Sustainable Agriculture : शाश्वत कृषीरथाचे चार अश्व

Conventional Crops : बदलत्या हवामान काळात शेतीला सामोरे जाताना अल्पभूधारक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांकडे वळायला हवे. सेंद्रिय खते देऊन जमीन उपयुक्त जिवाणूंनी समृद्ध करावयास हवी. बांधावर देशी वृक्ष लावावेत आणि शेतात जास्तीत जास्त पावसाचे पाणी कसे मुरेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Agriculture
AgricultureAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : भारतीय कृषी क्षेत्रासाठी १९६६ नंतरचे दशक हरित क्रांतीची यशोगाथा म्हणून ओळखले जाते. या दशकात भारतीय शेती संकरित वाणे, रासायनिक खते यांच्या वापराबरोबर भूगर्भामधून मनमुराद पाणी उपसा करण्याची ओळख झाली. याच कालखंडात पंजाब आणि हरियाणामधील बहुतांश शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले.

आज आपण २०२३ साल ओलांडून २०२४ मध्ये प्रवेश करत आहोत तेव्हा पंजाबकडे नजर टाकताना काय आढळते? मध्य प्रदेशने पंजाबला गहू उत्पादनात केव्हाच मागे टाकले आहे. पैशाचा ओघ त्याचबरोबर हव्यास वाढल्यामुळे पंजाबमधील भूजल पातळी सरासरी ८०० फूट खोल गेली आहे.

पाण्यामध्ये आर्सेनिकचे प्रमाण वेगाने वाढून कर्करोग पसरत आहे, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर ड्रग्जच्या आहारी गेला असून त्यांचे विदेशात स्थलांतर वाढत आहे. त्यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वृद्ध लोक आढळतात. नवीन वर्षात प्रवेश करत असताना भारताचे धान्य आगार असलेल्या पंजाबसमोर आज अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या सर्व आव्हानांकडे आपल्या राज्यातील शेतकरी कसे पाहणार आहेत, हे सुद्धा आता ठरविण्याची वेळ आली आहे.

हरित क्रांतीपूर्वी भारतीय शेतीचा पंचांगाबरोबर घनिष्ठ संबंध होता. मृग बरसण्याआधी रोहिणी नक्षत्राचा पाऊस हमखास येणारच! मृग नक्षत्रानंतर येणारी सर्व नक्षत्रे यथेच्छ बरसत असल्याने खरिपाचे उत्पादन तर मिळतच होते पण नद्या, ओढे, नाले दुथडी भरून वाहत, विहिरींना मुबलक पाणी येत असे.

Agriculture
Cooperative Policy : राज्याच्या सहकार धोरणात होणार बदल

पिकांपेक्षाही भूमातेस भरपूर पाणी पिण्यास मिळत असे, म्हणून तर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही नद्या खळखळत वाहत. आज आपण काळ्या आईस तहानलेले ठेवत असल्यामुळेच नद्यांचे वाहणे बंद झाले आहे. स्पष्ट शब्दातच सांगायचे झाले तर भारतीय शेतीवरील ऋतू, नक्षत्रे यांचा प्रभाव संपलेला आहे.

सध्या ऋतुमानाप्रमाणे काहीच घडत नाही. पावसाळा एक महिना पुढे गेला त्यामुळे दिवाळीमधील कडाक्याची थंडीही आता दीड-दोन महिने पुढे गेली. फेब्रुवारीमध्येच येणारा उन्हाळा आपणास तब्बल पाच महिने भाजून खाणार आहे. हे माहीत असूनही आपण अजून निद्रित अवस्थेमध्येच आहोत.

हे वर्ष संपत असताना अश्रूपूर्ण नयनांनी मागे वळून पाहताना आपणास आढळते की राज्यातील कृषी क्षेत्राचा कापूस, सोयाबीन या दोन मुख्य पिकांनी नटलेला रथ अवर्षण, अतिवृष्टी, वादळी पाऊस आणि गारपीट या चार महाकाय अश्वांनी उधळून लावलेला आहे. रथावर सारथी नव्हता असेही नाही परंतु निसर्गाने या शेतकरी रूपातील सारथ्यास खाली खेचून या रथास चौखूर उधळून शेतीचे होत्याचे नव्हते करून टाकले आहे.

नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीमधील ज्वारी चांगली आहे, गव्हाची हिरवी पाती तजेलदार दिसत आहेत. नवीन वर्षात सुद्धा आपणास असाच कृषी रथ पुढे न्यावयाचा असेल तर त्यास असणारे चार अश्व हे सेंद्रिय शेती, पारंपरिक पिके, बांधावरील देशी वृक्ष आणि पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी असलेले शेततळे यांचे प्रतिनिधित्व करणारे असायला हवेत.

Agriculture
Fertilizer Issue : खत विक्रीतील समस्यांचा केंद्र शासन घेणार आढावा

आपणास परत ऋतू नक्षत्राकडे वळून रागावलेल्या निसर्ग देवतेची पुजा बांधावयाची आहे. हे सर्व लगेच होईल असे नाही. बदलत्या वातावरणात शेतीला सामोरे जाताना अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सर्वप्रथम सोयाबीन आणि कापूस यांचा टप्प्याटप्प्याने त्याग करून खरिपामधील पारंपरिक पिकांकडे वळायला हवे. सेंद्रिय खते देऊन जमीन उपयुक्त जिवाणूंनी समृद्ध करावयास हवी. बांधावर देशी वृक्ष लावावेत आणि शेतात जास्तीत जास्त पावसाचे पाणी कसे मुरेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

नवीन वर्षामध्ये आपण आपल्या शेतीकडे पाहताना शेतामधील मृदा या घटकास केंद्रस्थानी ठेवायला हवे. मातीला जास्तीत जास्त पौष्टिक अन्न देऊन उत्पादित ठेवायला हवे. शेतामधील कुठलाही काडीकचरा बाहेर टाकणार नाही, रान पूर्ण निर्मळ करणार नाही, याची शपथच घ्यावयास हवी. सुंदर मानवी शरीरास ज्याप्रमाणे दृष्ट लागू शकते तसेच जमिनीचे आहे. पिकाला थोडी तरी स्पर्धा ही हवीच.

गव्हासारख्या पिकाला जमिनीत ओलावा आणि कडक थंडी लागते. मात्र, ज्वारीचे तसे नाही म्हणून राज्यात यापुढे रब्बीला ज्वारीचा पेरा वाढणे गरजेचे आहे. ज्वारीचा सात ते आठ हजार रुपये क्विंटल भाव शेतकऱ्‍यांना नवीन वर्षात नक्कीच सुबत्ता देऊ शकतो. यापुढे जमिनीवर ताठ उभे राहणाऱ्‍या पिकांपेक्षा भुईमुगासारख्या द्विदल तसेच जमिनीवर पसरणाऱ्या पिकांना काही वर्ष तरी प्राधान्य द्यायला हवे.

यामुळे शेतीला नत्र तर मिळतेच त्याचबरोबर पावसाचे पाणी भूगर्भात मुरण्यासाठी मदत होते. खरिपामध्ये रांगती पिके आणि रब्बीला ज्वारी, बाजरी सारखी उभी पिके आणि बांधावरील वारा झेलणारी वृक्षसंपदा अल्पभूधारक शेतकऱ्‍यांना निश्चितच चांगला आधार देऊ शकते.

शेतकऱ्‍यांचे कृषी वर्ष खरीप ते खरीप असेच असावयास हवे. सरते वर्ष २०२३ च्या खरिपात काय झाले हे आठवून दुःख करत बसण्यापेक्षा येणाऱ्या खरिपात पिकांची योग्य निवड करून पावसाचे पाणी शेतात जास्तीत जास्त कसे मुरेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असावयास हवे. खरिपाची योग्य आखणी आणि मांडणी झाली की रब्बी शेतकऱ्‍यांना नेहमीच फलदायी ठरते. लेखाच्या सुरुवातीस मी पंजाबची चर्चा केली आहे.

रासायनिक खतांचा अतिरेक, भूगर्भातील खोल पाणी, शेतीमध्ये वृद्धांची वाढती संख्या आणि फक्त गहू आणि भात या पिकांना अग्रक्रम हे तेथील चित्र आज चिंताजनक आहे. महाराष्ट्र आज त्याच दिशेने जात आहे काय? रासायनिक खतांचा वर्षभरात सरासरीच्या १०८ टक्के वापर, आटलेल्या नद्या, जिकडे नजर टाकावी तिकडे फक्त कापूस आणि सोयाबीन, तरुणांची शेतीकडे पाठ हे आपले कृषीचे चित्र विदारक आहे.

२०२४ मध्ये हे बदलता येईल काय? यावर मंथन हवे. राज्यात रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास त्यापोटी खर्च होणारा ५० टक्के निधी कृषी विकासासाठी देण्यात येईल ही केंद्र सरकारची ‘नमो प्रणाम योजना’ या नवीन वर्षात शेतकऱ्यां‍ना विश्वासात घेऊन कृषी विभागास सहज राबवता येऊ शकते. या नवीन वर्षात मातीचा सुगंध पहिल्या पावसात आसमंतात दरवळला तरच काळ्या आईचा आपण सन्मान केला, असा त्याचा अर्थ निघेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com