विनोद इंगोले
Fruit Crop Farming : उदखेड (जि. अमरावती) येथील शाश्वत मुंदडा या उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने शास्त्रीय व आधुनिक लागवड पद्धतीने फळबागा विकसित केल्या आहेत. देशातील आधुनिक तंत्रज्ञान, संस्थांशी भेट व सुधारित वाणांची निवड त्यांनी केली. आज उत्पादकता व उच्च गुणवत्ता यांचा मिलाफ घालून पेरू, सीताफळ, वांगी आदींचे यशस्वी उत्पादन ते घेऊ लागले आहेत.
प्रफुल्ल मुंदडा कुटुंबीयांची विष्णोरा शिवारात ((ता. मोर्शी, जि. अमरावती) १४० एकर शेती आहे.
सुमारे ४० वर्षांपासून या शिवारात ढेमसे, वांगी, भेंडी, शेवगा यांसह विविध भाजीपाला पिकांच्या
लागवडीत त्यांचे सातत्य आहे. त्यांची प्रयोगशीलता पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी शिवाराला भेट देत. हाच वारसा मुलगा शाश्वतने (वय ३३) जपत शेतीची जबाबदारी स्वतः सांभाळली आहे.
मुंबईहून ‘आयटी’ इंजिनिअरिंगचे शिक्षण, पुणे येथून एमबीए (ॲग्रिकल्चर) व एमए (अर्थशास्त्र) असे शिक्षण त्यांनी घेतले. उच्च शिक्षणानंतरही नोकरी, व्यवसायाऐवजी घरच्या शेतीलाच व्यावसायिक करण्याचा निर्णय घेतला.
फळबागांचे क्षेत्र
-सीताफळ- १९ एकर. त्यात सहा एकर बालानगर (२०१६ ची लागवड), एनएमके-गोल्डन (२०२० ची लागवड), चार एकर अर्कासहान (अलीकडेच लागवड), तीन एकरांवर छत्तीसगड येथील चारशे ग्रॅम फळाचे वजन देणारे वाण.
-पेरू- आठ एकरांत जंबो पेरू. बीही-१, तीन एकर तैवान पिंक. बागेत ११ ते चार वर्षे वयाची झाडे.
-ॲपल बेर- चार एकर.
अर्का सहान वाण प्रयोग व परागीभवन
भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर, बंगळूर) अर्का सहान हे सीताफळाचे वाण विकसित केले आहे. शाश्वत सांगतात, की हे वाण निवडण्यामागील कारण म्हणजे त्यातील ‘ब्रिक्स’चे प्रमाण ३२ आहे. अन्य सीताफळात हेच प्रमाण २४ पर्यंत राहते. बंगळूर परिसरात ते महागड्या दराने विकले जाते. त्याची १७०० झाडे लावली आहेत. यात परागीभवनाची प्रक्रिया हस्त पद्धतीने (मॅन्युअल) करावी लागते.
सकाळी सहा ते ९ या वेळेतच हे काम करावे लागते. याच काळात पराग सक्रिय राहतात. यामुळे फळधारणा चांगली व लवकर होते. परागीभवनासाठी इंजेक्शनच्या सिलिंडरचा वापर शाश्वत यांनी खुबीने केला आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांशीही त्यांनी सल्लामसलत कली आहे. वाणाचे उत्पादन सुरू व्हायचे आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पेरूत आधुनिक लागवड पद्धत
पेरूची १२ बाय ८ फुटांवर लागवड आहे. शाश्वत सांगतात की एकरी सुमारे ४५० झाडे बसतात.
प्रत्येक झाडाला आम्ही ३० ते ३५ किलो माल घेतो. एकरी उत्पादन १४ ते १५ टनांपर्यंत मिळते.
छत्तीसगड भागात शेतकऱ्यांकडे पाहिलेल्या एका तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत यांनी पेरू व सीताफळात केला आहे. यात जमिनीपासून पहिली तार ८० सेंमी, त्यानंतर प्रत्येकी ५० सेंमीवर पुढील दोन तारा
अशी पद्धत आहे. जमिनीपासून वरच्या तारापर्यंतचे अंतर १८० सेंमी राहते. पहिल्या तारांपर्यंत झाडाची मूळ फांदी आल्यानंतर त्यापासून केवळ दोन फांद्या वेगवेगळ्या दिशेने ठेवल्या जातात. त्यानंतर दुसऱ्या तारेवरही अशीच प्रक्रिया करून तीन टप्प्यांवर पूर्ण झाडाला केवळ सहा फांद्या राहतील यावर भर दिला जातो.
उंची कमी असल्याने अशा झाडांवर परागीभवन, तोडणी व व्यवस्थापनाच्या अन्य बाबी करणे शक्य होते. प्रत्येकी ३२ फुटांवर सिमेंट खांब आहे. या पद्धतीत दोन झाडांतील अंतर ८ फूट तर दोन ओळींतील अंतर १२ फूट ठेवले आहे.
यात पानांना भरपूर सूर्यप्रकाश मिळून प्रकाशसंश्लेषण क्रियाही चांगली होते. प्रत्येकी तीन एकर पेरू व सीताफळ बागेत हा प्रयोग आहे. या माध्यमातून फळे तुलनेने लवकर तोडणीस येतात असे शाश्वत सांगतात.
पेरूला तीन प्रकारचे कव्हर
पेरूला फोमचे कव्हर केले जाते. फळाचे ‘मेकॅनिकल’ नुकसान त्यामुळे टळते. सिलिकॉन कोटेड बॅगही लावली जाते. किडीपासून फळांचे त्यामुळे संरक्षण होते. आत पाणी जाऊन होणारे नुकसानही टळते.
अति किंवा अत्यंत कमी तापमान स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अजून एका पेपरबॅगेचे कव्हर केले जाते. यातून फळांचा दर्जाही एकसारखा मिळतो. बाजारात दर चांगले मिळतात. किडींचा प्रादुर्भाव कमी राहत असल्याने फवारण्यांवरील खर्चात बचत होते असे शाश्वत सांगतात.
उत्पादन, गुणवत्ता
सीताफळाचे एकरी ५ ते ६ टन उत्पादन मिळते. बालानगर वाणाचे २५० ते ३०० ग्रॅम वजन राहते. त्यास किलोला ४०, ५० रुपयांपासून ते ७५ रुपयांपर्यंत तर पेरूला किलोला २५ ते ३० रुपये दर मिळतो. एकाच जागी टनांनी मोठ्या प्रमाणात विविध फळे मिळत असल्याने व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात.
जंगली खुटांवरील वांगी
छत्तीसगड भागातील रोपवाटिकेतून जंगली खुंटावर वाढवलेल्या वांग्याच्या रोपांची लागवड शाश्वत करतात. त्याची मुळे किमान पाच फूट खोल जमिनीत जातात असे ते सांगतात. अशा रोपांची प्रति नग किंमत ११ रुपये आहे.
हिरवी तसेच भरीताची वांगी असून, सुमारे ३९ एकरांवर लागवड आहे. यात ठिबकचे डबल लॅटरल वापरले आहे. जंगली खुंट असल्याने त्याची मुळे अधिक पसरतात. परिणामी, त्यास पाण्याची गरज अधिक राहते.
झाडांना फळांचे वजन सांभाळाता यावे यासाठी बांबू आणि दोरीचा आधार दिला आहे. एकरी उत्पादन ४० टनांच्या पुढे असल्याचे शाश्वत सांगतात. हैदराबाद, नागपूर, गोंदिया आदी भागांत वांगी पाठवितात. यंदा जागेवरच चांगला दर मिळाल्याने ती बाहेर पाठविण्याची गरज भासली नाही.
शेतीची वैशिष्ट्ये ः
-संपूर्ण १४० एकरांसाठी पाच विहिरी व दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे. ४० एकरांवर स्वयंचलित ठिबक सिंचन.
-१०० एकरांवर फळबागा, भाजीपाला, उर्वरित ४० एकरांत कपाशी, तूर, हरभरा आदी पिके.
-मातीची सुपीकता जपण्यासाठी धैंचा गाडणे, तूर, हरभरा आदी पिके घेणे. तीन वर्षे भाजीपाला घेतल्यानंतर त्या जमिनीत पीक फेरपालट आदींचा वापर.
-दरवर्षी एकूण क्षेत्रासाठी ४० ट्रक लेंडी खत, ४० ट्रक गायीचे शेणखत व २० ट्रक पोल्ट्री खताचा वापर.
-पोल्ट्री खतात उष्णता अधिक राहते. मात्र यात कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असल्याने पिकाची अन्नद्रव्याची गरज भागविण्यासाठी वापर होतो असे शाश्वत सांगतात.
-२५ मे ते १० जून या कालावधीत पेरू आणि सीताफळ बागेत छाटणीवर भर. यासाठी परिसरातून कौशल्यपूर्ण मजूर आणले आहेत. त्यांची निवासाची व्यवस्थाही केली आहे. पेरूत ५०० फळांतून १२५ एवढीच फळे ठेवली जातात.
-रायपूर (छत्तीसगड) भाग भाजीपाला- फळे क्षेत्रात प्रगत आहे. येथे भेट देत नवे तंत्रज्ञान व व्यवस्थापन विषयक बाबींची माहिती शाश्वत घेत असतात. सीताफळ महासंघाचे श्याम गट्टाणी, अनिल बोंडे यांच्या ते संपर्कात असतात. शेतीतील प्रवासात आई सुधा, वडील प्रफुल्ल, पत्नी सलोनी यांची त्यांना भक्कम साथ आहे.
शाश्वत मुंदडा, ९८९०३८९१२९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.