Agrowon
ॲग्रो विशेष

Indrjeet Bhalerao: खालचा वाडा आणि सतीची गोष्ट

वरच्या वाड्याच्या पाठोपाठ खालचा वाडा वसलेला असावा. तो वरीवाड्यासारखा गढीबुरूजावर वसलेला नव्हता. खालच्या वाड्यातले लोक आमच्या गावात रहायला आले तेव्हा बुरुजावर जागा शिल्लक नसणार.

Team Agrowon

- इंद्रजीत भालेराव

वरचा वाडा आणि खालचा वाडा या आमच्या गावच्या मूळ वस्त्या. घरात माय कुठे गेली म्हणून विचारलं की सांगायचे, वरीवाड्यावर गेली किंवा खालच्या वाड्यात गेली. वरीवाडा आणि खालचा वाडा हे शब्द त्यासाठी रूढच झालेले होते. हे शब्द या गावाच्या वस्तीपासून अस्तित्वात आलेले असले पाहिजेत. आधी वरचा वाडा आणि नंतर खालचा वाडा वसलेला असावा.

वरच्या वाड्याच्या पाठोपाठ खालचा वाडा वसलेला असावा. तो वरीवाड्यासारखा गढीबुरूजावर वसलेला नव्हता. खालच्या वाड्यातले लोक आमच्या गावात रहायला आले तेव्हा बुरुजावर जागा शिल्लक नसणार. त्यामुळे हा वाडा जमिनीवरच वसला असेल. पण तो वाडा म्हणजे एक घर नव्हे. तो अनेक घरांचा समूह होता. सगळ्या घरांच्या पाठभिंती चोहीबाजूने होत्या. त्यांची दारं आतल्या बाजूने होती. त्यामुळे आपोआपच हा वाडा बंदिस्त झालेला होता. रझाकार आणि दरोडेखोरांच्या दृष्टीने तो सुरक्षित होता. त्याला मजबूत बांधलेले चिरेबंदी आणि विटांची कमान असलेले एकच प्रवेशद्वार होते. वरीवाड्यानंतरचे तितकेच जुने वाटावे असे आमच्या गावातले हे एकमेव बांधकाम आहे.

खालच्या वाड्यातल्या लोकांच्या जमिनी आमच्या गावा शेजारीच असलेल्या वडगावच्या शिवारात आहेत. वडगाव हे रिधोरा या गावाचे जोडगावच आहे. वडगाव-रिधुरं असा दोन्ही गावांचा एकत्रितही उल्लेख केला जातो .तिथं सगळे भालेरावच आहेत. तिथेही छोटीशी गढी आहे. आमच्या गावापेक्षा निम्म्या आकाराचे हे गाव. मुळात आमचंच गाव छोटं आणि त्याचंही पिल्लू वाटावं असं हे वडगाव. या वडगावात हूंबाड आणि मुळे या आडनावाची आणखी दोन घरं होती. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या गावात कुणीही अलुतेदार, बलुतेदार नव्हते. आमच्याच गावचे सगळे अलुतेदार, बलुतेदार तिथली कामं करीत असत. म्हणजे हे गाव आमच्याच गावाचा भाग गृहीत धरलं जात असे. म्हणजे वडगाव ही आमच्याच गावाची वस्ती होती. वडगावचा शिवार आमच्या गावाच्या निम्माच होता. त्यातलाही तीस टक्के शिवार आमच्याच गावच्या खालच्या वाड्यातल्या लोकांच्या मालकीच्या होता. त्या संदर्भात एक कथा सांगितली जाते. हा शिवार आमच्या लोकांच्या वाट्याला कसा आला त्याची ही कथा आहे. ही गोष्ट अंदाजे दोनशे वर्षांपूर्वीची आहे.

वडगावच्या एका घरातली एक मुलगी बापाची फार लाडकी होती. ती मुलगी आझाद स्वभावाची होती. बापाच्या घरी एक घोडा होता. तो कुणालाच पाठीवर स्वार होऊ देत नसे. मुलगी माहेराला आली असताना आपल्या मुलीच्या धाडसी स्वभावामुळे बाप म्हणाला तू खरीच धाडसी असशील तर या घोड्यावर स्वार होऊन दाखव. मुलगी म्हणाली, 'काय द्याल ?' बाप म्हणाला, 'जे मागशील ते'. मुलगी म्हणाली, 'मी या घोड्यावर बसून जेवढ्या रानाला रपेट मारेल तेवढं रान मला द्याल काय ?' बाप म्हणाला, 'हो, पण लेकराला सोबत घेऊन, हातात थाळा घेऊन, त्यातलं पाणी न सांडू देता तू ही रपेट केली पाहिजेस.' मग ती मुलगी घोड्यावर उभी राहिली. आपलं बाळ तिनं पाठीला बांधलं. एका हातात पाण्याचा थाळा घेतला. एका हातात घोड्याचा लगाम धरला आणि रपेट मारायला सुरुवात केली. पाण्याचा एक थेंबही न सांडू देता गावाच्या पश्चिमेचा तिनशे एकर शिवार तिने काबीज केला आणि ती गावाच्या पूर्वेच्या शिवाराकडे निघाली. बाप दिलेल्या शब्दाला बांधलेला होता. पण भावांना वाटलं ही आपल्या वाट्याचा सगळा शिवार घेते की काय ! म्हणून कामावरच्या मातंगाच्या गड्याला त्यांनी तलवारी घेऊन तिच्याकडे पाठवलं. घोडा, तिच्या पाठीवरचं बाळ आणि ती अशा तिघांच्याही माना त्यांनी छाटून टाकल्या.

भावांना वाटलं, आता प्रश्न मिटला, आपली जमीन आपल्याच मालकीची राहील. पण पुढे चालून ती मुलगी भूत होऊन भावांच्या मागे लागली. तिने भावांना सळोकीपळो करून सोडलं. ज्या मातंगांच्या गड्यांनी तिच्यावर तलवार चालवली होती त्यांना सतीने शाप दिला की, तुम्ही या शिवारात राहिलात तर तुमचा वंश वाढणार नाही. त्यामुळे ते त्या शिवेच्या बाहेर पळाले. तेव्हापासून कुणीही मातंग माणूस त्या गावच्या शिवेत मुक्कामाला राहत नाही. शेवटी बापाने आणि भावाने मुलीच्या नवऱ्याला बोलावून त्या शिवाराची मालकी त्याच्याकडे देऊन टाकली. तेव्हापासून ती मुलगी सती या नावानेच परिसरात प्रसिद्ध झाली.

सतीचं सासर म्हणजे आमच्या गावच्या पश्चिमेला असलेलं सुप्रसिद्ध हट्टा हे गाव. या गावच्या सतीच्या सासरच्या लोकांनी ही जमीन ताब्यात घेतली. त्यांना तिथून येऊन ही जमीन कसणं शक्य होणार नाही म्हणून त्यांनी ती तीनशे एकर जमीन अगदी मामुली किमतीत ज्या लोकांना दिली त्या सर्व लोकांना हट्टयाच्या नावानं ओळखलं जाऊ लागलं. अजूनही खालचा वाड्याला 'हट्टेस वाडा' असं म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे या लोकांचा संबंध हट्टा या गावाशी देखील आहे.

खालच्या वाड्यात एक अपत्यहीन असलेले एक गणपतबाबा होते. आमच्या लहानपणी ते खूप वृद्ध होते. बाराबंदी, पागोटे, धोतर, जोडा, उपरणं असे जुन्या वळणाचे कपडे घालणारे ते गणपतबाबा गावातल्या मारुतीला तेलवात करीत असत. ते तेलवात करायला आले आणि आम्ही मुलं तिथे खेळत असलो की ते आमच्यावर काठी उगारायचे. त्यांचा उग्र चेहरा पाहून आम्ही सगळी मुलं तिथून धुम ठोकायचो. तर या गणपत बाबांनी वडगावच्या त्या शिवारात त्या सतीचं देऊळही बांधलं. आम्ही लहानपणी आहेरवाडीच्या शाळेत जात असताना रस्त्यावरच त्या मंदिराचं बांधकाम सुरू होतं. हे गणपत बाबा कदाचित त्या मुलीच्या वंशातले असावेत असा माझा अंदाज आहे. या मंदिराला लोक सतीचं मंदिर म्हणूच ओळखतात.

संपूर्ण खालच्या वाड्यातले प्रमुख कारभारी गृहस्थ म्हणजे साहेबराव. साहेबरावांचा मोकिंदा हा माझा वर्गमित्र होता. त्यामुळे मी बऱ्याचदा त्याच्यासोबत त्या वाड्यात जायचो. त्याच्याशिवाय त्या वाड्यात माझा कुणीही मित्र नव्हता. पण मोकिंदाचे मोठे भाऊ सूर्यभान आणि जानकीराम माझ्या मोठ्या भावांचे मित्र होते. आमच्या शेताशेजारी दक्षिणेला त्यांचंही शेत होतं. त्यामुळे अधून मधून ते आमच्या आखाड्यावर येऊन बसायचे. आम्ही त्यांच्या आखाड्यावर जायचो. त्यामुळे त्यांच्या घराशी आमच्या घराचा घरोबा असल्यासारखा होता. जानकीरामची आई आमच्या घरी येत असे. जानकीरामचे वडील हे शेवटच्या काळात माझ्या वडिलांचे खूप चांगले मित्र झाले होते. धोतर, नेहरू शर्ट आणि डोक्यावर पांढरी कळी असा त्यांचा वेश होता. आमच्या वडिलांचाही वेश तसाच होता. तेही कधीमधी आमच्या घरी येत असत. पण खूप कमी वेळा. त्यांचा स्वभाव थोडा कडक होता.

खालच्या वाड्यातल्या बायजाबाई या देखील माझ्या आईच्या मैत्रीण होत्या. त्यामुळे त्यांचं आमच्या घरी येणं जाणं होतं. त्यांची मुलं मोठी असल्यामुळे माझी मित्र होतील अशी कोणी नव्हती. पुढं त्यांचे चिरंजीव बाबुराव यांनी गावाचं नेतृत्व केलं. निर्मळ, प्रेमळ स्वभावाचे निष्ठावान वारकरी असलेले बाबुराव यांचे कुटुंब आता गावातलं प्रगतीपथावर असलेलं कुटुंब समजलं जातं.

एकदा संध्याकाळी खालच्या वाड्यातल्या मधल्या चौकात एकतारीवर कबीरांची भजनं गाणारा कुणीतरी एक गायक आला होता. चिमणीच्या उजेडात तो डोळे मिटून एकचित्त होऊन भजनं गात होता. आम्ही सगळे अंधारात बसून ती भजनं ऐकत होतो. कबीराचा माझा पहिला परिचय तिथंच झालेला होता. खालच्या वाड्यात एक लादनीचं घर होतं. आमच्या गावातली एकमेव लादणी खालच्या वाड्यातच होती. म्हणजे वरच्या वाड्याच्या पाठोपाठ जुन्यात जुनी वास्तू म्हणजे आमच्या गावचा खालचा वाडा होता. खालचा वाडाही आता बदललेला आहे. बऱ्याच लोकांनी पाठभिंतीकडून बाहेरच्या बाजूने घराला दारं बांधलेली आहेत. काही जणांनी नवी छताची घरं बांधलेली आहेत. माझ्या लहानपणी पाहिलेलं त्या वाड्याचं अखंड रूप आज बदलून गेलेलं आहे. वरीवाड्यासारखाच खालचा वाडाही आता पूर्णपणे बदललेला आहे.

इथेच थोडंसं वडगाव या आमच्याच गावाचा भाग असलेल्या गावाविषयी लिहायला हरकत नाही. या छोट्याशा गावात बुरुज होता. त्यावर ज्यांचं घर होतं त्यांना भवाळाचं घर म्हणून ओळखलं जात असे. ते महानुभाव पंथाचे अनुयायी होते. आमच्या गावच्या देवाचेच भक्त होते. आमची मोठ्या आत्यांची गिरजुबाई नावाची मुलगी याच गावातल्या बापूराव भालेराव यांना दिलेली होती. पितरांच्या जेवणासाठी नेहमी आमच्या विश्वनाथ दादांना बोलावलं जायचं. इतर काही सण असेल तररीही गिरजूबाई आवर्जून दादांना जेवायला बोलवायच्या. दादांचा जसा सगळ्या पुतण्यांवर जीव होता तसाच सगळ्या भाचे, भाच्यांवरही जीव होता. त्यामुळे गिरजूबाईनं दादांना जेवायला बोलावलं की त्यांच्यासोबत मीही जेवायला जात असे. दादा मला हाताला धरून घेऊन जात. गिरिजूबाई आणि बापूरावांना आपत्य झालं नाही. एक सवतही करून पाहिली पण त्यांना आपत्य झालं नाही. मग गिरजुबाईंनी आमच्या आत्याचा नातू म्हणजे गिरजुबाईंचा भाचा वटीत घेतला. आपला वंश पुढे सुरू ठेवला.

आमची मोठी माय प्रयागबाई या वडगावच्याच होत्या. त्या मुळे कुटुंबातल्या होत्या. मोठ्या मायेचे भाऊ, आमचे दोन मामा तिथं होते. निवृत्ती मामा आणि मोठा मामा. आमच्या लहानपणी मोठा मामा खूप थकलेला होता. झाडाखाली बाज टाकून तो पडलेला असायचा. शेजारी गाईवासरं बांधलेली असायची. त्यांना शेवटच्या काळात दिसेनासं झालं. त्यामुळे आवाजावरून आम्हाला ओळखून जवळ बोलावून घेत आणि अंगावरून हात फिरवून माया करीत. हा एकेकाळी तरुणपणी तगडा असलेला मामा निजामाच्या काळात जहागीरदाराच्या दोन-दोन गड्यांना लोळवायचा. या वडगावच्या शिवारातच जहागीरदाराचा बंगलाही होता. आमच्या आणि या गावावर त्याची दहशत होती. पण या मोठ्या मामाची दहशत त्या जहागीरदाराला वाटायची.

लहाने निवृत्ती मामा फारच प्रेमळ होते. आम्हाला जीव लावायचे. त्यामुळे खूप वेळा मी त्यांच्या भेटीला वडगावला जायचो. मामीही खूप प्रेमळ होत्या. मामांची मुलं शिवाजी, तानाजी, तुकाराम सगळेच माझे मित्र होते. तुकाराम पुढे माझ्यासोबत औरंगाबादला शिकायला आला. पण फार दिवस तिथं शिकू शकला नाही. मी प्राध्यापक म्हणून परभणीला आल्यावर तो पुन्हा माझ्यासोबत शिकायला आला. मामासारखाच सोज्वळ आणि प्रेमळ स्वभावाचा तुकाराम माझं लग्न होईपर्यंत माझ्यासोबत राहिला. नंतर त्यांना शिक्षणच सोडून दिलं आणि शेती करायला सुरुवात केली. मामांची तिन्ही मुलं उत्तम शेती करतात. खूपच चांगली शेती करतात.

आमच्या गावाच्या आधी मारोतराव महाराज दस्तापुरकर यांचे नेम वडगावात होत होते. तिथल्या जनार्दनराव यांनी ती सगळी जबाबदारी घेतली होती. खूप चांगले नेम व्हायचे. कीर्तन संपल्यावर मारोतराव महाराज जनार्दनराव यांच्या घरी यायचे. त्यांच्या माडीत जेवायचे. तेव्हा वाढायला आम्ही असायचो. वडगावात भवाळाचं घर एकच होतं आणि बाकीचे वारकरी होते. आमच्या गावात तेव्हा त्याविरुद्ध होतं. एकच घर माळकर्‍याचं होतं आणि बाकी सगळे भवाळाचे होते. नंतर आमच्या गावातही वारकरी वाढले हा भाग निराळा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT