Well Agrowon
ॲग्रो विशेष

Indrajeet Bhalerao : कधीच न आटणारा सगळ्यात जुना 'आड'

Farmer News : गावातल्या पाण्याच्या विहिरीला आमच्या गावात आड असं म्हणतात. काही ठिकाणी त्याला विहीरच म्हणतात.

Team Agrowon

इंद्रजीत भालेराव

पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. त्यामुळे माणसाने पाण्याची सोय पाहूनच वस्ती केली. सुरुवातीला माणूस नदीच्या काठी राहिला. नदीशिवाय जगणे माणसाला अशक्य होते. माणसाने शेती करायला सुरुवात केली आणि माणूस पांगत गेला.

जिकडे नदी नाही, पाणी नाही अशा ठिकाणी राहून त्याने स्वतः पाण्याचे स्रोत निर्माण केले. तळी खोदली, तलाव बांधले आणि वर्षभर गावाला पुरेल अशी पाण्याची व्यवस्था करूनच माणूस त्या ठिकाणी वस्ती करून राहिला. आमच्या गावाला कोणतीही नदी नव्हती. मी माझ्या एका कवितेत लिहूनच ठेवलेले आहे की,

नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी त्यामुळे आमच्या गावाची वस्ती झाली तेव्हा आमच्या पुर्वजांनी आधी पाण्याची सोय केलेली असणार. आणि मगच तिथे वस्ती केली असणार.

आमच्या गावात आमच्या घरासमोरच पाण्याची व्यवस्था असलेला, कधीच न आटणारा सगळ्यात जुना असा आड आहे. पावसाळ्यात गावच्या शिवारातलं पाणी जिथून वाहत होतं अशा उतारातल्या ओहोळाच्या ठिकाणी हा आड बांधलेला होता. पूर्वी हा गावापासून बराच दूर असावा. बुरुजावरचा गाव हळूहळू खाली पसरत गेला तसा आड जवळ येत गेला असावा.

गावातल्या पाण्याच्या विहिरीला आमच्या गावात आड असं म्हणतात. काही ठिकाणी त्याला विहीरच म्हणतात. पण आमच्याकडे शेतात ज्या असतात त्यांना विहीर आणि गावात जो असतो त्याला आड असे म्हटले जात असे. आमच्या गावात प्रत्येक जातीचा पाण्याचा एकेक आड होता. आमच्या घरासमोरच मराठ्यांचा सामूहिक आड होता.

सगळा गाव तिथूनच पाणी भरत असे. वरीवाड्यावरची चोपीवर राहणारी माणसंही इथूनच पाणी भरीत असत. भरल्या घागरी घेऊन त्यांना चोपीवर चढावं लागायचं. भरली घागर खांद्यावर घेऊन तो उरजड चढ चढणं मोठं अवघड होतं. पण त्यांना दुसरा पर्यायही नव्हता. तिकडं रेशमाजींच्या घरासमोरही मराठा वस्तीतला आणखी एक आड होता. पण गाव तिथून पाणी भरताना दिसत नसे.

चांभारांचा आड चांभारवाड्याजवळ आणि मातंग वस्तीतला आड मातंग वस्तीजवळ होता. बौद्धांचा आड आमच्या आडाजवळ पर्वेला ओहोळालीकडं, आमच्या खारीला भिडून होता. पावसाळ्यात बऱ्याचदा ओहळाचं पाणी बौद्धांच्या आडात जात असे. हा आड दगडी बांधणीचा होता. पण त्याचा चौथरा फारसा उंच नव्हता.

त्यामुळे पाणी आडात जात असे. हा आड बौद्ध वाड्यापासून बराच दूर होता. पण ही पाणथळ जागा पाहून तो तेव्हा इथे खोदला असावा. उन्हाळ्यात आमच्या खारीतल्या आखाड्यावरचे गाई, वासरं, बैलांना आम्ही इथेच पाणी पाजत असू .

मराठ्यांचे आणि बौद्धांचे हे दोन्ही आड सोबतच खोदून बांधले असावेत. कारण त्यांचे दगड आणि त्यांची घडनावळ सारखीच वाटते. म्हणजे बौद्धांचा हा आड तेव्हा गावानेच त्यांना बांधून दिला असावा. या गावाची वस्ती झाली तेव्हा हे दोनही आड बांधलेले असावेत.

आमच्या गावातील घरातला पहिला छोटासा आड दत्तराव केरबा यांच्या वाड्यात पाडला गेला. त्यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मुलाचं बाबुराव दादांचं लग्न झाल्यावर १९७५ नंतर हा त्यांच्या घरातला आड पाडला गेला. बाबुराव दादांची सासुरवाडी चुडाव्यांचे देसाई यांची होती.

