Kharif Sowing : शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या कधी कराव्यात?

Monsoon Update : सध्या वाफसा स्थिती अनुकूल होत आहे. सध्या पेरणी केली तर बिजांकुरणही होईल. परंतु पुढे तीन आठवडे पाऊसच आला नाही तर, पेरणी धोक्यात ही येऊ शकते. ही भीती शेतकऱ्यांना सतावत असल्यामुळे त्यांच्यापुढे पेरणीचा पेच निर्माण झाला आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

माणिकराव खुळे

या वर्षी मॉन्सूनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाले. आणि त्यापूर्वी मे महिन्यात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अनपेक्षितपणे भरपूर पाऊस झाला. त्यामुळे बक्कळ अशा उपलब्ध ओलीवर शेतकरी आगाप पेरणी करू इच्छितात. पण आगाप पेरणी जरी शक्य असली तरी किती आगाप करावी यालाही मर्यादा आहे.

आतापर्यंतच्या अनुभवावरून शेतकऱ्यांना काही पिके सोडली तर एक-दोन जूनची पेरणी खूपच आगाप वाटते. शिवाय जून महिन्यात पावसाचे वितरण कसे असेल, याचाही अंदाज शेतकऱ्यांना अजून आलेला नाही. त्यामुळे पेरण्या नेमक्या कधी कराव्यात, याबद्दल निश्चित निर्णय घेणे अवघड झालेले आहे. शेतकऱ्यांची एक प्रकारे कोंडी झालेली आहे.

राज्याचा विचार करता बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. अनेक ठिकाणी सध्या वाफसा स्थिती अनुकूल होत आहे. सध्या पेरणी केली तर बिजांकुरणही होईल. परंतु पुढे तीन आठवडे पाऊसच आला नाही तर, पेरणी धोक्यात ही येऊ शकते. ही भीती शेतकऱ्यांना सतावत असल्यामुळे त्यांच्यापुढे पेरणीचा पेच निर्माण झाला आहे.

पावसाचा खंड

शेतकरी एकीकडे गोंधळलेले असताना दुसऱ्या बाजूला अनेक स्वयंघोषित हवामान अभ्यासक जून महिन्यात पावसाचा खंड अशा आशयाची सनसनाटी माहिती वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पसरवत आहेत. पावसाचा खंड हा शब्द ऐकल्यावर पेरणीच्या निर्णयाबद्दलचा शेतकऱ्यांच्या मनातला गोंधळ अजूनच वाढवण्याचे काम या बातम्या करत आहेत.

गंमत म्हणजे पावसाचा खंड किती दिवस राहील, याबद्दल मात्र या अभ्यासक मंडळींमध्ये मतभिन्नता आहे. प्रत्येक जण खंडाचा कालावधी, दिवस वेगवेगळे सांगत आहेत. काही शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी आहे, तर काहींकडे अगदीच मर्यादित पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीबद्दलचा निर्णय होत नाही.

वास्तविक अजून मॉन्सून देशात सगळीकडे पूर्णपणे पोहोचलेलाच नाही, तर मग पावसाचा खंड ही संकल्पना अस्तित्वातच येऊ शकत नाही. मॉन्सून पूर्ण देशात पोहोचून तो सेट होतो, त्यानंतरच 'पावसाचा खंड' ही संकल्पना जन्माला येते, असे हवामानशास्त्र सांगते. तेव्हा उपलब्ध मॉडेल आधारित न दिसणारा पाऊस म्हणजे पावसाचा खंड असा समज करून या अभ्यासकांनी माध्यमांमध्ये सनसनाटी पैदा केली, असे वाटते.

Kharif Sowing
Kharif Sowing : खरिपासाठी ४४ हजार हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट

जूनमध्ये पाऊस कसा राहील?

आजघडीला शेतकऱ्यांसमोरील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जून महिन्यात पाऊस कसा राहील? भारतीय हवामान विभागाने दीर्घकालीन अंदाज जाहीर करताना देशात यंदाच्या मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज दिला आहे. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक तर महाराष्ट्रात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

आजवरचा अनुभव लक्षात घेता जून महिन्यातील पावसाची सरासरी पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रात जून महिन्यात साधारण १७ ते १८ सेमी पाऊस, १५ ते २० इतक्या दिवसांत होणे अपेक्षित असते. परंतु मॉन्सून आगमनाचा काळ व त्याची चालू असलेली वाटचाल बघता सरासरी इतका पाऊस, सरासरी इतक्या दिवसात प्रत्येक वर्षी होतोच असे नाही.

हवामान खात्याचा, महाराष्ट्रसाठीचा २०२५ च्या जून महिन्यातील पावसाचा अंदाज हा सरासरी इतका तर तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक आहे. म्हणजेच सरासरी इतका मानला तर जून महिन्यात १५ ते २० सेमी इतका पाऊस होणे अपेक्षित आहे. सर्वात जास्त पाऊस हा जुलै महिन्यात साधारण २८ ते ३० सेमी व्हावा, असे अपेक्षित असते.

Kharif Sowing
Washim Kharif Sowing : खरिपात ६१ हजार हेक्टरवर पेरा प्रस्तावित

तसेच पुण्या- मुंबईत पोहोचलेल्या मॉन्सूनची गेल्या चार ते पाच दिवसांपासून प्रगती नाही. आहे त्याच ठिकाणी तो खिळलेला जाणवत आहे.शिवाय हवामान खात्याच्या विस्तारित श्रेणीतील अंदाजानुसार २०२५ च्या जून महिन्यात पुढील १९ दिवस म्हणजे १९ जूनपर्यंत अधिक जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी जाणवत नाही. मग हंगाम सुरु होणाऱ्या जून महिन्यात १५ ते २० सेमी सरासरी इतका पाऊस आपण कसा काय अपेक्षित करू शकतो.

परंतु १९ जूननंतर उरलेल्या १०- १२ दिवसात जेव्हा मॉन्सून ऊर्जितावस्थेत येतो. तेव्हा ती सरासरी भरून काढू शकतो. किंवा दरम्यानच्या काळात एखादी प्रणाली किंवा चक्रीय वाऱ्याची स्थिती किंवा अरबी समुद्रात एखादे चक्रीवादळ अशा घटनांमुळे मॉन्सूनच्या प्रवाहास बळकटी आली तर पाऊस होऊ शकतो. अन्यथा १९ जून नंतरच पाऊस होऊ शकतो, असे वाटते.

राज्यात १९ जून नंतर पाऊस कशामुळे होऊ शकतो, हे समजून घेण्यासाठी काही तांत्रिक गोष्टी खोलात जाऊन समजून घ्याव्या लागतील. द्वि-ध्रुवीता व एन्सो या दोन्हीही स्थिती तटस्थ अवस्थेत असून पावसास पूरक नसल्या तरी त्या पावसास मारक नाहीत.

शिवाय सध्या म्यॅडन ज्यूलियन ओसिलेशन्स म्हणजे एमजेओ हा सध्या भारत महासागरीय विषुववृत्तीय परिक्षेत्राच्या बाहेर असून तो १९ जूनच्या दरम्यान त्याची ग्लोबल फेरी पूर्ण करून भारत महासागरीय विषुववृत्तीय परीक्षेत्राच्या फेज २ व ३ मध्ये यावा, असे अपेक्षित आहे.

त्यामुळे जून महिन्याच्या सुरवातीच्या टप्प्यात मॉन्सून पुढे झेपावण्याकरिता आणि त्याला बळकटी येण्यासाठी एमजेओ पूरक दिसत नाही. वातावरणाच्या या घडामोडीचा फटका मॉन्सूनच्या प्रगतीस पर्यायाने महाराष्ट्रात मोसमी पाऊस वेगाने, वेळेत आणि जोरात कोसळण्याच्या शक्यतेस बसल्यामुळे विरजण पडल्यासारखे वाटत आहे.

एमजेओ म्हणजे काय?

विषुववृत्ताच्या दरम्यान वातावरण व समुद्र अशा दोघांशी निगडित उष्ण कटीबंधातील म्यॅडन ज्यूलियन झोके म्हणजे एमजेओ. ही उष्ण कटिबंधीय हवामानातील एक प्रमुख चक्रिय घटना आहे. ती ३० ते ६० दिवसाच्या अंतराने घडते. ती पश्चिमेकडून आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून ते पूर्वेकडे पॅसिफिक समुद्रापर्यंत घडते. ताशी साधारण ४ मीटर प्रति सेकंद वेगाने ताशी १५ किमी वेगाने जाणाऱ्या, वातावरणीय, हवा,आर्द्रता व उष्णता ऊर्जेतून घडणारे ढग व होणारा पाऊस इ. लहर स्वरूपातील प्रक्रिया सतत घडत असतात.

एमजीओ भारतीय मॉन्सूनवर परिणाम करतो. एमजीओच्या स्थितीवरून हवामानातील बदलाची माहिती मिळते. एमजीओमुळे लहर स्वरूपात घडून येणाऱ्या प्रक्रिया मॉन्सूनचे आगमन लवकर किंवा उशिरा येण्यावर तसेच मॉन्सून धारा अतितीव्र किंवा क्षीण कोसळण्यावर परिणाम करत असतात.

एमजीओ ही जागतिक पातळीवर घडत असलेली प्रक्रिया पन्नास वर्षापूर्वी म्हणजे १९७१ साली रोलॅण्ड म्यॅडन व पॉल ज्यूलियन या दोन शास्त्रज्ञांनी निरीक्षणावरून शोधून काढलेली आहे. परंतु ह्याचा जास्त सकारात्मक किंवा नकारात्मक फटका मात्र जास्त करून भारत, श्रीलंका मालदीव व ऑस्ट्रेलिया या देशांच्या मोसमी पावसावर होतो. उत्तर अमेरिकेतही येणारे महापूर यामुळेच येतात. चक्रीवादळाची निर्मिती, त्यांची तीव्रता वाढणे वा कमी होणे, आर्टिककडून येणारी व वाढणारी थंडी इ. घटनाही यामुळे घडतात.

सध्या एमजेओ साखळीसाठी जरी सध्याचे १०-१२ दिवस अनुकूल वाटत नसले तरी १९ जूनच्या दरम्यान भारतीय समुद्रामध्ये (फेज २ व ३) या साखळीची सक्रियता काहीशी जाणवत असून ती मॉन्सूनला मदत करू शकते. थोडक्यात महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचे काय चित्र राहील, याचा ढोबळ अंदाज यावरून मिळेल. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घेणे योग्य ठरेल.

(लेखक भारतीय हवामान विभागातील सेवानिवृत्त हवामान शास्त्रज्ञ आहेत.)

९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com