फळपिके, फळभाज्यांची अर्थपूर्ण शेती

भावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई, कारली, टोमॅटो अशी फळपिके व फळभाज्यांची हंगामनिहाय सांगड घालून शेती ‘अर्थपूर्ण’ केली आहे.
Gorakh Patil showing quality product.
Gorakh Patil showing quality product.
Published on
Updated on

भावेर (जि.धुळे) येथील गोरख पाटील यांनी केळी, पपई, कारली, टोमॅटो अशी फळपिके व फळभाज्यांची हंगामनिहाय सांगड घालून शेती ‘अर्थपूर्ण’ केली आहे. कोविड संकटाच्या काळातही शेतीमालाचा थेट उठाव कायम ठेवत चांगला नफा मिळविण्यात त्यांनी सातत्य टिकवले. भावेर (ता. शिरपूर, जि. धुळे) हे अनेर नदीकाठी असलेले गाव शिरपूर शहरापासून सुमारे २२ किलोमीटरवर आहे. भागातील जलसाठे मुबलक आहेत. गावातील गोरख पाटील बंधू दीपक यांच्यासह ५० एकर शेती कसतात. सहा कूपनलिका, दोन बैलजोड्या, पाच म्हशी, तीन गायी आहेत. पशुधनाच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या शेण- मूत्राचा शेतीसाठी कार्यक्षम उपयोग ते करून घेतात. फळबागांची लागवड पाटील यांचे केळी हे पारंपरिक पीक आहे. गेल्या १५ वर्षांत त्यात बदल केले. उतिसंवर्धित रोपांचा वापर ते करतात. वर्षभर उत्पन्नस्रोत सुरू राहावा व दरांत चढउतार झाली तरी नुकसान होऊ नये यासाठी विविध पिके व त्यांचे हंगाम त्यांनी निश्‍चित केले आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दरवर्षी कांदेबाग तर जूनमध्ये मृगबाग केळीची लागवड करतात. पपईची लागवड सुमारे १५ वर्षांपासून व फेब्रुवारी काळात होते. चार वर्षांपासून टोमॅटो व कारले या पिकांवर भर दिला आहे. टोमॅटो, कारले लागवड डिसेंबरमध्ये सरू होते. दोन वर्षांपूर्वी आठ एकरांत शेवगा पिकाचा प्रयोग केला. बाजारपेठेतील मागणीनुसार खरबूज, कलिंगड ही पिकेही ते अधूनमधून घेतात. जमीन सुपीकतेवर लक्ष केळी, पपई या पिकांसाठी चांगले बेवड असावे, जमीन सुपीक असावी असा विचार पीक व्यवस्थापनात असतो. त्यातूनच पीक फेरपालटीवर भर असतो. पावसाळ्यात किंवा जूनमध्ये धैंचा या हिरवळीच्या पिकाची पेरणी होते. रोटाव्हेटरच्या साह्याने फुलोऱ्यावर येताच जमिनीत गाडतात. रासायनिक खतांपेक्षाही सेंद्रिय खतांवर भर दिला आहे. गोठ्यात गोमूत्र संकलनाची व्यवस्था केली आहे. एकरी चार ट्रॉली शेणखत वापरण्यावर भर असतो. घरच्या पशुधनाच्या माध्यमातून ते उपलब्ध होते. शिकण्याची तयारी शेतीचा व्याप अधिक असल्याने पाटील बंधू नोकरीच्या मागे लागले नाहीत. वडिलोपार्जित शेती विकसित करताना दहा एकर शेती त्यांनी विकत घेतली. खरद (ता.चोपडा) येथील डॉ. चंद्रकांत पाटील व नारोद (ता. चोपडा) येथील जितेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन ते घेतात. सुधारित तंत्र व व्यवस्थापन या अनुषंगाने प्रसंगी वयाने लहान असलेल्या मंडळींशी देखील संवाद साधून त्यांच्याकडून शिकण्याची तयारी असते. आपल्या मनमिळाऊ स्वभावातून इंदूर, सुरतसह चोपडा, जळगावपर्यंतच्या व्यापाऱ्यांशी त्यांनी संपर्क वाढवला आहे. प्रत्येक शेतीमालाचे पाच ते सात व्यापारी, त्यांचे संपर्क क्रमांक त्यांच्याकडे आहेत. चार सालगडी तैनात केले आहेत. मात्र सिंचन, खत व्यवस्थापन या जबाबदाऱ्या पाटील बंधू स्वतः सांभाळतात. पपई, केळीची विक्री व्यवस्था विक्री व्यवस्था सक्षम करण्यावर पाटील बंधूंनी भर दिला आहे. पपई व केळीची विक्री चोपडा (जि. जळगाव) येथील व्यापाऱ्यांना दरवर्षी जागेवर होते. त्यामुळे वाहतूक खर्चाची कटकट नसते. अनेरकाठी काळी कसदार जमीन असल्याने रस्ते खराब होतात. पण पपई व कांदेबाग केळीची काढणी दिवाळीनंतर सुरू होत असल्याने थेट विक्रीस अडचणी येत नाहीत. आवश्यकतेनुसार रस्ते पाटील बंधूंनी किरकोळ खर्चातून दुरुस्त करून घेतले आहेत. मृगबाग केळीची काढणीही एप्रिल, मेमध्ये पूर्ण होते. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीची वेळ येत नाही. बाजारपेठा भावेर गाव बऱ्हाणपूर-अंकलेश्‍वर राज्यमार्गावर आहे. तेथून सुरत, इंदूर बाजारपेठांना काही तासांत माल पाठविणे शक्य होते. मालवाहू वाहनेही लवकर उपलब्ध होतात. त्यामुळेच पाटील यांच्यासाठी या बाजारपेठा अधिक सोईस्कर ठरल्या आहेत. पाचशे रुपये प्रति क्विंटलचा वाहतूक दर पडतो. इंदूर येथील बाजार २४ तास सुरू असतो. त्यामुळे कोविड संकटाच्या काळातही टोमॅटो, कारले विक्रीस अडचण आली नाही. केळी (कांदेबाग) लागवड सुमारे १० एकर असते. लागवड अंतर सहा बाय पाच फूट ठेवले आहे. मृगबाग केळी १३ एकरांत असते. पपई सुमारे सहा एकर तर टोमॅटो चार ते पाच एकरांत असतो. गादीवाफा (बेड) पद्धतीने लागवड असते. कारल्याचे क्षेत्रही चार ते साडेचार एकरांत असते. केळीची प्रति रास २० ते २२ किलोची मिळते. पपईचे प्रति झाड ३० ते ३५ किलो उत्पादन मिळते. दरांची निश्‍चिती नसली तरी केळी प्रति किलो ११ रुपये, पपई सात ते ९ रुपये, कारले १५ ते २० रुपये असे दर मिळतात. अशी राहिली पपई बाजारपेठ खानदेशात पपईची लागवड धुळे, नंदुरबार भागांत अधिक होते. लवकर येणाऱ्या वाणांची निवड करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. काढणी ऑक्टोबर महिन्यात सुरू होते. या महिन्यात दोन वर्षांपासून सरासरी १२०० रुपये प्रति किलो दर आहेत. ९० टक्के विक्री थेट जागेवर होते. बाजार समितीत जाण्याची कटकट राहत नाही. हंगामाच्या सुरुवातीला दर चांगले मिळतात. यामुळे लागवडीचा पॅटर्न काहीसा बदलला असून अनेक शेतकरी फेब्रुवारीच्या सुरुवातीला लागवड करू लागले आहेत. पपईची मागणी पपईला राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशात मागणी असते. शहादा (जि. नंदुरबार), शिंदखेडा (जि. धुळे), चोपडा (जि. जळगाव) येथील मध्यस्थांच्या मदतीने पपईचा पुरवठा उत्तर भारतातील मोठ्या खरेदीदारांना होतो. हिवाळ्यात मागणी टिकून असते. मागील नोव्हेंबरमध्ये प्रति दिन १७ ट्रक (प्रति सुमारे १५ टन क्षमता) आवक झाली. डिसेंबर, जानेवारीत आवक आणखी वाढली. या काळात दर प्रति किलो सरासरी नऊ रुपये तर एप्रिलमध्ये यंदा चार रुपये दर जागेवर मिळाला. प्रक्रिया उद्योगातून मागणी कायम असते. शेतकरी मार्चमध्ये काढणीस सुरुवात करतात. या काळात मागणी कमी असते. यामुळे दरात फारशी वाढ होत नाही. कोविडच्या काळात गुणकारी फळ म्हणून पपईचा उठाव राहिला आहे. यामुळे मागील दोन हंगाम दरांत फारशी पडझड झाली नाही. संपर्क ः गोरख पाटील, ९९२२३२१५२९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com