मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Warehouse Flooring Excavation and Layering : गोदाम निर्मितीमध्ये गोदामाचा पाया, छत, अंतर्गत रस्ते, फुटपाथ, वजन काट्याची उभारणी या बाबी महत्त्वाच्या आहेत. गोदाम उभारणीकरिता आवश्यक साहित्य जसे की सिमेंट, वाळू, खडी, लोखंड यांची उत्तम गुणवत्ता असणे तितकेच महत्त्वाचे असते. राज्यात विविध प्रकल्पात व शासकीय योजनांमध्ये गोदाम उभारणी करण्यात येत आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम निर्मितीबाबत तांत्रिक माहिती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट या समुदाय आधारित संस्था व उद्योजक यांना असणे आवश्यक आहे.
खोदाई
कोरड्या व सुक्या पायात खोदाई करताना कॉलमचे खड्डे किमान १.५० मीटर, तर काळ्या मातीत व मुरमात किमान ३० सेंमीपर्यंत घ्यावेत. बीम सरासरी १५ सेंमी खाली असावे. पाया खोदून झाल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी. पाया खोदाई करताना जमीन समतल असावी.
काळ्या मातीत खोदाई करणे
काळ्या मातीत किंवा मऊ जमिनीत बांधकाम करताना भिंतींना तसेच तळवटाला ओलावा येऊ नये व ॲप्रन, गटार यास ताकद येण्यासाठी १.५० मीटर खोली घेऊन जमिनीखाली बीमला आरसीसीची पडदी १५ बाय २० सेंमी मापाची असावी.
गोदामाच्या आतील भागाची खोदाई
गोदामाच्या तळवटाला ताकत येण्याकरिता तळवट थरापासून १ मीटर खोलीची खोदाई करून काळी माती बाहेर काढावी. नंतर खोदलेला भागावर तसेच मुरूम, खडीचे थर यावर पाणी मारून दबाई करावी. त्याचे छायाचित्र काढून कार्यवाहीची नोंद वरिष्ठ कार्यालयास सादर करावी.
संरक्षण भिंत व गटार खोदाईची पद्धत
संपूर्ण जागेची लेव्हल घेऊन गटार व्यवस्था चढ-उताराप्रमाणे कशी असावी व आवारातील पावसाचे पाणी आवाराच्या बाहेर कसे काढावे याचा आराखडा तयार करावा. प्रकल्पाचा खर्च किफायतशीर होण्यासाठी गोदाम व संरक्षण भिंत यांचा उपयोग करून एक गटार योजना तयार करावी. छताचे पाणी त्या गटारात योग्य पद्धतीने नियोजन करावे.
सिमेंट काँक्रीट १:५:१० प्रमाणे
सिमेंट काँक्रीट १:५:१० प्रमाणे सिमेंट, वाळू व खडीचे प्रमाण तयार करून पायातील काँक्रीटचे काम सुरू करण्यापूर्वी एखाद्या गोदामाचे काम सुरू असेल, तर त्याकरिता सक्षम अधिकाऱ्याची लेखी मंजुरी घ्यावी.
काँक्रीट मिश्रण
काँक्रीटचे मिश्रण करण्यासाठी मॅकेनिकल मिक्सरची मदत घ्यावी. काँक्रीट मिक्सरचे काँक्रीटच्या प्रत्येक टप्प्यास छायाचित्र घेऊन प्रत्येक चालू देयकासोबत प्रकल्पाच्या सक्षम अधिकाऱ्यास सादर करावे. काँक्रीटचे मिश्रण एकसंध होण्यासाठी दबाई करावी.
सिमेंट काँक्रीट (फुटिंग /कॉलम/ बीम/स्लॅब)
लोखंडी सळई
सिमेंट काँक्रीटमधील लोखंडी सळई भारतीय मानद ४३२-१९६६ अंतर्गत निश्चित केलेली व प्रथम दर्जापेक्षा कमी नसलेली व त्यानुसार तपासणी केलेली असावी. सर्व सळ्या जागेवर ठेवण्यापूर्वी धूळ, तेल, रंग, ग्रीस व कचरामुक्त असाव्यात. ठेकेदारांनी त्यांच्या उत्पादकाचे चाचणी केलेले प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे. भारतीय मानद १५२१ नुसार परंतु वेगळी चाचणी करावी. साहित्याच्या चाचणीचा खर्च ठेकेदारांनी अदा करावा. सळई किंवा टीएमटी ५०० सळई स्क्रॅप लोखंडापासून तयार केलेली नसावी. लोखंडी सळई योग्य लांबीच्या असाव्यात.
खडी
खडी कठीण दगडापासून तयार केलेली असावी. खडीचा आकार हा २० मिलिमीटर किंवा ६० मिलिमीटर आणि दोन बारच्या समांतर अंतर किंवा कव्हर यापेक्षा जे कमी असेल ते याप्रमाणे असावा. खडी साधारण हिऱ्याच्या आकारमानाची असावी. ती भारतीय मानद २२३-१९७० व ५१५-१९५९ प्रमाणे प्रमाणित असावी.
वाळू
काँक्रीटसाठी वाळू वापरताना ती नैसर्गिक किंवा बारीक खडीची चाळलेली असावी. वाळू ही चांगल्या प्रतीची आणि त्यात माती, धूळ वगैरे नसावी. वाळूमध्ये मातीचे प्रमाण ४ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
मिश्रण
काँक्रीट हे यांत्रिकी मिक्सरमध्ये करावे. मिक्सर आणि इतर सामग्री चांगल्या स्थितीत आहेत का नाहीत याची पाहणी करावी. मिश्रण चालू असताना त्यात सर्व बांधकाम सामग्रीचे एकसारखे प्रमाण पडावे व त्याला एकसारखा रंग असावा. प्रत्येक मोठ्या खडीभोवती सिमेंटचे व वाळूचे मिश्रण असलेले पूर्ण आवरण व त्यात योग्य प्रमाणात सिमेंट टाकलेले असावे. वाळू, पाणी व सिमेंट यांचे एकमेकांशी प्रमाण १:१.५:३ व काँक्रीट मिश्रणासाठी ०.५५ ते ०.६४ च्या दरम्यान असावे. १:१.५:३ मिश्रणाचे काँक्रीट कॉलम, बीम, छज्जा, स्लॅब इ. बाबींसाठीच्या जागेवर ओतल्यानंतर ते योग्य प्रकारे खचणे, यांत्रिक पद्धतीने कंपण (Vibrator) करणे गरजेचे आहे. मिश्रण तयार केल्यापासून ते ३० मिनिटांच्या आत संबंधित कामासाठी वापरण्यात यावे.
दबाई
काँक्रीट भरताना खडी, वाळू, पाणी व सिमेंट विलगीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. दबाई साधारणपणे यांत्रिकी कंपन मशिनद्वारे करावी. त्यामुळे एकसंघ काँक्रीट तयार होते. सळईच्या भोवती सर्व बाजूंनी काँक्रीट व्यवस्थित भरावे. जेणेकरून पोकळ जागा राहणार नाही. स्लॅबची दबाई करताना टॅम्पिंग सळई, स्क्रीड बोर्ड, टॅम्परर्झ सळई इत्यादींचा वापर करावा.
सेट्रिंग
काँक्रीट भरण्यापूर्वी प्रत्येक आकाराच्या आतला भाग जो काँक्रीटच्या सान्निध्यात येणार आहे, त्यावर मिनरल ऑइल किंवा योग्य त्या साहित्याचे आवरण करावे. फॉर्मवर्क म्हणजेच पिलर, स्लॅप इत्यादींकरिता वापरण्यात आलेले लाकडाचे व प्लायवूडचे साहित्य काढून टाकल्यावर काँक्रीटच्या भागाला हातोडीने टाचा मारून तो भाग ओल्या बारदानाने झाकून टाकावा.
कॉलम
कॉलमच्या बाजू लावताना त्याच्या तीन बाजू पूर्ण उंचीपर्यंत लावून घ्याव्यात. चौथी बाजू १ मीटर अशा टप्प्यात लावावी. त्यामुळे दबाई व भराई करण्यासाठी योग्य ती उंची मिळून जाईल. कॉलमच्या फॉर्मवर्कचा ओळंबा कॉलम भरण्यापूर्वी व भरल्यानंतरही तपासावा.
बीम
बीमच्या खालच्या भागाला, सूचनेनुसार थोड्या (स्पॅनच्या) अंतराचा उंचवटा द्यावा.
स्लॅब
अभियंत्यांच्या मार्गदर्शनाने क्लॅम्पस आणि हुक्स असतील तर ते फॉर्मवर्कमध्ये लावावेत. तसेच लावण्याचे ठिकाण सक्षम अभियंत्याकडून मंजूर करून घ्यावे.
भराई
काँक्रीट भरताना विशिष्ट भाग एकावेळेत पूर्ण करण्यासाठी निवडावा. गोदामाच्या प्लॅनमधील नकाशामध्ये दाखविलेल्या ठिकाणीच फक्त बांधकामाचे जोड सोडावेत. शेवटच्या टप्प्यात भराई झाल्यानंतर १४ दिवसांपर्यंत पाणी मारणे गरजेचे आहे.
बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या गुणवत्ता तपासणीमध्ये काँक्रीटची तपासणी करण्यासाठी नमुना घेताना सहा भागांचा १ नमुना किंवा ६० घनमीटर क्षेत्रातील एक नमुना (दोन्हींमधील जे कमी असेल ते) निवडावा व तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावा. जर खडीची प्रत बदलत असेल, तर बदलेल्या खडीनुसार त्याचे सहा भाग तयार करून त्यापैकी तीन ७ दिवसांचे पाणी मारलेले व उरलेले तीन २८ दिवसांचे पाणी मारलेले तपासणीसाठी प्रयोगशाळेत घेऊन जावेत.
गोदाम बांधकाम संदर्भात मार्गदर्शक मुद्दे
सिमेंटचा दर्जा : सिमेंट मान्यताप्राप्त कंपनीचे असावे. त्याचे गुणवत्ता तपासणी प्रमाणपत्र गरजेचे आहे.
वाळूचा दर्जा : योग्य आकारमानाची व चाळलेली असावी. वाळूमध्ये मातीचे प्रमाण ४ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये.
सेंट्रिंग व शटरिंग : सेंट्रिंग व शटरिंग हे प्लायवूडचे किंवा लोखंडाचे असावे. हे साहित्य एका पातळीत आहे का पाहावे. नसल्यास तसे करून पक्के करावे, त्यामुळे स्लॅब व बीमचा तळ अंतिमत: एका पातळीत तयार होईल. शटरिंगचे टेकू पुरेसे वजन घेण्याच्या ताकदीचे असावेत.
महत्त्वाच्या बाबींचे काम करताना घ्यावयाची काळजी
आरसीसी फुटिंग, कॉलम, बीम, ट्रिमिक्स काँक्रीट याचे काम अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली करावे. लोखंडी सळई योग्य प्रकारे ठेवून काँक्रीट योग्यरीत्या कालवून ते ओतून व्हायब्रेटरने त्याची दबाई करावी. काँक्रीटमध्ये पाणी जास्त असेल, तर ते ठिसूळ होते. त्यामुळे पाणी व सिमेंटचे प्रमाण योग्य असावे.
साइटवर येणारे बांधकाम साहित्य उदा. खडी, विटा, वाळू व सळई इ. योग्य गुणवत्तेचे असेल तरच ट्रकमधून बांधकामाच्या ठिकाणी उतरवून घ्यावे. अन्यथा उतरवून घेऊ नये.
बांधकामासाठी वाळू, सिमेंट, खडी योग्य प्रमाणात घेण्यासाठी मोजमाप बॉक्स वापरावे. कारण योग्य प्रमाणाने काँक्रीटची ताकद वाढते. अंदाजे घमेल्याने बांधकाम साहित्य मोजू नये.
मान्यताप्राप्त ब्ल्यूप्रिंट नकाशाप्रमाणे कामास सुरवात करावी. त्यामध्ये फेरफार करण्यात येऊ नये.
(माहितीचा स्रोत : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्त अभियंता यांच्याकडून प्राप्त माहिती)
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.