Kolhapur Sugar Factory News : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून करवीर आणि कागल तालुक्यांना ओळखले जाते. दरम्यान या दोन्ही तालुक्यातील सहकारी सस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.
जिल्ह्यात जवळपास १९०० सहकारी सस्थांच्या निवडणुक होणार आहेत यामध्ये महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भोगावती सहकारी साखर कारखाना आणि दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्रीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
काँग्रेस आमदार पी.एन.पाटील यांच्या ताब्यात असलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्यासाठी १९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर बिद्री सहकारी साखर कारखान्यासाठी ३ डिसेंबरला मतदान होणार आहे. 'भोगावती'ची अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर 'बिद्री'साठी २६ ऑक्टोबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.
जून आणि जुलै महिन्यात होणाऱ्या निवडणुका पावसाच्या कारणामुळे ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती; पण 'भोगावती'ची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया त्यावेळी सुरू होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी स्थगिती आल्याने 'भोगावती'ची प्रक्रिया ठप्प झाली होती.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने ९ ऑक्टोबरपासून सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवल्यानंतर आज प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने या दोन्हीही कारखान्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
'भोगावती' कारखान्यावर गेल्या पाच वर्षांपासून आमदार पी. एन. पाटील गटाची सत्ता आहे; पण यावेळी पाटील यांनी अर्ज दाखल केलेला नाही. करवीर व राधानगरी तालुक्यात कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. कारखान्याचे सुमारे ३४ हजार ५०० सभासद आहेत.
तर 'बिद्री'वर गेल्या दहा वर्षांपासून माजी आमदार के. पी. पाटील गटाची सत्ता आहे. त्यांच्यासमोर आमदार प्रकाश आबिटकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आव्हान उभे केले आहे. कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यांतील २१८ गावांमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र असून, ६७ हजार सभासद मतदानासाठी पात्र आहेत.
या दोन्ही कारखान्यांतील संचालक पदाच्या २५ जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी २० जागा उत्पादक गटातून, दोन महिला प्रतिनिधी तर प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व भटक्याविमुक्त प्रवर्गातील आहेत.
'बिद्री' साठी प्रभारी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, तर 'भोगावती' साठी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.