Mosambi Lagwad Agrowon
ॲग्रो विशेष

Mosambi Lagwad : मोसंबी लागवडीसाठी निवडा सुधारित कलमे

Revised Clauses of Mosambi : लागवडीसाठी खतमात्रा भरून तयार ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये कलमांची लागवड करावी. कलमाची लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यांत करावी. लागवडीनंतर कलमांना बांबूचा किंवा काठीचा आधार द्यावा.

Team Agrowon

कीर्ती भांगरे, डॉ. सतीश जाधव, मधुकर शेटे

मोसंबी हे लिंबूवर्गीय फळांमधील महत्त्वाचे फळपीक आहे. राज्यातील हवामान मोसंबी लागवडीस पोषक असल्याने मोसंबी लागवडीखालील क्षेत्र दिवसदिवस वाढते आहे. मोसंबी लागवडीसाठी जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. मोसंबी फळबाग लागवडीनंतर बराच काळ उत्पादन मिळत असल्याने त्यासाठी योग्य जमिनीची निवड करावी. त्यावरच झाडांची वाढ, उत्पादनक्षमता आणि आयुष्यमान अवलंबून असते.

जमीन
- पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी, ६० सेंमी खोलीची, चुनखडी विरहित, सामू ६.५ ते ७.५ असलेली जमीन लागवडीस निवडावी.
- जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण ०.१ टक्का, तर आणि चुनखडीचे प्रमाण ८ ते १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
- हलक्या जमिनीत मोसंबी लागवड करू नये.

हवामान
- समशीतोष्ण व कोरडे हवामान आणि कमी पाऊस अशा हवामानात मोसंबी झाडे जोमाने वाढतात, फळांची प्रतही चांगली मिळते.
- १५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान पिकास चांगले मानवते.

इन्फो
सुधारित जाती ः
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने २००८ मध्ये ‘फुले मोसंबी’ ही सुधारित जात निवड पद्धतीने विकसित केली आहे. या जातीची झाडे ‘रंगपूर लाइम’ या खुंटावर कलम केल्यास उत्पादनक्षम व दीर्घायुषी ठरतात. या जातीपासून दर्जेदार व भरपूर फळांचे उत्पादन मिळते.

फुले मोसंबी (ठळक वैशिष्ट्ये)
- अधिक उत्पादनक्षम असून कीड-रोगास अधिक सहनशील आहे.
- फळे आकाराने मोठी. फळांचे सरासरी वजन २४०.९६ ग्रॅम.
- रसाचे जास्त प्रमाण ४७.३७ टक्के, कमी आम्लता ०.४० टक्का, जास्त विद्राव्य घटक ९.६६ अंश ब्रिक्स हे गुणधर्म.
- झाडांची जोमदार वाढ, आकारमान २७.०३ घनमीटर, अधिक उत्पादन क्षमता ७२.९५ किलो प्रति झाड आणि २०.१२ टन प्रति हेक्टर प्रति वर्ष असते.

पूर्वतयारी व आखणी
- मोसंबी हे बहुवर्षीय बागायती फळपीक असल्याने वर्षभर खात्रीशीर सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणच्या जमिनीत लागवड करावी.
- निवड केलेल्या जमिनीची खोलवर उभी-आडवी नांगरट करून कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या द्याव्यात.
- उन्हाळ्यात साधारण एप्रिल-मे महिन्यांत बागेची आखणी ६ बाय ६ मीटर अंतरावर चौरस पद्धतीने करून १ बाय १ बाय १ मी. आकाराचे खड्डे खोदावेत. खोदलेले खड्डे उन्हात चांगले तापू द्यावेत.
- पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक खड्डा पोयटा माती, २ ते ३ घमेले चांगले कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट १.५ ते २ किलो, निंबोळी पेंड २ किलो यांचे मिश्रण टाकावे.

लागवड
- कलमाची लागवड जुलै-ऑगस्ट महिन्यात करावी. पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी पावसाळ्याच्या शेवटी लागवड करावी. कलमे रोपवाटिकेत ज्या स्थितीत असतील त्याच स्थितीत शेतात लावावीत.
- लागवड करताना कलमजोड जमिनीपासून २० ते २५ सेंमी उंचीवर राहील आणि जमिनीत गाडला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- कलमे लावताना शेंड्याकडील ५ ते ६ पाने ठेवून बाकीची सर्व पाने काढून टाकावीत.
- लागवडीपूर्वी कलमे कॉपर ऑक्सिक्लोराइड २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी (लेबलक्लेम आहे).
- कलम लागवड करताना खड्ड्यात कुदळीने लहान खड्डा करून त्यातील माती बाजूला करून घ्याव्यात. कलमांच्या मुळ्या न तुटता खड्ड्यात ठेवून माती कलमांभोवती घट्ट दाबावी.
- लागवड शक्यतो सायंकाळी करावी. लागवडीनंतर कलमांना लगेच पाणी द्यावे.
- लागवडीनंतर कलमांना बांबूचा किंवा काठीचा आधार देऊन कलमे सरळ व नैसर्गिक स्थितीत वाढू द्यावीत. वेळोवेळी खुंटावर येणारी फूट काढावी.

कलमांची निवड
मोसंबी लागवडीत जमिनीच्या निवडी प्रमाणेच जातिवंत कलमांच्या निवडीस अत्यंत महत्त्वाची आहे. कारण फळपिकाचे पुढील आयुष्य आणि उत्पादकता बऱ्याचशा प्रमाणात कलमांसाठी वापरलेल्या खुंट व जातिवंत डोळकाडीच्या निवडीवर अवलंबून असते. रंगपूर लाइम खुंटावर भरलेली मोसंबी कलमे लागवडीसाठी निवडावीत. योग्य खुंटामुळे कलमांची वाढ, जोमदारपणा, उत्पादनक्षमता, फळांचा आकार व प्रत आणि आयुष्यमान यावर दीर्घकालीन परिणाम होतो. तसेच अशा खुंटामुळे कलमांना आरोग्यास कारणीभूत असणाऱ्या अनेक बाबींपासून संरक्षण मिळते.


खत व्यवस्थापन ः (प्रति झाड प्रति वर्ष मात्रा)
झाडाचे वय (वर्ष)---शेणखत (किलो)---निंबोळी पेंड (किलो)---नत्र (ग्रॅम)---स्फुरद (ग्रॅम)---पालाश (ग्रॅम)
१---१०---अर्धा किलो---७५---५०---१००
२---१० ते १५---१---१२५---७५---१५०
३---१५ ते २०---२---२५०---१००---३००
४---१५ ते २०---४---४००---१५०---४००
५---२०---१५---८००---३००---६००

फळधारणा सुरू झाल्यानंतर म्हणजेच लागवडीनंतर ५ वर्षांनी बहर प्रक्रियेत पाण्याचा ताण तोडताना प्रति झाड शेणखत २० किलो, निंबोळी पेंड १५ किलो, नत्र ८०० ग्रॅम, स्फुरद ३०० ग्रॅम, पालाश ६०० ग्रॅम, व्हॅम ५०० ग्रॅम, स्फुरद विरघळविणारे जिवाणू १०० ग्रॅम, ॲझोस्पिरिलियम १०० ग्रॅम आणि ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम या प्रमाणे मात्रा द्यावी. ही मात्रा देताना ५० टक्के नत्र, तर स्फुरद, पालाश, शेणखत, निंबोळी पेंड आणि जैविक खतांच्या संपूर्ण मात्रा पहिल्या किंवा दुसऱ्या पाण्याच्या वेळी द्याव्यात. नत्राची उरलेली मात्रा त्यानंतर ४५ दिवसांनी द्यावी.

पाणी व्यवस्थापन ः
- मोसंबी फळपीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. जास्त किंवा अयोग्य पद्धतीने सिंचन केल्यास मूळकुज किंवा डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन झाडे दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी झाडांना दुहेरी आळे (डबल रिंग) पद्धतीने पाणी द्यावे.
- जमिनीचा प्रकार, हवामान, झाडाचे वय आणि वाढीची अवस्था यानुसार पाण्याचे प्रमाण व दोन पाळ्यांतील अंतर ठरवावे.
- पूर्ण वाढ झालेल्या झाडांची पाण्याची गरज ही २८ लिटरपासून ९० लिटरपर्यंत असते. या झाडांना सूक्ष्म जलसिंचन पद्धतीने हवामान व बाष्पीभवनाचा वेग याचा अंदाज घेऊन सिंचन करावे.
- सिंचन करताना पाण्याचा झाडांच्या खोडाशी प्रत्यक्ष संपर्क होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.

बहर व्यवस्थापन
- बहर धरणे म्हणजे फळझाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे. मोसंबी बाग पाच वर्षे वयाची झाल्यानंतर बहर धरण्यास सुरुवात करावी.
- मोसंबी फळझाडांस वर्षातून ३ वेळा बहर येतो. जून-जुलैमधील बहरास ‘मृग बहर’, सप्टेंबर-ऑक्टोबरमधील बहरास ‘हस्त बहर’ आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांतील बहरास ‘आंबिया बहर’ म्हटले जाते. पाण्याची उपलब्धता, बाजारातील फळांची मागणी आणि भाव, मजुरांची उपलब्धता, रोग-किडींचा प्रादुर्भाव यांचा विचार करून आंबिया किंवा मृग बहर यापैकी कोणत्याही एकाच बहराची निवड करावी. त्यानंतरच्या काळातही तोच बहर कायम धरावा.
- उन्हाळ्यात हमखास सिंचनाच्या पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी आंबिया बहर धरणे फायद्याचे ठरते. पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी मृग बहराचे नियोजन करावे.
- आंबिया बहर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असतो. कारण, या बहरात अनुकूल हवामानामुळे झाडांवरील फळे चांगली पोसली जाऊन रंग व प्रत चांगली मिळते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी असतो. तसेच बाजारभाव ही चांगला मिळतो.

आंतरपीक नियोजन

- ६ बाय ६ मीटर अंतरावरील लागवडीत मोसंबी झाडांची पूर्ण वाढ होऊन दोन ओळींतील अंतर व्यापण्यास ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागतो. अशावेळी दोन ओळींमध्ये आंतरपिकांची लागवड करता येते. आंतरपिके घेताना मुख्य पिकांकडे दुर्लक्ष होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी.
- मोसंबी लागवडीत सुरुवातीच्या पाच वर्षांपर्यंत खरीप हंगामात मूग किंवा भुईमूग, तर रब्बी हंगामात हरभरा किंवा कांदा या पिकांची आंतरपीक म्हणून शिफारस करण्यात आली आहे.

संपर्क
०२४२२-२२७२५४
०२४२६-२४३३४४
(अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्प,
उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT