Draganfruit Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Dragon Fruit Farming : काबाडकष्टाच्या शेतीत ‘ड्रॅगनफ्रूट’ ने दाखवला मार्ग

Dragon Fruit Cultivation : नाशिक जिल्ह्यांतील रायते (ता.येवला) येथील सरला व जगन्नाथ या चव्हाण दांपत्याने २०१९ मध्ये दोन एकरांत ड्रॅगनफ्रूट लागवडीचे धाडस केले.

Mukund Pingle

मुकुंद पिंगळे

Nashik News : नाशिक जिल्ह्यांतील रायते (ता.येवला) येथील सरला व जगन्नाथ या चव्हाण दांपत्याने २०१९ मध्ये दोन एकरांत ड्रॅगनफ्रूट लागवडीचे धाडस केले. अभ्यासपूर्ण नियोजनातून पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दोन एकरांत त्याचा विस्तार केला. आज हे पीक दुष्काळी शेतीला पर्याय ठरला असून चव्हाण दांपत्याला त्यातून प्रगतीचा मार्ग मिळाला आहे.

नाशिक जिल्ह्यांतील रायते (ता.येवला) येथील सरला आणि जगन्नाथ या चव्हाण दांपत्याची
पाच एकर शेती आहे. काही वर्षांपूर्वी जिरायती पिके ते घ्यायचे. पुढे मका, कांदा, वांगी, टोमॅटो, मिरची अशी पिके घेण्यास सुरवात केली.

मात्र उत्पादन खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ म्हणावा तसा बसत नव्हता. द्राक्षलागवडीचा प्रयोगही केला. मात्र भांडवल नसल्याने उत्पादन घेण्याआधीच बाग काढून टाकावी लागली. दरम्यान अवर्षणग्रस्त स्थिती लक्षात घेऊन पर्यायी व हुकमी पिकाच्या शोधात हे दांपत्य होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ड्रॅगनफ्रूटचा मिळाला पर्याय

सन २०१८ मध्ये दूरचित्रवाणीवर ड्रॅगनफ्रूट पिकाविषयाचा प्रयोग पाहण्यात आला. उपलब्ध हवामान, पाणी व बाजारपेठ या सर्वांचा विचार करता हे पीक किफायतशीर वाटले. आपणही त्याचे धाडस करून पाहूया असे चव्हाण यांना वाटले. त्यातून २०१९ मध्ये दोन एकरांत लागवडीचा निर्णय घेतला.

मशागत, रोपांची उपलब्धता, लागवड आदींसाठी एकरी पावणेचार लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यासाठी पदरमोड केली. आर्थिक साहाय्य घेतले. भांडवल मर्यादित असल्याने स्वतः चव्हाण दांपत्य, मुलगा तुषार, विशाल अशा कुटुंबातील सर्वांनी शेतातील कामे केली. हैदराबाद येथून रोपांची उपलब्धता केली.

पीक व्यवस्थापनातील बाबी

या पिकातील शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी सरला यांनी छत्रपती संभाजीनगर भागातील अनुभवी ड्रॅनगफ्रूट उत्पादकाकडे प्रत्यक्ष भेट दिली. बारकावे समजावून घेतले. अन्य स्त्रोतांमधूनही माहिती घेतली. त्यानुसार व्यवस्थापन केले.

पहिले एकरी ३ ते ४ टन उत्पादन हाती आले. त्यातून पहिल्याच वर्षीचा भांडवली खर्च बहुतांशी कमी झाला. मग आत्मविश्वास वाढला. त्यानंतर दोन एकर क्षेत्र वाढवले. आजमितीला ते चार एकर आहे.

पहिल्या टप्प्यातील लागवडीचे अंतर १२ बाय ७ फूट होते. एकरी ५५० खांब लागले. नंतरच्या टप्प्यात ११ बाय ७ फूट अंतर ठेवले. एकरी ६०० खांब लागले. एकूण क्षेत्रात आतून व बाहेरून लाल असे दोन वाण घेतले आहेत. पैकी एक मोठ्या आकाराचा ( जंबो) आहे.

