Indrjeet Bhalerao : स्वतःचा चेहरा शोधणारा माणूस

मातंग समाजातील एका तमासगिराचा एक मुलगा शिक्षणाचा ध्यास घेतो, खूप धडपड करतो, पण इंग्रजी आडवी येत राहते आणि बारावी जवळ त्याचं शिक्षण थांबतं.
Indrajeet Bhalerao
Indrajeet BhaleraoAgrowon

मातंग समाजातील एका तमासगिराचा एक मुलगा शिक्षणाचा ध्यास घेतो, खूप धडपड करतो, पण इंग्रजी आडवी येत राहते आणि बारावी जवळ त्याचं शिक्षण थांबतं. रयत शिक्षण संस्था त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार त्याला स्वतःत सामावून घेते. आयुष्याचा प्रश्न मिटतो. शिक्षण संपलं तरी त्याचं वाचन थांबलेलं नसतं. तो भरपूर वाचायला लागतो. वाचता वाचता लिहायला लागतो.

एक दिवस लिहिलेली एक कविता तो महाराष्ट्रव्यापी वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीसाठी पाठवतो. त्या 'चिमण्या' नावाच्या कवितेला मिळालेल्या प्रतिसादामुळे त्याचा आत्मविश्वास दुनावतो आणि तो लेखक होतो, कवी होतो, कथाकार होतो. हे करत असतानाच आपण शिकू शकलो नाही तरी आपली लेकरं आपण शिकवलीच पाहिजे म्हणून आपल्या मुलींना शिकवतो. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल एवढी त्यांची तयारी करून घेतो. ही गोष्ट आहे पंढरपूर जवळच्या भोसे गावातील संभाजी आडगळे नावाच्या माणसाची.

Indrajeet Bhalerao
Indrjeet Bhalerao: 'मायीहूनही मायाळू' असं सुनिलकुमार लवटेंचं व्यक्तिमत्त्व!

मागच्या वर्षी भोस्यात होणाऱ्या भागवत सप्ताहात माझं व्याख्यान ठरलं होतं. उस्मानाबादच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील सर यांचं भोसा हे गाव. ते असताना त्यांनी एकदा मला वडिलांच्या पुण्यतिथीसाठी गावात बोलावलं होतं. हे लक्षात ठेवून मागच्या वर्षी त्यांच्या गावाकडच्या भावानं मला पुन्हा भागवत सप्ताहात व्याख्यान देण्यासाठी बोलावलं. त्यावेळी माझ्या व्यवस्थेसाठी गावानं संभाजी आडगळे यांची नेमणूक केलेली होती. आपल्या गावातला चांगलं लिहिणारा, वाचणारा हा तरुण म्हणून गाववाल्यांनी येणाऱ्या लेखकांच्या स्वागतासाठी त्यांची नेमणूक केली.

माझी निवासाची व्यवस्था पंढरपुरात करण्यात आली होती. पंढरपूर पासून चौदा किलोमीटरवर भोसा हे गाव आहे. अडगळेंनी पंढरपुरात येऊन माझी सगळी काटेकोर व्यवस्था केली. हे सगळं करत असताना मला विनंती केली की, 'सर, तुमचं गावातलं व्याख्यान दुपारी चार वाजता आहे. आमच्या गावात रयत शिक्षण संस्थेची एक शाळा आहे. त्याच शाळेत मी सेवक आहे. सकाळच्या वेळी तुम्ही माझ्या शाळेत यावं आणि मुलांसाठी एक कार्यक्रम करावा, अशी माझी इच्छा आहे. खर्च सगळा मीच करणार आहे.' खर्चाचा विषय बाजूला सारून मी त्यांना लगेच होकार दिला.

त्यांच्या शाळेतला कार्यक्रम खूपच छान झाला. गावातले लोकही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांची संख्या तर फारच होती. रयत शिक्षण संस्थेची शिस्त असल्यामुळे शाळा सुंदरच होती. संभाजी अडगळे हे तिथं सेवक असले तरी त्यांना शिक्षकासारखी वर्तणूक देण्यात येत होती. सगळेजण त्यांना आपुलकीनं आणि प्रेमानं वागवत होते. जरी सेवक असले तरी लेखन वाचनामुळं त्यांना बाहेर मिळत असलेली मान्यता शाळेतल्या शिक्षकांसाठी अभिमानाचा विषय होती. नारायण सुर्वेही त्यांच्या शाळेत पुष्कळ दिवस सेवकच होते, या गोष्टीची मला इथं आवर्जून आठवण झाली.

त्या दिवशी अडगळे यांनी मला घरी नेऊन खूप आत्मीयतेनं स्वागत, सत्कार केला. त्या भागातली प्रसिद्ध 'बाजार आमटी' खाऊ घातली. त्यांच्या सर्व कुटुंबीयांची भेट घालून परिचय करून दिला. तेव्हा त्यांचा जवळून परिचय झाला. दोन मुलीवरच त्यांनी स्वतःला थांबवलं. मुलाची वाट पाहिली नाही. मुलींवर त्यांचा खूप जीव. त्यातलीच एक मुलगी आता वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दुसरी नववीच्या वर्गात आहे. आपल्या मुलींवर लिहिलेल्या चिमण्या नावाच्या कवितेनेच त्यांना लौकिक मिळवून दिला. २०१७ साली प्रकाशित झालेला 'वेदनांचा वेध' हा त्यांचा कवितासंग्रह त्यांनी मला आवर्जून भेट दिला.

मी त्यांचा कवितासंग्रह वाचून त्यांना केलेल्या सूचना त्यांनी प्रामाणिकपणे समजून घेतल्या. ते म्हणाले, 'सर मी कितीतरी लोकांना हा संग्रह दिला पण कोणीही संपूर्ण संग्रह वाचून तुमच्यासारख्या बारीक-सारीक सूचना केल्या नाही. तुम्ही माझ्या कवितेचं नुसतं कौतुक करण्याऐवजी मला महत्त्वाच्या सूचना केल्या हे मला आवडलं' मी केलेल्या सूचना त्यांना आवडल्याचं पाहून मलाही संभाजी आडगळे हे आवडले. तेव्हापासून ते माझ्या सतत संपर्कात आहेत.

संभाजी आडगळे हे मूळचे भोस्याचेच. त्यांचे वडील तमाशात काम करत होते. बावीस वर्ष त्यांनी सत्या बेरडाची भूमिका केली, राक्षसाची भूमिका केली. गुलाबराव तावशीकर यांच्या फडात ते काम करायचे. ज्ञानोबा आडगळे असं त्यांचं नाव. त्यांच्या पोटी १९७६ साली संभाजी यांचा जन्म झाला. गावातच ते शिकले आणि गावातच रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत त्यांना नोकरी लागली. त्यांनी स्वतःच्या लेकरांना खूप शिकवलं आणि वैद्यकीय शिक्षणापर्यंत नेऊन पोहोचवलं.

संभाजी आडगळे यांनी कवितेसोबतच कथा लेखनही केलं. त्यांच्या 'बिन चेहऱ्याची माणसं' या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ १४ ऑगस्ट रोजी भोशात होतो आहे. स्वातंत्र्य ज्यांना चेहरा देऊ शकलं नाही अशा माणसांच्या कथा या पुस्तकात आहेत. त्यात डोंबारी, मदारी, अस्वलवाले असे भटके, विमुक्त आहेत. संभाजी अडगळे यांना या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com