तिथल्या रंगराव पाटलांची ही मुलगी. ते खानदानी मराठा. घरातल्या बायांचं सार्वजनिक आडावर धुणं धुवायला जाणं त्यांना आवडत नसे. कदाचित त्यांनी आग्रह करून घरातला हा लहानसा आड पाडायला लावला असावा.

गावात वैयक्तिक मालकीचा दुसरा पाण्याचा स्रोत सरपंच सखारामजींच्या घरी तयार करण्यात आला. तो आमच्या गावातला पहिला हापसा होता. दत्तराव केरबांच्या घरचा लहानसा आड आणि सरपंचांच्या घरचा हापसा पाडताना गावानं नवलाईन त्या गोष्टीकडे पाहिलं. आम्ही लहान मुलं तर तिथे जाऊनच बसायचो आणि काम कसं करतात ते पाहायचो.

तेव्हा ते खालीवरी करायचं हातमशीन होतं. त्यानं हापसा पाडावा लागे. हापसून येणारं, शेंदावं न लागणारं पाणी पाहायला सारा गाव लोटला होता. तेव्हापासून या दोनही घरच्या बायांना आडावर धुणं धुवायला यायची गरज उरली नाही.

पण उर्वरित सगळ्या गावातल्या बायका आमच्या घरासमोरच्या सार्वजनिक आडावर धुणं धुवायला येत असत. सकाळी पुरुषांचं पाणी भरणं झालं की त्यानंतर बायकांचा हा धुणं धुण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. आमच्या गावात ओढा किंवा नदी नव्हती. त्यामुळे बायकांना अडावरच धणं धुवावं लागायचं.

सरपंचांच्या घरी पाडलेल्या हापश्याच्या आणि दत्तराव केरबांच्या घरी पाडलेल्या छोट्या आडाच्या निमित्ताने गावात जशी खानदानाची चर्चा झाली तशी त्याआधीही एकदा झालेली होती. पूर्वी धुणं धुवायला तर गावातल्या बाया आडावर जातच असत पण घरातलं पाणी भरण्याचंही काम बायाच करीत असत.

पण घरजावई म्हणून परभणी जवळच्या असोल्याचे जावळे मामा आमच्या गावात आले, तेव्हा त्यांच्या वडिलांनी आडावर बायका पाणी भरत आहेत हे दृश्य पाहिलं आणि त्यांनी गावातल्या सगळ्या पुरुषांना हिणवलं. तेव्हापासून पाणी भरण्याचं काम पुरुष करू लागले. पण सोनाराच्या मात्र बायाच पाणी भरीत असत.

ज्यांच्या कामावर सालगडी असत त्यांचं पाणी सालगडी भरीत असत. गडी सालावर लावतानाच ही पाणी भरण्याचीही बोली केली जात असे. पण बहुतेक सालगडी हे बौद्ध किंवा मातंग असत. त्यांना आडावरून पाणी भरण्याच्या कामातून आपोआपच सुटका मिळत असे. असे अस्पृश्य गडी ज्यांच्या कामावर आहेत त्या घरातली तरुण मंडळी पाणी भरण्याचं काम करीत असत.

पहाटेच उठून सगळा गाव पाणी भरायला सुरुवात करीत असे. उजाडेपर्यंत तर सगळ्या गावाचं पाणी भरणं झालेलं असे. आंघोळ केल्याशिवाय पाणी भरायची परवानगी नसे. कारण पारशा अंगानं भरलेलं पाणी देवपूजेला कसं चालणार ? म्हणून सगळ्यांना त्यांच्या घरूनच अंघोळीची सक्त ताकीत होत असे. पाणी भरणारे सगळे तरुण शक्यतो विवाहित असत. त्यामुळे त्यांना असे करणे भागच असे.

बौद्ध, मातंग किंवा चांभारांच्या आडात एखाद्या वेळी काहीतरी प्राणी पडून मरत असे आणि त्या आडाचं पाणी घाण होत असे. तेव्हा ते सगळे लोक मराठ्यांच्या आडावर पाण्यासाठी येत असत. पण त्यांना कुणीतरी पाणी शेंदून टाकावं लागत असे. त्यांच्या घागरीही अडाच्या खाली ठेवल्या जात. त्यात दुरून पोहऱ्यानं पाणी टाकलं जात असे.

आडावर त्यावेळी कुणी सवर्ण माणूस नसेल तर सगळ्यात जवळ आमचंच घर असल्यामुळे आमच्या घरून कुणालातरी बोलावून नेलं जात असे. अशावेळी शक्यतो घरचे मलाच आठवत असत. कंटाळा न करता मीही आनंदाने जात असे.

बहात्तरच्या दुष्काळात इतर सगळे आड आटले तेव्हा आमच्या घरासमोरच्या आडावरच सगळ्या गावानं पाणी भरलं. दलितांसह जनावरांनाही याच एकमेव आडाचा आसरा होता. या आडात कधी घाण पडली तर सगळा आड उपसून टाकावा लागे.