फळ हंगामात पाण्याची अधिक गरज असते. मात्र त्या काळात पावसाळा असल्याने ती पूर्ण होऊन जाते. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी बोदावर सेंद्रिय टाकाऊ घटकांचे आच्छादन करण्यात येते. उन्हाळ्यात त्याचा चांगला उपयोग होतो. सेंद्रिय खतांसह जीवामृताचा वापर केल्याने माती सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे.

उत्पादन

जून महिन्यात फुलोरा आल्यानंतर जुलै अखेरीस उत्पादन मिळण्यास सुरवात होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर हा उत्पादनाचा काळ राहतो. या काळात सुमारे सात तोडे होतात. साधारण तिसऱ्या वर्षानंतर चांगल्या प्रकारे म्हणजे व्यावसायिक उत्पादन मिळू लागते.

प्रति खांब १० ते २० किलो ते कमाल ३० किलोपर्यंत ते मिळू शकते. एक वाणाची फळे २०० ते ५०० ग्रॅम वजनापर्यंत तर जंबो वाणाची फळे ४०० ते ९०० ग्रॅम वजनापर्यंत मिळतात. एकरी १३ ते १४ टनांपर्यंत उत्पादन मिळू लागले आहे.

बाजारपेठेत मिळवली ओळख

लागवडीसाठी सुरवातीला एकरी ३.७५ लाख रुपये खर्च आला. आता दरवर्षीचा
खर्च ४० ते ५० हजार रुपये आहे. या फळाची सर्वाधिक मागणी वाशी(मुंबई), नाशिक येथे आहे. सुरत येथेही माल पाठविला जातो. मालाची गुणवत्ता असल्याने व्यापाऱ्यांकडून मागणी असते. त्यामुळे संपर्कातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून विक्री नियोजन असते. प्रति किलो ९०, १०० रुपयांपासून ते कमाल २२०, २५० रुपयांपर्यंतही दर मिळाला आहे.

सरला उत्पादनाच्या अंगाने तर जगन्नाथ विक्री- मार्केटिंगची सारी जबाबदारी पेलतात. ‘श्रीराम ड्रॅगनफ्रूट फार्म’ या नावाने या दांपत्याने बाजारपेठेत ओळख तयार केली आहे. सफेद व पिवळ्या गराच्या फळांपेक्षा लाल गराच्या फळांना अधिक मागणी असते असे अनुभवण्यास आले आहे. गोड स्वाद, उत्पादकता, आकर्षकपणा व वाहतुकीदरम्यान टिकवणक्षमता अशी निवड केलेल्या वाणांची वैशिष्ट्ये आहेत.

प्रगतीकडे वाटचाल

पूर्वी काबाडकष्ट करूनही पदरात काहीच पडत नव्हते असा मागील काही वर्षांचा अनुभव होता. मुलांचे शिक्षण, घरखर्च अशा अनेक विवंचना असायच्या. प्रत्येक हंगामात कर्ज काढायचे, अन ते फेडण्यासाठीच फक्त शेती करतो की काय असा प्रश्न पडायचा. मात्र ड्रॅगनफ्रूटमधून चव्हाण दांपत्याला प्रगतीचा मार्ग मिळाला आहे. कुटुंबातील सर्वजण राबत असल्याने मजूर खर्चात बचत करणे शक्य झाले आहे.

एकेकाळी कांदा चाळीत राहण्याची परिस्थिती होती. आता त्यांच्या स्वप्नातील ‘हरिप्रिया’ हे घर साकारले आहे. मोटरसायकल, चारचाकी तसेच वाहतुकीसाठी वाहन आहे. ट्रॅक्टरसह आवश्यक यांत्रिकीकरण केले आहे. कुटुंब कर्जमुक्त असून जपलेली आर्थिक शिस्त आदर्श आहे. अनेक शेतकरी भेट देत प्रयोगाविषयी माहिती घेत आहेत. ड्रॅगनफ्रूटची कृषी विभागाकडून प्रमाणित रोपवाटिकाही सुरू केली आहे.

संपर्क:-सरला चव्हाण- ७४९९२२९७०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT