Mosambi Orchard : अनेक वर्षांपासून जोपासली मोसंबी जागेवर तयार केले ‘मार्केट’

Mosambi Market : मोसंबीसाठी प्रसिद्ध असलेल्या लिंबगाव (जि. नांदेड) गोपाळराव आबनराव कदम `यांनी अनेक वर्षांपासून टिकवलेली मोसंबीची शेती आजही चांगल्या प्रकारे जोपासली आहे.
Mosambi Orchard
Mosambi OrchardAgrowon
Published on
Updated on

कृष्णा जोमेगावकर
.............................................................
Gopalrao Kadam : मोसंबीसाठी प्रसिद्ध असलेल्या लिंबगाव (जि. नांदेड) गोपाळराव आबनराव कदम `यांनी अनेक वर्षांपासून टिकवलेली मोसंबीची शेती आजही चांगल्या प्रकारे जोपासली आहे. चांगल्या व्यवस्थापनातून आश्‍वासक उत्पादन घेण्यासह परराज्यातील व्यापाऱ्यांचे जागेवरील मार्केट त्यांनी तयार केले आहे. याच पिकातून त्यांनी शेती व कौटुंबिक अर्थकारण भक्कम केले आहे.

नांदेड शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटरवर असलेले लिंबगाव (ता. नांदेड) अनेक वर्षांपासून फळपिकांसाठी प्रसिद्ध आहे. येथील गोपाळराव आबनराव कदम यांनी मोसंबी पिकात आपली ओळख निर्माण केली आहे. मोसंबी हे त्यांचे मुख्य पीक असून गेल्या काही पिढ्यांपासून त्याची जोपासना या कुटुंबाने केली आहे. त्यांच्याकडे असलेल्या चाळीस एकरांपैकी वीस एकरांत मोसंबी, १३ एकरांत ऊस तर सात एकरात सोयाबीन, मूग आदी पिके असतात. अनेक वर्षांच्या बागा काढून नव्या बागा घेणे हे सातत्याने सुरू असते. त्या अनुषंगाने पाच एकरांतील णे मोसंबी पाच वर्षांपासून उत्पादन देते आहे.

योग्य नियोजन, मुलगा विशाल व अन्य मुलांची साथ यातून दरवर्षी मोसंबीपासून काही लाखांचे उत्पन्न गोपाळराव घेतात. कमी खर्च, तुलनेने कमी देखभाल व तयार केलेली बाजारपेठ यामुळे हे पीक आर्थिक स्थैर्य देणारे ठरल्याचे ते सांगतात.

व्यवस्थापन व उत्पादन

सन २०१३ मध्ये पाच एकरांत १८ फूट बाय १८ फूट अंतरावर न्यूसेलर जातीच्या मोसंबीची लागवड केली आहे. या बागेचे उत्पादन दसरा- दिवाळीच्या दरम्यान सुरू होईल. दरवर्षी संपूर्ण काढणी झाल्यानंतर डिसेंबरच्या काळात बागेचे पाणी तोडले जाते. या काळात एक वर्षाआड एकरी तीन ट्रॅक्टर ट्रॉली शेणखताचा वापर केला जातो. वखरणी करून बाग तणविरहीत ठेवण्यात येते. बाग स्वच्छ ठेवल्यानेही किडी- रोगांपासून काही प्रमाणात बचाव होतो असे गोपाळराव सांगतात. फळपिकाची पाण्याची गरज लक्षात घेऊन सिंचनाची शाश्‍वती तयार केली आहे. तीन विहीरी असून एक ५० फूट खोल, दुसरी ७० फूट तर तिसरी १०० फूट खोल आहे. सोबतच येलदरीचे पाणी उपलब्ध होते. त्यामुळे सर्व पिकांना ठिबकद्वारे पाणी दिले जाते. शेतात कामांसाठी चार सालदार आहेत. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मोसंबी, संत्रा बागा लिंबगावात आहेत. मात्र मररोगामुळे अनेक बागा कमी झाल्या आहेत. गोपाळराव यांनी मात्र चांगले व्यवस्थापन ठेवल्याने त्यांच्याकडे रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला नाही. लागवडीला सहा वर्षे झाल्याशिवाय ते फळधारणा धरत नाहीत.

Mosambi Orchard
Mosambi Orchard : चांगल्या उत्पादनासाठी मोसंबी बागांचे आरोग्य जपा

या बागेत पहिल्या वर्षी (२०१८) एकूण क्षेत्रातून २५ टन उत्पादन मिळाले. आजमितीला ते एकरी सात ते आठ टन यानुसार एकूण क्षेत्रातून ४० टनांपर्यंत मिळत आहे. अलीकडील वर्षांत प्रति टन १८ हजार रुपयांपासून २७ हजार, ३० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

बाजारपेठेतील सतर्कता

पूर्वी गोपाळराव नागपूर बाजारपेठेत फळांची विक्री करीत. अलीकडील वर्षांत दिल्ली, कोलकता भागातील व्यापारी जागेवर येऊन खरेदी करू लागले आहेत. फळ तोडणी व पॅकिंगची जबाबदारी
त्यांच्याकडेच असते. त्यामुळे वाहतूक, मजुरी यावरील खर्चात बचत होत आहे. फळांची प्रतवारी शेतातच केली जाते. त्यामुळे चांगला दर मिळण्याचा फायदा होतो. गोपाळराव यांना पूर्वी दिल्लीसारख्या
मार्केटचा अनुभव असल्याने तेथील व्यापाऱ्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे जागेवर मालाची विक्री करण्याआधी ते त्यांच्यासोबत संवाद साधून तेथील दरांची चौकशी करतात. त्यानंतरच
पुढील व्यवहार करतात. मोसंबी पिकातूनच दरवर्षी काही लाखांचे उत्पन्न मिळण्याचा स्रोत तयार केला. त्यामुळेच गावात पक्के घर बांधणे शक्य झाले. फळांची साठवणूक करण्यासाठीही पक्की जागा तयार केली आहे. याच पिकातील उत्पन्नातून गावात इमारती घेऊन त्या भाडेतत्वावर देणे शक्य झाले. त्यातून उत्पन्नाचा स्रोत तयार केला आहे. गोपाळराव यांच्या मोठ्या मुलाचे नांदेड येथे ‘हार्डवेअर’ व ‘प्लायवूड’ चे तर दुसऱ्या मुलाचे ‘मेडिकल’ चे दुकान आहे. उसाचे दरवर्षी एकरी ७५ ते ८० टन उत्पादन मिळते.


Mosambi Orchard
Mosambi Crop: मोसंबी बागेची तहान कशी भागवावी?

मोसंबीचे गाव म्हणून ओळख

लिंबगाव येथील प्रत्येक शेतकऱ्याकडे संत्रा, मोसंबीच्या बागा पाहण्यास मिळतात. एकेकाळी सर्वत्र संत्रा, मोसंबी फळाचा पुरवठा करणारे गाव म्हणून हे गाव प्रसिद्ध होते. पंधरा-वीस वर्षापूर्वी राज्यात परवानाधारक ४२ फळरोपवाटीका होत्या. यात ३८ रोपवाटिकांचा समावेश एकट्या लिंबगावातील
होता. या ठिकाणाहून राज्यात तसेच अन्य राज्यातही मोसंबी, संत्रा रोपांचा पुरवठा व्हायचा.
परंतु मागील काही वर्षात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे येलदरी, सिद्धेश्‍वरचे पाणी मिळणे कठीण झाले. परिणामी येथील शेतकऱ्यांनी फळबागांसोबतच अन्य पिकांना प्राधान्य दिले.

नांदेड जिल्ह्यातील मोसंबी

नांदेड जिल्ह्यात २०१० पूर्वी चार ते पाच हजार हेक्टरवर मोसंबीची लागवड होती. परंतु मागील काही वर्षात पावसाचे कमी झालेले प्रमाण, रोग आदी कारणांमुळे अनेक बागा वाळून गेल्या. परिणामी क्षेत्र निम्यापेक्षाही खाली आले. सध्या एक हजार पाचशे हेक्टरवर मोसंबीची लागवड असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मोसंबीचे उत्पादन एकरी ८, १० ते १५ टनांपर्यंत शेतकरी घेतात. आजही लिंबगाव येथेच मोसंबीची सर्वाधिक म्हणजे साडेचारशे हेक्टरवर मोसंबीची लागवड आहे. ही मोसंबी स्थानिक बाजारात विकली जाते. त्यास १५ हजार ते २० हजार रुपये प्रति टन दर मिळतो. यासोबतच काही शेतकरी गाझियाबाद दिल्ली, हैदराबाद, नागपूर या ठिकाणी माल पाठवितात.
जिल्ह्यात पूर्वी स्थानिक कागदी मोसंबीचे वाण शेतकरी वापरायचे. यासाठी जंबेरी खुंट वापरण्यात यायचा. आता त्यात बदल करून रंगपूर खुंट वापरण्यात येत आहे. वाणातही बदल करून न्यूसेलरला पसंती आहे. या फळाचा आकार मोठा असून वाहतुकीसाठीही सोयीचे होते असे प्रयोगशील शेतकरी आर. पी. कदम सांगतात.

गोपाळराव कदम-९८६००६३३९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com