Silk Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming : रेशीम शेतीने दिला सक्षम पर्याय

Silk Production : कोलार (ता. जि. नागपूर) येथील गिरिधर शिंदे यांनी विदर्भातील तापमानातही रेशीम शेती यशस्वी केली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले

Nagpur Success Story : कोलार (ता. जि. नागपूर) येथील गिरिधर शिंदे यांनी विदर्भातील तापमानातही रेशीम शेती यशस्वी केली आहे. उन्हाळ्यात विविध उपायांचा वापर करून त्यांनी रेशीम संगोपन शेडमधील तापमान नियंत्रित ठेवले आहे. शेतीपेक्षा याच पूरक व्यवसायाने त्यांना सक्षमतेचा पर्याय दिला आहे.

नागपूरपासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर गट ग्रामपंचायत कोलार- घोटी अंतर्गत कोलार गावआहे. सुमारे ७०० लोकसंख्येच्या या गावात रोजगाराचे मुख्य साधन शेतीच आहे. गावात रामा सिंचन प्रकल्पाचे ‘बॅकवॉटर’आहे. सन १९९६ पूर्वी झालेल्या या प्रकल्पात अनेकांची शेती संपादित करण्यात आली. त्यात काहीजण मासेमारी करून अतिरिक्‍त उत्पन्नाचा स्रोत मिळवतात.

प्रकल्पातील पाण्याचा शेतीला उपयोग होतो. प्रकल्पासाठी शेती संपादित करण्यात आलेले काही जण बुटीबोरी (नागपूर) औद्योगिक प्रक्षेत्रात कंपनीमध्ये कामास जातात. गावातील गिरिधर टिकाराम शिंदे यांनी पॉलिटेक्निक शाखेतून सन २००० च्या आसपास ‘इलेक्ट्रीक’ विषयातील शिक्षण घेतले.

सुरवातीची दोन-तीन वर्ष कंपनीत काम केले. मात्र शेतीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. कुटुंबात ते एकटेच होते. घरची चार एकर शेती होती. आजोबांपासून शेतीचा वारसा होता. सन २००३-०४ पासून वडिलांसोबत शेतीत जात गिरिधर शेती व्यवस्थापनाचे धडे गिरवीत होते.

पुढे २०१६-१७ मध्ये शेतीची सूत्रे त्यांनी आपल्याकडे घेतली. त्यानंतर विविध भाजीपाल्यांची शेती सुरू केली. दोन-चार गावातील आठवडी बाजारात जाऊन ते थेट विक्री करीत. तब्बल आठ ते दहा वर्ष लागवड, उत्पादन व थेट विक्री असा ‘पॅटर्न’ त्यांनी कायम ठेवला. परंतु कौटुंबिक व तांत्रिक कारणांमुळे भाजीपाला शेती त्यांना थांबवावी लागली.

रेशीम शेतीत पदार्पण

भारकस येथील संदीप निखाडे यांच्याकडून रेशीम शेतीचा मार्ग गवसला. त्यात उतरण्याचे ठरवून
जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नोंदणी केली. म्हैसूर (कर्नाटक) येथे दहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. ‘सिल्क समग्र’ योजनेचा लाभ घेत रेशीम शेतीला सुरवात केली.

आज ५० बाय २० फूट आकाराचे शेड आहे. एक एकरांत तुती लागवड केली. सुरवातीला स्वतःकडीलच भांडवल वापरले. त्यानंतर ३७ हजार ५०० रुपयांचे अनुदान तुती लागवडीसाठी तर एक लाख २७ हजार अनुदान शेड बांधकामासाठी मिळाले.

रेशीम शेतीतील व्यवस्थापन

सन २०१८ मध्ये पहिल्या बॅचमध्ये १०० अंडीपूंजांचे संगोपन केले. त्यावेळी अवघ्या तीस किलोपर्यंत रेशीम कोषांचे उत्पादन मिळाले. अनुभव व कुशलता येत मग उत्पादन वाढत गेले. विदर्भातील तापमान सर्वत्र प्रसिद्ध आहे. फेब्रुवारीपासूनच तापमानात वाढीस सुरवात होते.

एप्रिल-मे काळात पारा ४५ अंश सेल्सिअसचा पल्ला गाठतो. अशा काळात कोष उत्पादन घेणे आव्हानात्मक ठरते. मात्र गिरिधर यांनी हे आव्हान पेलत शेडमधील तापमान २५ ते २८ अंशापर्यंत नियंत्रित ठेवण्यात यश मिळविले आहे.

त्यासाठी शेडच्या चारही बाजूंना हिरवी नेट तसेच तागाचा बारदाना बांधला आहे. शेडच्या वरील भागात गवत अंथरले असून त्यावर तुषार सिंचनाद्वारे पाण्याचा शिडकावा केला जातो. आतील बाजूस ‘फॉगर्स’ लावले आहेत. अलीकडील काळात चॉकी खरेदीवर भर दिला आहे.

रेशीम शेती फायदेशीरच

सुरवात केली तेव्हा पुरेशा भांडवलाअभावी बांबूपासून रॅक तयार केले होते. त्यास गळती लागल्याने ते कोसळले. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. तरीही गिरिधर सांगतात की गारपीट, पाऊस अशा नैसर्गिक आपत्ती काळात पिकांचे मोठे नुकसान होते.

परंतु रेशीम शेतीत तुलनेने ते फार कमी असते. त्यामुळे शेतीला हा पूरक व्यवसायक शाश्‍वत पर्याय ठरतो असे गिरिधर सांगतात. त्यामुळेच आता पावणदोन एकरांवर असलेली तुती लागवड चार एकरांवर वाढवण्याचे नियोजन आहे. सोबतच अतिरिक्‍त शेडची उभारणीही प्रस्तावित आहे.

गिरिधर प्रत्येक बॅच दीडशे अंडीपुंजांची घेतात. काही कारणांमुळे पाल्याची उपलब्धता कमी झाल्यास ती ५० अंडीपुंजांपर्यंतही घ्यावी लागली. वर्षभरात आठ ते नऊ बॅचेस होतात. प्रति १५० अंडीपुंजांच्या बॅचपासून १२० ते १२५ किलो कोष उत्पादन मिळते.

बाजारपेठेचा अंदाज घेत रामनगर (कर्नाटक) किंवा बीडचा पर्याय निवडला जातो. प्रति किलो ४०० रुपये ते त्याहून अधिक दर मिळतो. गाव परिसरात आता अनेकांनी रेशीम शेतीवर भर दिल्याने कोष उत्पादन वाढून एकाचवेळी बाजारपेठेत ते नेणे शक्य झाले आहे.

रेशीम शेतीतून कमी कालावधीत चांगला परतावा मिळतो. त्यामुळेच नागपूर भागातील गुमगाव, देवळी गुजर, मोहपा, पार्डी, कळमेश्‍वर, उमरेड तालुक्‍यांतील अनेक तरुण शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. रेशीम संचालक वसुमना पंत, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावर यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

रेशीम कोष उत्पादनासाठी २५ ते ३० अंश तापमान व ५५ ते ६५ टक्‍के आर्द्रता आवश्‍यक राहते.
परंतु सध्या तापमान ४५ अंशापर्यंत गेले असले तरी अनेक शेतकरी विविध प्रयोगांमधून
रेशीम शेती यशस्वी करीत चांगले उत्पन्न मिळवीत आहेत.
- महेंद्र ढवळे- ९४२१७०७९४८
उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर

गिरिधर शिंदे- ८३२९४७४२५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT