Bidri Sugar Factory News : कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री आणि भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका सुरू आहेत. दरम्यान बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जोरदार रंगत आली आहे. बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणूक मैदानात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी उडी घेतली आहे.
आमदार सतेज पाटील यांच्य कारखाना कार्यक्षेत्रातील त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या फोटोसह जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. त्यावरून पाटील हे या कारखान्याच्या निवडणुकीत उतरण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, गेल्या निवडणुकीत त्यांनी सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला होता. त्यातून त्यांना करवीर तालुक्यातून एक जागा दिली होती. या जागेवर निगवे खालसा येथील श्रीपती पाटील या त्यांच्या कार्यकर्त्यांला संचालक पदाची लॉटरी लागली होती. यावेळीही ते सत्तारूढ गटासोबत जातील, अशी शक्यता आहे, पण त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
बिद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १ नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. पहिल्याच दिवशी सत्तारूढ गटाने अर्ज दाखल केले होते. आज काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी कार्यकर्त्यांनी दाभोळकर कॉर्नर ते भूविकास बँकेतील निवडणूक कार्यालयापर्यंत मोठी रॅली काढली.
भुदरगडसह राधानगरी तालुक्यात काँग्रेसच्या माध्यमातून पाटील यांनी चांगली बांधणी केली आहे. त्या जोरावर त्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतल्याची चर्चा आहे, पण त्यांचा पाठिंबा कोणाला हे अजून गुलदस्त्यात आहे. गेल्यावेळी ते सत्तारूढ गटासोबत राहीले होते. यावेळी राज्यातील राजकारणाचे चित्र बदलले आहे.
'बिद्री' च्या सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीसोबतच संधान बांधले आहे. अशा परिस्थितीत आपण पुन्हा सत्ताधाऱ्यांसोबत जायचे का ? हा त्यांच्यासमोरचा प्रश्न आहे. पण स्थानिक पातळीवरील जिल्हा बँक, गोकुळचे राजकारण पाहता ते सत्तारूढ गटासोबत जातील, अशी शक्यता आहे.
आबिटकरांना धक्का बसण्याची शक्यता
आबिटकर यांच्यासाठी धक्का 'बिद्री'च्या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेससह भाजपची आघाडी होती. त्यानंतर झालेल्या 'गोकुळ' च्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकलेले आमदार प्रकाश आबिटकर यांनी शेवटच्या क्षणी आमदार पाटील यांच्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता 'बिद्री' च्या निवडणुकीत आमदार पाटील सत्ताधाऱ्यांसोबत राहिल्यास आबिटकर यांच्यासाठी हा धक्का असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.