हा आड कधीच सगळा उपसला जात नसे. कारण त्यात पाण्याचे खूपच झरे होते. आड उपसताना सगळा गाव आपापले पोहे घेऊन अडावर येत असे. कारण तेव्हा पाणी उपसणारी मोटार गावाने पाहिलेली नव्हती. या आडात खूप मासळ्या होत्या. मासळ्या पाणी शुद्ध ठेवतात असं गावाला वाटे. कारण त्या पाण्यात पडलेले किडेमकोडे खाऊन टाकतात.

आमच्या गावाला चावडी किंवा मंदिराला पार नसल्यामुळे सांच्यापारी बरेच लोक या आडावर येऊन बसत. या आडाचा परकोट मोठा आणि दगडी बांधकामाचा होता. एकदा पोळ्याच्या दिवशी असेच लोक बसलेले असताना कुणाला तरी प्रेमाचं भरतं आलं आणि त्यांनी अडातल्या मासळ्यांना खायला पुरणाची पोळी टाकली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या मासळ्या मरून पाण्यावर तरंगू लागल्या. गावाला सगळा आड उपसावा लागला. श्रावण महिना असल्यामुळे पाणी भरपूर होतं. दिवसभर पाणी हापसून शेवटी लोकांनी नाद सोडला. आडाभोवती सगळा चिखलाचा राडा झाला. मराठ्यांच्या या आडाचा कठडा खूप उंच बांधलेला असल्यामुळे भोवतीचं पाणी किंवा घाण या आडात जाण्याची शक्यता नव्हती.

प्रयत्न केल्यास काहीच अशक्य नसतं असा उपदेश करणारा तुकोबांचा एक अभंग आहे. त्यात 'दोरे चिरा पडे, सहज काचणी' अशी एक ओळ आहे. याचा अर्थ, दोऱ्याने दगड कापता येतो, असा होतो. एकदा हा अभंग अभ्यासक्रमात होता. तो वर्गात शिकवताना विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की, दोऱ्याने चिरा कसा कापता येईल ?

तेव्हा माझ्यासमोरही प्रश्न उभा राहिला की, आता या पोरांना कसं समजायचं ? पण मला चटकन या आडाला पाणी शेंदण्याच्या पोहऱ्यांमुळे पडलेल्या काचण्या आठवल्या. एकाच ठिकाणाहून वर्षानुवर्ष दोऱ्या ओढल्यामुळे हे दगड कापले गेल्याचं माझ्या आठवणीत होतं. समोर बसलेले बहुतेक विद्यार्थी ग्रामीण भागातले असल्यामुळे त्यांना हे उदाहरण एकदम पटले. आडाला पडलेल्या या काचण्यावरूनही आडाचं वय ठरवता येतं.

आता गावातलं कुणीही आडावर पाणी भरायला जात नाही. मधल्या काळात सरकारी योजनेतून गावात अनेक हापसे पाडण्यात आले. त्यामुळे लोक हापश्यावर पाणी भरू लागले. आता तर गावात नळ योजनाच कार्यान्वित झालेली आहे. त्यामुळे सकाळी सातला घरोघरी पाणी येते. कुणाला पाणी भरण्याची गरजच राहत नाही.

आपल्या घरासमोरच्या नळाच्या तोटीतून लोक पाणी भरतात. या नळ योजनेसाठी बसवलेलं उपसायंत्र आमच्या घरासमोरच्या आडावरच बसवलेले आहे. एक तर या आडाला पाण्याचे स्रोत खूप आहेत. आणि दुसरे म्हणजे या आडाचे पाणी मधुर आहे असं सगळ्यांना वाटतं. त्यामुळे नळयोजना याच आडावर बसवलेली आहे. म्हणून हा आड रोज उपसला जातो. स्वच्छ ठेवला जातो.

या आडाजवळच असलेला बौद्धांचा आड मात्र अडगळीत पडलेला आहे. या अडाला अजूनही भरपूर पाणी आहे. पण बौद्ध वस्तीतले कुणीही पाणी भरायला तिथे येत नाही. इतरही कुणी त्या पाण्याचा वापर करत नाही. त्यामुळे हे पाणी शेवाळून हिरवे झालेले आहे. आडाभोवती गवत उगवून आड गवताने झाकोळला आहे.

मातंग वस्तीतला आड स्वच्छ आणि उपसा असलेला दिसला. चांभार वस्तीतला आडही आता फारसा उपयोगात राहिलेला नाही. याशिवाय बऱ्याच लोकांनी घरोघरी हापसे पाडून घेतलेले आहेत.पाण्याच्या अखंड श्रोतामुळे आणि चवीच्या गोडव्यामुळे आमच्या दारातला या गावातला पहिला आड मात्र आपली उपयुक्तता अजूनही टिकवून आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT