Regenerative Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Regenerative Farming : हवामान बदलास पूरक पुनरुत्पादक शेती

डॉ. नागेश टेकाळे

Indian Agriculture : एका कृषिविषयक चर्चा सत्रात श्रोत्याने मला प्रश्‍न विचारला, ‘‘सर, सध्याच्या या हवामान बदलात, पावसाच्या अनियमितपणात आणि वाढत्या उष्णतामानाच्या तडाख्यात रासायनिक शेतीला पर्याय काय?’’ क्षणार्धात माझ्या मुखामधून दोन शब्द बाहेर पडले पुनरुत्पादक शेती म्हणजेच रिजनरेटिव्ह फार्मिंग.

सध्याची आपली शेती पद्धती काही अपवाद वगळता संपूर्णपणे रासायनिक झाली आहे. ज्यामधून कर्ब, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड हे तीन हरितगृह वायू सातत्याने वातावरणात प्रवेश करत असतात.

जागतिक तापमान वाढीस आपले औद्योगिक क्षेत्र, रस्त्यावरील वाहनांची गर्दी जेवढी जबाबदार आहे, तेवढीच जबाबदार १४ टक्के का असेना पण वातावरणात हरितगृह वायू सोडणारी आपली शेतीसुद्धा आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न उत्पादन हे वाढावयास हवेच पण रासायनिक शेती शिवाय ते शक्य आहे काय? याचे उत्तर ‘हो’ हेच आहे.

पुनरुत्पादक शेती हेच एकमेव असे शाश्‍वत हत्यार आहे ज्याचा उपयोग करून आपण सध्याच्या वातावरण बदलावर सहज मात करून आपल्या वसुंधरेस सर्वस्वी नाशापासून वाचवू शकतो. ही कृषी पद्धती आपल्या पारंपरिक सेंद्रिय पद्धतीस नाजूक धाग्यांनी जोडलेली आहे. यामध्ये शेती करण्याची पद्धती, वापरली जाणारी अवजारे, शेती कसणारे शेतकरी, त्यांची मानसिकता, परिसरामधील हवामान, शेत जमिनीवर कायम असणारे हरित आवरण, कृषी उत्पादनामधून प्राप्त होणारी पौष्टिकता आणि ग्राहकांबरोबरचे मैत्रीसंबंध या धाग्यांना अतिशय महत्त्व आहे.

पुनरुत्पादक शेतीचे वस्त्र याच सात धाग्यांनी विणलेले आहे. विशेष म्हणजे ज्या जमिनीवर हे वस्त्र अंथरावयाचे आहे ती सुद्धा तेवढीच पोषक आणि सत्त्वयुक्त हवी. त्यासाठी देखील सातत्याने प्रयत्न करावयास हवेत. थोडक्यात, अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट रोडले आणि त्यांची कन्या मारिया यांनी १९७० मध्ये विकसित केलेली ही सप्तपदी फक्त एक कृती नसून अनेक वेगवेगळ्या कृतींच्या धारांचा हा अनोखा संगम आहे, ज्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर, पिकांची चक्राकार पद्धती, सिल्विकल्चर या शेत जमिनीस टॉनिक देणाऱ्‍या तीन घटकांचा समावेश हा असावाच लागतो.

यासाठी शेतीस लागणारे पशूबळ सुद्धा तेवढ्याच ताकदीचे असावे लागते. जमिनीत कुठलेही रासायनिक द्रव्ये न टाकता खरीप, रब्बी, उन्हाळी पिके त्याच त्या हंगामात घेणे, जमिनीचा तिसरा हिस्सा पडीक ठेवून तेथे जनावरे चारणे आणि उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत वापरणे ही चार पथ्ये शेत जमिनीस नवीन आव्हान पेलण्याचे सामर्थ्य देतात. अशा जमिनीमधील पौष्टिक धान्य उत्पादन आपणास व आपल्या येणाऱ्‍या तरुण पिढीस कायम आरोग्यदायी सकारात्मक ऊर्जा देत असते.

पुनरुत्पादक शेतीचे अनेक फायदे आहेत. त्यामधील एक महत्त्वाचा म्हणजे मिळणारे अन्नधान्य अतिशय पौष्टिक असते. या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये कर्ब स्थिरीकरण तर वाढते त्याचबरोबर उपयुक्त जिवाणूंची संख्याही वाढते. या जिवाणूंमुळेच शेत पिकांच्या मुळांना भरपूर अन्नद्रव्ये, खनिजे मिळतात.

अशा जमिनीमधून कर्ब, मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड वायूंचे वातावरणात प्रवेश करण्याचे प्रमाण जवळपास शून्य असते. म्हणूनच पर्यावरण सुदृढ निरोगी होते. विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांमुळे जमिनीमधील जैवविविधता मोठ्या प्रमाणावर वाढते. या जैवविविधतेचे मातीशी असलेले नाते दृढ मैत्रीचे असते. त्यामुळे मातीची सुपीकता तर वाढतेच शिवाय कर्ब स्थिरीकरण सुद्धा वाढते. या पद्धतीमुळे शेतकऱ्‍यांमधील हव्यास कमी होऊन मनात संतुष्टता निर्माण होते.

शेवटी हव्यास हेच सर्व दुःखाचे मूळ आहे. रासायनिक शेतीत कितीही उत्पादन मिळाले तरी आपला हव्यास हा वाढतच असतो. शंभर पोते सोयाबीन झाले तरी मन संतुष्ट होत नाही, असे वाटते अजून दोन चार पोते युरिया टाकला असता तर २०-२५ पोती सोयाबीन सहज जास्त मिळाले असते.

मग प्रश्‍न उभा राहतो जेथे सोयाबीन पिकले त्या शेत जमिनीचे काय? आपल्याच आईची पूजा बांधावयाची सोडून आपण खताची पोती रिकामी करून तिला किती विष खाऊ घालणार? तो सुद्धा एक जीवच आहे, त्या जिवाला विश्रांती नको का? मुबलक रासायनिक खते वापरून आपण मातीला मृत करतो. अशा मृत मातीमधील कृषी उत्पादन खाणाऱ्‍यांच्या अंगाला अन्न व्यवस्थित लागेल काय? निश्चितच नाही.

अमेरिका, युरोपियन देशांप्रमाणे आपल्याकडे ग्राहक आणि शेतकरी यांचा सरळ खरेदी-विक्रीचा संबंध येत नाही. त्यामुळे शेतकरी जे पिकवेल, जसे पिकवेल तेच ग्राहक मध्यस्थांच्या माध्यमातून खरेदी करतात आणि भाव वाढला की शेतकऱ्यांना दोष देतात. मधला दलाल मात्र गब्बर होऊन नामानिराळा राहतो.

पुनरुत्पादन कृषी पद्धतीमध्ये शेतकरी आणि ग्राहक कायम एकत्र येतात. त्यांच्यात जिवाभावाचे संबंध निर्माण होतात. ग्राहकास ताजे, स्वच्छ आणि पौष्टिक कृषी उत्पादन तर मिळतेच, त्याचबरोबर ग्राहकांचा आर्थिक मदतीचा मजबूत हातही शेतकऱ्‍यांच्या खांद्यावर असतो, ज्यामध्ये फक्त आधारच नसतो तर आत्मविश्वासही असतो. अशी शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे ग्राहक खऱ्‍या अर्थाने हवामान बदलाचा दाह सहज कमी करू शकतात.

पुनरुत्पादन शेती पद्धतीमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन झपाट्याने कमी होते. कृषी उत्पादनाची पौष्टिकता वाढते. रोगराई दूर पळते आणि आनंद हा आरोग्यास बरोबर घेऊन तुमच्या घरात कायमच्या वास्तव्यास येतो. पौष्टिक अन्नधान्यांबद्दल जागृती, सेंद्रिय शेतीस वाहून घेणारे शेतकरी, भूमातेचा सन्मान आणि तिच्या प्रति कृतज्ञता असल्यावर ‘हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन’ का होणार नाही.

‘नेत्र लागले पैलतीरी’ म्हणून उजाड कोरड्या दुष्काळाकडे पाहत हातात अनुदानाची कटोरी घेऊन दिवस कंठत बसण्यापेक्षा शेतकऱ्‍यांनी यापुढे पुनरुत्पादक कृषी पद्धतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावयास हवे. प्रस्तुत लेखकाने अशा पद्धतीच्या शेतीचा प्रयोग आदिवासी बहुल भागात करून शेकडो शहरी ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाचा भाजीपाला, फळे त्यांना प्रत्यक्ष शेतावर आमंत्रित करून दिले आहेत.

‘दे रे हरी पलंगावरी’पेक्षा ‘केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे’ हे जास्त महत्त्वाचे! श्रीखंड पुरी समोर असताना ताजी हिरवी भाजी आणि भाकरीचा घास कुणालाच आवडणार नाही. पण पौष्टिकता कशात आहे हे ज्यास समजते तोच या अशा कृषी पद्धतीचा स्वीकार करून वातावरण बदलाचा दाहही कमी करणे आपली सुद्धा जबाबदारी आहे असे म्हणत काही प्रमाणात तरी निश्चित कमी करू शकतो. शेवटी म्हटले आहेच की ‘साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मिलकर बोझ उठाना.’

हवामान बदलाचे कृषीवर पडत असलेले ओझे आपण सर्व एकत्र आलो तरच कमी होणार आहे, अन्यथा हे ओझे आणि शासनाचे अनुदान या दोघांमधील सर्वांत पुढे कोण धावतो, ही जगावेगळी शर्यत पाहत बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT