Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदामाच्या छताची उभारणी

Warehouse Construction : गोदामाची निर्मिती करताना अभियांत्रिकी शाखेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. यामध्ये गोदामाशी निगडीत प्रत्येक घटक जसे की, गोदामाच्या परिसरातील अंतर्गत रस्ते, फुटपाथ, छत, कुंपण, वजन काटा इत्यादी घटकांच्या उभारणीस अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Agriculture Warehouse
Agriculture WarehouseAgrowon
Published on
Updated on

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Construction of a Roof for a Warehouse : गोदामासाठी छताची निर्मिती करताना मूळ सांगडा, त्याला जोडणारे परलीन, एकमेकांना जोडणारे खांब, हवेला प्रतिरोध करणारे ब्रेसिंग्स इत्यादी साहित्य एमएस प्रकारात आयएस:२२६, आयएस:२०६२ या इंडियन स्टँडर्डनुसार वापरावे. छताचे फॅब्रिकेशन आणि निर्मिती आयएस:८०० या इंडियन स्टँडर्डनुसार असावे. वाऱ्याचा वेग ४० मीटर प्रती सेकंद किंवा गोदामाच्या उभारणीच्या स्थानानुसार लक्षात घेऊन त्यानुसार छताचे नियोजन करावे. छताचा सांगडा तयार करताना त्यात वापरण्यात येणारे स्टील किंवा लोखंडी साहित्याचे वजन नियमानुसार गोदामाच्या एकूण बांधकाम क्षेत्राच्या २५ किलो प्रती चौरस फूट असावे.

छताचे पत्रे

छताची निर्मिती करताना विविध प्रकारचे पत्रे वापरण्यात येतात. अॅसबेसटॉस सिमेंटचे पत्रे किंवा जीआयचे रंगीत पत्रे गोदामाच्या छत निर्मितीसाठी वापरले जातात.

छताच्या विविध प्रकारामध्ये सहा मिलिमीटर जाडीचे कोरूगेटेड एसी शीट किंवा ०.५० मिलिमीटर जाडीचे जीआयचे रंगीत शीट किंवा ट्रॅफोर्ड पद्धतीचे शीट वापरण्यात यावेत.

कोरूगेटेड एसी शीट पद्धतीच्या छताकरिता ८ मिलिमीटर जाडीचे जीआय आणि “जे” पद्धतीचे हूक आणि बिटूमेन प्रकारचे वॉशर्स वापरण्यात यावेत. जीआय प्रकारच्या छताच्या निर्मितीकरिता सेल्फ टॅपिंग पद्धतीचे स्क्रूचा उपयोग करण्यात यावा.

छत निर्मितीसाठी किंवा सर्व प्रकारच्या गोदामाचे कामकाज करण्यासाठी वापरण्यात येणारे स्टील किंवा लोखंडी साहित्याला रेड ऑक्साइड किंवा झिंक क्रोमेट यापैकी जे उपलब्ध असेल ते किंवा ज्याची शिफारस असेल त्या रसायनाने एक थर लावावा. त्यानंतर त्यावरून दोन थर सिंथेटिक ईनामेल पेंट (ऑइल पेंट) लावण्यात यावा. यामुळे छताला वापरण्यात येणाऱ्या लोखंडी साहित्याचे आयुष्य वाढते.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम उभारणी करतानाचे नियोजन

छताला गोदामाच्या गरजेनुसार व गोदामाच्या आकारमानानुसार ६०० मिलिमीटर व्यासाचे टर्बो व्हेंटीलेटर्स वापरण्यात यावेत. गोदामाच्या छताच्या मध्यभागी प्रत्येक ५ मीटरच्या अंतराने एक टर्बो व्हेंटीलेटर असे प्रमाण गृहीत धरून ते बसविण्यात यावेत. गोदामाच्या आतील भागातील हवा व वातावरण उत्तम राहण्याच्या अनुषंगाने टर्बो व्हेंटीलेटर्सची व्यवस्था असणे महत्त्वाचे आहे.

गोदाम क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार २००० मेट्रिक टन क्षमतेपर्यंतच्या गोदामाला टर्बो व्हेंटीलेटरची आवश्यकता नसते. परंतु हवामान बदलामुळे टर्बो व्हेंटीलेटर बसविण्याची आवश्यकता गोदाम व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना वाटू लागली आहे. त्यामुळे टर्बो व्हेंटीलेटर बसविण्यात यावेत.

गोदाम समुद्र किनारा असणाऱ्या परिसरात असेल तर गोदामाला वापरण्यात येणारे लोखंडी किंवा पोलादी साहित्य गंजण्याची शक्यता असते. याकरिता सँड ब्लास्टिंग किंवा ईपॉक्सी कोट पेंटिंगचा थर गोदामाला वापरण्यात येणाऱ्या लोखंडी अथवा पोलादी साहित्याला वापरण्यात यावा.

कुंपण निर्मिती

गोदामाच्या परिसरात कुंपण निर्मिती ही अत्यंत महत्त्वाची बाब असून कुंपण हा घटक गोदामाच्या सुरक्षिततेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. गोदामाच्या परिसरात कुंपण निर्मिती हा “वखार विकास व नियामक प्राधिकरण” म्हणजेच डब्लूडीआरए या प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गोदामाचे प्रमाणीकरण करण्यासाठी डब्लूडीआरएच्या नियमांमध्ये कुंपण निर्मितीस अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गोदामासाठी कुंपणाचे विविध प्रकार

तारेचे कुंपण

सिमेंट ब्लॉकचे कुंपण

सिमेंट, विटा, वाळूने बांधलेले कुंपण

गोदामाच्या चहूबाजूने कुंपण निर्मिती हे विस्ताराचे काम असल्याने त्यासाठी विविध ठिकाणी पाया खणावा लागतो. हे काम जलदगतीने आणि आर्थिकदृष्ट्‍या योग्य खर्चात व्हावे, यासाठी त्वरित आणि तांत्रिकदृष्ट्या योग्य निर्णय घेणे आवश्यक असते. यात दिरंगाई केल्यास वेळेबरोबरच प्रकल्प किंमत आणि देखभाल खर्चात सुद्धा वाढ संभवते.

कुंपण भिंत उभारताना सुरुवातीला त्याचा पाया खणावा लागतो. काळ्या मातीची जमीन असेल तर काळी माती काढून घ्यावी व त्यानंतर मुरुमाच्या जमिनीचा थर असेल त्यावर पाया तयार करण्याची प्रक्रिया सुरू करून खड्डे घेऊन पायाचे बांधकाम, प्लिन्थ किंवा पायाचे बिम तयार करून नंतर त्यात पुन्हा कडक मुरूम किंवा वाळू भरून घ्यावी.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : विविध साहित्यांची गोदामात साठवणूक

लवकरच जमिनीत मुरुमाचा पाया लागला तर त्यावर पायाची भिंत दगडाचा अथवा विटांचा वापर करून संपूर्ण कुंपणाची निर्मिती करावी. परंतु जर जमिनीत कठीण मुरुमाचा पाया खणताना खूप खोल पर्यन्त जावे लागत असेल तर आरसीसीच्या कुंपणाची भिंत बांधताना पाया, त्यावर कॉलम, प्लिन्थ किंवा पायाचे बिम, विटांचे पॅनेल आणि आरसीसीचे आवरण अशाप्रकारे टप्पे करण्यात यावेत.

जर अतिरिक्त सुरक्षेची आवश्यकता असेल तर दगड किंवा विटांच्या ६ ते ७ फूट उंच कुंपणाच्या भिंतीवर ५०० मिलिमीटर उंचीचे लोखंडी तारेचे ३ ओळींचे कुंपण तयार करून लोखंडी वाय आकाराच्या खांबाचा ३००० मिलिमीटर अंतरावर मधोमध आधार द्यावा.

जर तात्पुरते कुंपण उभारायचे असेल तर ४५० बाय ४५० बाय ४५० मिमी एम १५ ग्रेडचा कॉंक्रिटचा पाया जमिनीत उभारावा. त्यावर १.५० ते १.८० मीटर उंच लोखंडी खांब ३ मीटर अंतरावर उभारून ५ ते ७ लोखंडी तारांच्या ओळीची मांडणी करून दोन तारांमध्ये प्रत्येकी ३०० मिलिमीटर अंतर ठेवावे.

सिमेंटच्या भिंतीचे विटा, वाळू किंवा दगड वापरून तयार केलेले कुंपण मजबूत असते परंतु त्यास साहित्याचा खर्च, मजुरी व वेळ याची आवश्यकता असते.

कमी खर्चात, कमी वेळेत, मजबूत कुंपण उभारायचे असेल तर आजकाल बाजारात तयार सिमेंटचे खांब व भिंत उपलब्ध असते. ज्या ठिकाणी कुंपण बांधायचे आहे, त्याठिकाणी पारंपरिक पद्धतीने पायाची उभारणी करावी. त्यात प्रत्येक १० फूट अंतरावर ७ ते ८ फूट उंचीचे खांब उभारावेत. दोन खांबांना असणाऱ्या खाचेत १ बाय १० फूट मापाच्या सिमेंटच्या तयार भिंतीच्या प्लेट किमान ६ फूट व गरजेनुसार जास्तीत जास्त ७ ते ८ फूट उंचीपर्यंत बसविण्यात याव्यात.

साधारणपणे २ ते ३ दिवसात सुमारे १०० फूट लांबीचे सिमेंटच्या भिंतीचे कुंपण बांधून होते. मजबूत कुंपण बांधण्याची ही सर्वात जलद पद्धती आहे. या कुंपणास गुणवत्ता, उंची, रंग व रचना यानुसार प्रती चौरस फूट ४५ ते ९० रुपये खर्च अपेक्षित असून सद्यःस्थितीत या पद्धतीस प्राधान्य देण्यात येते.

प्राथमिक कृषी सहकारी संस्थांची गोदामे फारच लहान असल्याने गोदामाची क्षमता वाढवायची असेल तर जागेचा अभाव असल्याने गोदामाच्या क्षमतेत वाढ करणे अशक्य असते. मग गोदामाची क्षमता वाढविण्यास जागा नसेल तर, गोदामाला कुंपण बांधणे ही अशक्यप्राय गोष्ट असते. तरीही काही जुन्या गोदामांना उत्तम सिमेंट व दगडाचे कुंपण बांधलेले आपणास दिसून येईल.

(माहितीचा स्रोत: भारतीय अन्न महामंडळ माहिती पुस्तिका व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे सनदी अभियंता यांची गोदाम उभारणी विषयक माहिती पुस्तिका)

परिसरातील रस्ते

गोदाम परिसरात अंतर्गत रस्ते गोदामात साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनाच्या किंवा शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी कठीण मुरूम गोदामाच्या अंतर्गत भागातील रस्ता बनविण्यासाठी वापरण्यात यावा.

अंतर्गत रस्ते बनविण्यासाठी मुरूम अंथरल्यानंतर त्यावर २०० मिमी जाडीच्या दगडाच्या खडीचा १५० मिमी रुंदीचा थर देण्यात यावा. त्यानंतर त्यावर १२५ मिमी जाडीच्या दगडाच्या खडीचा १०० मिमी रुंदीचा थर देण्यात यावा. त्यावर पाण्याचा फवारा मारून रोडरोलरने मुरूम, खडीला दाब देऊन रस्ता तयार करण्यात यावा.

रस्ता बनविताना मुरूम व मोठी खडी यांच्या वापरानंतर ५० मिलिमीटर जाडीच्या बारीक खडीचा वापर ३ किलो प्रती चौरस मीटरवर अंथरण्यात येऊन त्यावर रोडरोलरने दाब देण्यात यावा. याला मॅकडम पद्धत म्हणतात. सुमारे १८०० ते १९०० च्या शतकातील कार्यकाळात जॉन मॅकडम यांनी रस्ता बनविण्याच्या पद्धतीत जाड खडी व मुरूम अंथरल्यानंतर बारीक खडी व त्यावर डांबर आणि आवश्यकतेनुसार त्यावर बारीक खडीचा थर देण्यात येतो. यामुळे या पद्धतीला मॅकडम पद्धत असे संबोधले जाते.

गोदामाच्या अंतर्गत रस्त्याच्या मॅकडम थरानंतर त्यावर २० मिलिमीटरचा प्रीमिक्स बिटूमिनस खडीचा एक अंतिम थर देण्यात यावा. जेणेकरून रस्त्याला वापरलेले डांबर सुकून उत्तम रस्ता तयार होण्यास मदत होते.

दोन गोदामे विरुद्ध दिशेला तयार करण्यात येत नसल्यास अंतर्गत रस्ते किमान सहा मीटर रुंदीचे असावेत. परंतु जर दोन गोदामे विरुद्ध दिशेला तयार करण्यात येत असल्यास, दोन गोदामांमधील अंतर किमान १० मीटर ठेवावे व अंतर्गत रस्ते किमान ६.४० मीटर रुंदीचे (१०-२ बाय ६.४०) असावेत.

ट्रक ट्रेलरची वाहतूक गोदाम परिसरात होणार असेल तर दोन विरुद्ध दिशेला असणाऱ्या गोदामांमध्ये किमान १२ ते १५ मीटर अंतर असावे. त्यामुळे ट्रक ट्रेलर अंतर्गत रस्त्यावरून सहजपणे वळविणे शक्य होईल.

प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com