Tur Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Cultivation : तूर लागवडीसाठी वाण निवड

Team Agrowon

डॉ. विजयकुमार गावंडे

Tur Farming : सध्या राज्यात मुख्यतः विदर्भात लागवड केले जाणारे बहुतेक वाण हे मध्यम लवकर आणि मध्यम ते उशिरा कालावधीचे आहेत. राज्यातील सुमारे ९० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र या वाणांखाली येते.

विविध संशोधन केंद्रामार्फत मागील काही वर्षांत हळव्या (मध्यम लवकर तयार होणाऱ्या) तसेच निम गरव्या (मध्यम उशिरा) हे सुधारित वाण विकसित केले आहेत. स्थानिक पर्जन्यमान, जमिनीचा पोत आणि परिपक्वता कालावधी या बाबी विचारात घेऊन तूर लागवडीसाठी वाणाची निवड करावी.

परिपक्वता कालावधीनुसार वाणांचे वर्गीकरण

अति लवकर होणारे वाण : १३० दिवसांच्या आधी

लवकर परिपक्व होणारे वाण : १३१ ते १५० दिवस

मध्यम लवकर तयार होणारे वाण : १५१ ते १६५ दिवस

मध्यम कालावधीचे वाण : १६६ ते १८५ दिवस

उशिरा परिपक्व होणारे वाण : १८६ दिवसांपेक्षा अधिक

जमीन, पर्जन्यमानाप्रमाणे हळवे/गरवे वाण

मध्यम जमीन तसेच मध्यम पर्जन्यमान असल्यास लवकर तयार होणारे वाण लागवडीसाठी निवडावेत. उदा. ए.के.टी. ८८११, आय.सी.पी.एल. ८७ (प्रगती) ए. राजेश्वरी, गोदावरी ए, रेणुका ए, फुले तृप्ती.

मध्यम ते भारी जमीन आणि खात्रीशीर पर्जन्यमान असल्यास, मध्यम कालावधीचे वाण निवडावेत. उदा. पी. के. व्ही. तारा, विपुला ए. बी. एस. एम. आर. ७३६, बी. एस. एम. आर. ८५३, बी. डी. एन. ७०८, बी. डी. एन. ७१६, पी. डी. के. व्ही. आश्लेषा.

भारी जमीन तसेच खात्रीशीर पर्जन्यमान असल्यास, उशिरा तयार होणारे वाण निवडावेत. उदा. आशा (आय. सी. पी. एल. ८७११९) किंवा पी. डी. के. व्ही. आश्लेषा.

पीक पद्धतीनुसार वाण निवड

दुबार पीक

तूर पिकानंतर लगेच दुसरे पीक घ्यावयाचे असल्यास, लवकर तयार होणारे वाण उदा. ए. के. टी. ८८११ ए. आय. सी. पी. एल. ८७ (प्रगती) यापैकी वाणाची निवड करावी.

आंतरपीक

तूर पिकामध्ये साधारणपणे मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी इत्यादी पिके आंतरपीक म्हणून घेतली जातात. त्याकरिता मध्यम ते उशिरा तयार होणारे वाण उदा. आशा, बी. एस. एम. आर. ८५३, पी. के. व्ही. तारा, पी. डी. के. व्ही. आश्लेषा यापैकी वाणाची निवड करणे योग्य ठरते.

सुधारित वाणांची वैशिष्ट्ये

लवकर आणि मध्यम लवकर परिपक्व होणारे वाण

आय. सी. पी. एल. ८७ (प्रगती)

शुष्क आणि अर्धशुष्क उष्ण कटिबंधावर संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र, हैदराबाद येथून १९८६ मध्ये प्रसारित.

दुबार पिकास योग्य. तसेच पहिल्या बहराच्या शेंगा तोडून दुसरा बहार घेता येतो.

दाणे मध्यम टपोरे लाल रंगाचे.

१०० दाण्यांचे वजन : १० ग्रॅम.

परिपक्वता कालावधी : १२५ ते १३५ दिवसांत (लवकर परिपक्व होते)

हेक्टरी उत्पादन : सरासरी ९ ते १० क्विंटल.

ए. के. टी. ८८११

कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथून १९९५ मध्ये प्रसारित.

मर रोगास मध्यम प्रतिबंधक.

दाण्याचा रंग लाल.

१०० दाण्याचे वजन ः ९ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी ः १३० ते १४० दिवस.

हेक्टरी उत्पादन ः सरासरी १० ते ११ क्विंटल.

बी. डी. एन. ७०८

कृषी संशोधन केंद्र, बदनापूर (वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) येथून २००४ मध्ये प्रसारित.

शेंगा गर्द लाल असून दाणे देखील चमकदार लाल रंगाचे असतात.

मर व वांझ रोगास प्रतिबंधक. तसेच शेंगा पोखरणाऱ्या किडींना सहनक्षम आहे.

कमी पर्जन्यमानाच्या (५५० ते

६५० मि. मी. पाऊस) भागासाठी योग्य.

१०० दाण्यांचे वजन ः १० ते १२ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी ः १६० ते १६५ दिवस.

हेक्टरी उत्पादन ः सरासरी १६ ते १८ क्विंटल

फुले राजेश्वरी

कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून २०१२ मध्ये प्रसारित.

मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम.

दाण्यांचा रंग लाल.

१०० दाण्यांचे वजन ११.३ ग्रॅम.

परिपक्वता कालावधी ः १४० ते १५० दिवस

हेक्टरी उत्पादन ः सरासरी २२ क्विंटल.

डॉ. विजयकुमार गावंडे, ९८२२७ ५५७७५

(वरिष्ठ शास्त्रज्ञ, कडधान्य संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT