुटींचा समावेश आहे.
तपासणीनंतर दोषी ठरलेल्या केंद्रांना नोटीस देऊन सुनावणीही घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान दोष सिद्ध झाल्यानंतर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. विक्री परवाने घेतले असतानाही दुकाने बंद ठेवणाऱ्या केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
या अंतर्गत आतापर्यंत राहुरी तालुक्यात ४, अकोलेला ६, नेवाशाला ५, शेवगावला ३, अहिल्यानगरला ३ आणि पाथर्डीत ३ अशा एकूण २४ विक्री केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. अनियमितता दिसल्यास शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय अथवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
नेवासा तालुक्यावर अधिक लक्ष...
खते, बियाण्यांची चढ्या दराने विक्री, बोगस बियाणे आदीबाबत नेवासा तालुक्याचा कृषी विभाग फारसा गांभिर्याने घेत नाही. गेल्या वर्षी व यंदाही बियाणे चढ्या दराने विक्रीचे प्रकार नेवाशात आढळून आले. एका दुकानावर अहिल्यामधील अधिकाऱ्यांनी कारवाई केली. नेवासा तालुक्यात असे प्रकार अधिक प्रमाणात घडत असताना तेथील तालुका कृषी अधिकारी लक्ष देत नसल्याने जिल्हा पातळीवरून नेवासा तालुक्यावर अधिक लक्ष असल्याचे दिसून येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.