Satara News : जिल्ह्यात बहुतांश पाण्याची उपलब्धता वाढल्याने ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. महाबळेश्वर तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत ऊस लागवड झाली आहे. जिल्ह्यात आडसाली, पूर्वहंगामी, सुरू हंगामात ७५ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागण झाली आहे. तसेच खोडवा उसाचे ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर असल्याने पुढील गाळप हंगामात तब्बल एक लाख सात हजार ८२५ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळप हंगाम उसाअभावी १५ मार्चअखेर संपण्याची शक्यता आहे. मागील वर्षी उसाची कमी झालेली लागवड तसेच कारखान्यांची वाढलेली संख्या यामुळे या गाळपास ऊस कमी पडत आहे. मात्र पुढील वर्षी परिस्थिती बदलणार आहे. या वर्षी दमदार पाऊस झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
जिल्ह्यात आडसाली, पूर्व, सुरू या तीन हंगामांत ऊस लागवड करण्यात आलेली आहे. पूर्वेकडील माण, खटाव, खंडाळा, कोरेगाव, फटलणच्या दुष्काळी भागात ऊस लागवड केली जात आहे. या परिसरात साखर कारखाने झाल्याने उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. ऊस लवकर तुटावा तसेच उत्पादन जास्तीचे मिळावे या दृष्टीने सर्वाधिक आडसाल ऊस लागवड होत आहे.
यामध्ये को ८६०३२ या वाणास पंसती दिली जात आहे. १५ जुलै ते ३० ऑगस्टपर्यंत आडसाली ऊस लागवडी कालावधी असतो. मात्र या वेळी बहुतांशी भागात जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच ऊस लागवडीस प्रारंभ झाला होता. या हंगामात आतापर्यंत ३० हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
सप्टेंबर ते नोव्हेंबर या पूर्वहंगामी कालवधीत २९ हजार ९९३ हेक्टर, तर सुरू हंगामात १४ हजार ५८८ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. वाई तालुक्यात हळद निघाल्यावर त्या क्षेत्रात उसाची लागवड केली जात असल्याने सुरू हंगामात उसाचे क्षेत्र अजून वाढणार आहे.
तसेच आतापर्यंत ३२ हजार ३८० हेक्टर उसाचा खोडवा ठेवला आहे. एक महिना ऊस गाळप हंगाम पुढे गेल्याने अजून काही कारखान्यांच्या आडसाली, पूर्वहंगामी तसेच सुरू हंगामातील ऊस तुटलेला नाही.
तालुकानिहाय आडसाली ऊस क्षेत्र (हेक्टरमध्ये)
सातारा १९,८३०, जावळी १,२९१, पाटण ५,१८०, कराड ३०,२०६, कोरेगाव १३,५२२, खटाव ७,१२३, माण १,६१८, फलटण २०,१९५, खंडाळा ४,४३३, वाई ४, ४२७.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.