राजकुमार चौगुले
Babaso Jong : राशिवडे (जि. कोल्हापूर) येथील बाबासो सुऱ्याप्पा जोंग (Babaso Jong) यांनी लहानपणापासूनच मेंढीपालन व्यवसायाला सुरुवात केली.
शेतात मेंढी (Sheep) बसविण्यासाठी अनेक वर्षे भटकंती केली. त्यातून पै पै संसाराला जोडला. आज वयाच्या ६७ वर्षीही बंदिस्त पद्धतीने त्यांचे मेंढीपालन (Sheep Rearing) यशस्वी सुरू असून, आर्थिक उत्पन्नाचा मोठा स्रोत सुरू ठेवताना युवा शेतकऱ्यांपुढे त्यांचा आदर्शही तयार झाला आहे.
कोल्हापूर शहरापासून २८ किलोमीटरवर राशिवडे हे राधानगरी तालुक्यातील शेतीच्या दृष्टीने वैविध्य असलेले गाव आहे. ऊस, भातासह फूल उत्पादनासाठी ते प्रसिद्ध आहे. गावातील बाबासो सुऱ्याप्पा जोंग
यांची ज्येष्ठ व यशस्वी मेंढीपालक अशी ओळख आहे. आज वयाची ६७ वर्षे त्यांनी पार केली आहेत.
पण मेंढीपालनातील त्यांचा उत्साह, उमेद तसूभरही कमी झालेला नाही. उलटपक्षी तो युवकांना लाजवण्याजोगाच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
बाबासो यांचे मेंढीपालन
तिसरी इयत्तेत असतानाच बाबासाहेबांना मेंढीपालनाचा लळा लागला. आणि आजगायत त्यांनी तो जपला आहे. अगदी सुरुवातीच्या ते आपल्या मेंढ्या अन्य शेतकऱ्यांच्या शेतात बसविण्याचा व्यवसाय करायचे. त्यासाठी मेंढ्यांना घेऊन भटकंती ठरलेलीच. सोलापूर, पंढरपूर, सांगोला असा बराच मोठा भाग त्यांनी पायाखालून घातला. एकदा मेंढ्या घेऊन बाहेर पडले की दिवाळीपर्यंत ते घरी परतत नसत.
आजही तिकडील अनेक शेतकऱ्यांची शेते, रस्ते आपल्याला ठाऊक असल्याचे बाबासो सांगतात.
काळानुरूप व्यवसायात बदल
अलीकडील काळापर्यंत व्यवसायात सातत्य ठेवले. पण वयोमानानुसार बाबासो यांना आज भटकंती करणे शक्य होत नाही. पण म्हणून घरी विश्रांती घेणे त्यांनी पसंत केले नाही. तर तीन वर्षांपूर्वी व्यवसायाची पद्धत थोडी बदलली. स्वतः जवळील सुमारे दीडशे मेंढरांची विक्री करून त्यांनी काही
लाख रुपयांची पुंजी गोळा केली. त्यातून आपल्या अडीच गुंठे क्षेत्रात पक्के शेड उभे केले. साधारण पन्नास ते पंचावन्न मेंढरे मावतील अशी त्याची क्षमता आहे. त्यात सुरुवातीला २० मेंढरे होती.
आजमितीस त्यांची संख्या ३५ पर्यंत आहे. संख्या जास्त झाल्यास एकट्याला व्यवस्थापन करणे अडचणीचे ठरते हे पाहून ही मर्यादा निश्चित केली.
लहान कोकरांची बाजारातून खरेदी
बाबासो सुमारे तीन महिन्यांच्या कोकरांची खरेदी बाजारातून करतात. यासाठी प्रत्येक महिन्याला
पेठवडगाव, मिरज, निपाणी आदी बाजारांत फिरून कोकरांचे बारीक निरीक्षण करतात. खरेदीवेळी
कोकराला दूध देणे बंद केल्याची खात्री करून घेतली जाते. एका वेळी पंधरा ते वीस या संख्येने
खरेदी होते. कोल्हापूरच्या पश्चिम भागातून काळ्या शिंगाच्या मेंढ्याला अधिक पसंती असते.
खरेदीत ही बाब आवर्जून पाहिली जाते.
व्यवस्थापन
कोकरू शेडमध्ये आणल्यानंतर त्याला जंतावरील औषध व चार दिवसांनी टॉनिक दिले जाते. यानंतर औषधे फारशी दिली जात नाहीत. लहान कोकरांसाठी स्वतंत्र विभाग केला आहे. मेंढरांना
दोन वेळा म्हणजे सकाळी सात व सायंकाळी चार वाजता खाद्य देण्यात येते. यात हिरवे गवत, तुरीचे व
हरभऱ्याचे भुस्कट यांचा वापर होतो. मका खरेदी करून बॅगेत मुरघास तयार केले जाते. त्याचही खाद्यात वापर होतो. बाबासो यांचे आठ गुंठे शेत आहे. पण ते डोंगरावर उंच ठिकाणी असल्याने
अन्य शेतकऱ्याकडील आठ गुंठे क्षेत्र चाऱ्यासाठी घेतले आहे. त्यातून दररोज पंधरा ते सोळा पेंढ्या चारा कापून आणला जातो. दुपारच्या वेळेस मक्याची भरड दिली जाते. पाण्याची चोवीस तास सोय करण्यात आली आहे.
विक्री व्यवस्था व उत्पन्न
चार महिन्यांचे कोकरू आणल्यानंतर चार ते सात महिन्यांपर्यंत म्हणजे ३२ ते ३५ किलो वजन होईपर्यंत त्याचे संगोपन केले जाते. त्यानंतर प्रति किलो ३६० रुपये दराने विक्री केली जाते. विक्रीसाठी
कोणती प्रसिद्धी वा प्रचार करण्याची गरज भासलेली नाही. आसपासच्या गावांसह राधानगरी तालुक्यातील ग्राहक थेट जागेवर येऊन खरेदी करतात. अगदी कोल्हापूर भागातूनही प्रतिसाद असतो.
शेडवरच ग्राहकांसमोर वजन केले जाते. वर्षभरात शंभरपासून दीडशेपर्यंत मेंढरांची विक्री
होते. प्रति मेंढरामागे व्यवस्थापन खर्च वजा जाता एक लाखापासून ते काही वेळा अधिक रक्कमही हाती पडते. मागणी येईल तशी विक्री असल्याने प्रत्येक महिन्याला विक्रीचा निश्चित आकडा नसतो. उन्हाळ्याच्या कालावधीत जत्रा, विविध उत्सव, लग्नसराई असे कार्यक्रम असतात. त्यावेळी विक्रीची आकडेवारी वाढते. वर्षाला २५ किलोच्या सुमारे दोनशे पिशव्या लेंडी खत तयार होते. शंभर रुपये प्रति पिशवी याप्रमाणे त्याची विक्री होते. त्यातूनही काही हजार रुपयांचे उत्पन्न हाती येते. त्यातून वीजबिल
व अन्य किरकोळ खर्च निघून जातो.
व्यवसायात जपलेला साधेपणा
पारंपरिक फेटा आणि धोतर परिधान करण्याचा बाज बाबासो यांनी कायम ठेवला आहे. स्वभावात जपलेला साधेपणा, प्रामाणिकपणा व चिकाटी हीच त्यांच्या यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली ठरली आहे. मरतुक ही बाब लक्षात घेता शेळीपालनाच्या तुलनेत मेंढीपालनात धोके तुलनेने कमी असतात असे बाबासो यांचे निरिक्षण आहे. सखोल अभ्यास असल्यानेच मेंढरू आजारी असल्यास
त्याचे लक्षण त्वरित त्यांच्या लक्षात येते.प्राथमिक उपचार ते स्वतः करतात. गरज भासल्यास
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले जाते. ग्रामपंचायतीत नोकरीस असलेला मुलगा रणजित व पत्नी सुशीला यांची मदत होत असल्याने बाबासो यांचे श्रम हलके होतात.
बाबासो जोंग, ९५२७३२६५७५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.