
Chh. Sambhajinagar News : येथील जायकवाडी प्रकल्पातून गुरुवारी (ता. ३१) सायंकाळी ५ ते ६ च्या दरम्यान सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सुरू करण्यात आला.
धरणातील वाढती पाणीपातळी लक्षात घेता, एकूण १८ दरवाजे प्रत्येकी ०.५ फुटाने उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून ९४३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान व धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा घट केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आधी हा विसर्ग दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान करण्यात येणार होता, परंतु नंतर तो सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान करण्याचा निर्णय प्रकल्प प्रशासनाकडून कळविण्यात आला. गोदावरी नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, नदी पात्रात कोणीही प्रवेश करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जीवित किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांनी दक्ष राहावे, असा संदेश कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (ऊ), पैठण यांच्या आदेशावरून देण्यात आला आहे.
जलसंपदा मंत्र्याच्या हस्ते जलपूजा
मराठवाड्याची जलवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाचे जलपूजन राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होऊन पाणी सोडण्यात आले. या वेळी आमदार विलास भुमरे, आमदार रमेश बोरणारे, आमदार हिकमत उढाण, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विठ्ठलराव लंघे आदींच्या उपस्थितीत तर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता व लाभक्षेत्र विकासच्या मुख्य प्रशासक सुनंदा जगताप, जलसंधारणचे मुख्य अभियंता अरुण नाईक आदींची उपस्थिती होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.