Nahsik News : मॉन्सूनपूर्व असूनही पेरणीलायक पाऊस झाल्याने जिल्ह्याच्या विविध भागात शेतकऱ्यांनी मका पेरणी सुरू केली होती, मात्र दोन दिवसांपासून पावसाने उघडीप देताच पुन्हा पेरण्यांना ब्रेक लावला आहे. दरम्यान कधी नव्हे; इतका पाऊस मे महिन्यात झाला असून जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
मेच्या शेवटच्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह एखादा दोन पाऊस आणि सात जूनला मृग नक्षत्र सुरू झाले की त्यानंतर येणाऱ्या पावसावरच जिल्ह्यातील खरीपाच्या पेरणीचे समीकरण अवलंबून असते. मागील वर्षी वेळेत पेरणी झाली असली तरी २०२३ मध्ये मात्र पेरण्यासाठी जुलै उजाडला होता. यावर्षी उन्हाळ्यातला अर्धा मे पावसाळ्यात गेल्याने शेतकरीही गोंधळलेले आहेत.
मुळात मॉन्सूनचे आगमन होऊन जूनमध्ये होणारा पाऊसच पेरणीयोग्य असतो कारण या पावसावर झालेली पेरणी तग धरते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अर्थात मे मध्ये जोरदार पाऊस झाल्याने मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर या भागात मका पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. काही भागात मकाची पेरणीही झाली आहे.
बहुतांशी शेतकऱ्यांनी कृषी विभाग व बियाणे विक्रेत्यांचा सल्ला घेऊन पावसाची प्रतीक्षा करणे पसंत केल्याचे दिसते. मे मधला अवकाळी पाऊस मशागतीला पोषक ठरला आहे. या पावसामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारे पेरणीपूर्व मशागतीचे काम शेतकऱ्यांनी मे मध्येच पूर्ण केले आहे.
नांगरणीसह फणनी करून जमीन भुसभुशीत झाली आहे. आता फक्त पेरणीचे काम बाकी आहे. अनेक शेतकऱ्यांनी बी- बियाणे देखील खरेदी करून ठेवल्याचे दिसते. मृग नक्षत्राचा एखादा जरी पाऊस पडला तरी जिल्ह्यात पेरण्यांना वेग येणार आहे.
मेमध्ये पहिल्यांदाच विक्रमी पाऊस
मे म्हणजे कडक उन्हाळ्याचा आणि पाणीटंचाईचा महिना...मात्र यावेळी वेगळे समीकरण जिल्हावासीयांनी अनुभवले आहे. १५ मेनंतर वातावरण बदलत गेले आणि जिल्ह्यात नुकसानदायक मुसळधार पाऊस बरसला. यामुळे कांदा, भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.
जिल्ह्याची मेमधील सरासरी १५ मिमी असून, जिल्ह्यात १२२ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे जमिनीची पाण्याची तहान काहीअंशी भागली असून, आता एखादा छोटा-मोठा पाऊस पडला तरी पेरणी होणार असल्याने हा पाऊस पेरणीची पायाभरणी करणारा ठरणार आहे.
मेमध्ये पडलेला पाऊस असा...
तालुका सरासराी पाऊस
मालेगाव १८ १०० मिमी
बागलाण १४.४ १६७
कळवण १७.३ ८२
नांदगाव १४ १४७
सुरगाणा ६ ७४
नाशिक ८.३ ११६
दिंडोरी २३ ७५.६
इगतपुरी २२.७ ७५.६
पेठ ७.५ ९८
निफाड २२ १६५
सिन्नर १९ १७२
येवला १६ १२६
चांदवड १६.३ १७९
त्र्यंबकेश्वर ४ ९५
देवळाली १ १०४
जिल्हा सरासरी १५ १२२
(टक्के - १२६)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.