Nashik News : मराठवाड्याची तहान भागविणारे जायकवाडी धरण ९२ टक्के भरले. जुलैअखेरीस धरणाच्या १८ दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मराठवाड्यातील जनतेत समाधान आहे. सलग चौथ्या वर्षी धरणात समाधानकारक साठा निर्माण झाल्याने समन्यायी पाणी वाटपावरून निर्माण होणार नाशिक व अहिल्यानगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष टळेल.
चालू वर्षी नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांवर पावसाने कृपावृष्टी केली आहे. जून व जुलै या दोन महिन्यांत झालेल्या संततधारेमुळे धरणांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. नाशिक जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे गंगापूर व दारणा समूहास विविध धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला.
नांदूरमध्यमेश्वरमार्गे हे पाणी ‘जायकवाडी’त पोहोचले. नाशिकमधून आतापर्यंत सोडलेल्या ४० हजार ७७३ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४१ टीएमसी पाण्यामुळे ‘जायकवाडी’ भरण्यास मदत झाली आहे. ‘जायकवाडी’तील पाणीसाठा सध्या दोन हजार ७२५ दशलक्ष घनमीटरवर पोहोचला आहे.
गुरुवारी (ता. ३१) धरणाचे १८ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले असून, नदीपात्रात नऊ हजार ४३२ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक जनता सुखावली; तर समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार यंदा नाशिक व अहिल्यानगरमधील धरणांमधून मराठवाड्याला अतिरिक्त पाणी द्यावे लागणार नाही. त्यामुळे पाण्यावरून तिन्ही जिल्ह्यांमध्ये उभा ठाकणारा संघर्ष यानिमित्त संपुष्टात येण्यास मदत झाली आहे.
यंदा समन्यायीचा मुद्दा निकाली
मेंढिगिरी समितीच्या अहवालानुसार दरवर्षी १५ ऑक्टोबरला ‘जायकवाडी’त ६५ टक्क्यांहून अधिक पाणी असल्यास धरणाच्या वरील बाजूला असलेल्या नाशिक व अहिल्यानगरमधून अतिरिक्त पाणी सोडण्याची गरज नाही. मात्र, याच मुद्यावरून तिन्ही जिल्ह्यांत वाद होता.
शासनाने समन्यायी पाणी वाटप धोरणाबाबत गोदावरी अभ्यास गट-२ स्थापन केला होता. या गटाने समन्यायी अहवालाचे पुनर्विलोकन करून ६५ टक्क्यांवरील मर्यादा ५८ टक्क्यांपर्यंत करण्याची शिफारस केली होती. शासनाने चालू वर्षी ती लागू केली. त्याचवेळी ‘जायकवाडी’ भरल्याने समन्यायी पाणीवाटपाचा मुद्दा यंदा निकाली निघाला आहे.
यंदा प्रमुख धरणांतून सोडलेले पाणी
धरण सोडलेले पाणी (दलघफू)
दारणा १४,०८७
गंगापूर ५,६५६
कडवा २,४७४
मुकणे १००
भोजापूर २५४
आळंदी ६१५
वालदेवी ६७३
वाकी ८७१
भाम ३,५५९
गौतमी-गोदावरी १५३
कश्यपी ३६१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.