मुक्त संचार गोठा  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry : मुक्त संचार गोठ्यात ६५ गायींच संगोपन

Team Agrowon

शेतकरी नियोजन ः दुग्ध व्यवसाय
शेतकरी ः दत्तात्रय विजय वाघ
गाव ः सांगवी, ता.बारामती.
एकूण गाई ः ६५


Free Cowshed : सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवरील सांगवी (ता. बारामती) हे गाव. गावातील अधिकतम शेतकरी शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. या गावातील दत्तात्रय वाघ हे प्रगतशील शेतकरी. त्यांची साडेचार एकर बागायत शेती आहे. त्यांचे वडील विजय यांनी शेतीसह गाईचे संगोपन केले होते. त्यास दत्तात्रय यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर शेतीची जबाबदारी घेऊन व्यावसायिक स्वरूप दिले. त्यांनी घरच्या गाईंपासून होणाऱ्या कालवडींची विक्री न करता त्यांचे संगोपन केले. यामुळे टप्याटप्प्याने गाईंच्या संख्येत वाढ होत गेली. गाईंसाठी अल्प खर्चात साध्या पद्धतीचा गोठा उभारला.

मुक्त संचार पद्धतीचा अवलंब ः
गोविंद मिल्कच्या माध्यमातून २०१८ मध्ये पंजाब येथील दर्जेदार गाई व दुग्ध व्यवसायाची पाहणी केला. त्यातून दत्तात्रय यांना मुक्त संचार पद्धती फायदेशीर वाटल्याने त्याचा अवलंब आपल्या गोठ्यात करण्याचे ठरविले. सुरवातीला कालवडीसाठी मुक्त संचार गोठा उभारला. त्यातील फायदे समजल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वंच गाईंच्या संगोपनासाठी मुक्तसंचार पद्धतीचा अवलंब केला. सध्या त्यांच्याकडे ५० बाय ६० फूट आकाराचे तीन मुक्त संचार गोठे आहेत. त्यात ४० एचएफ गाई व २५ कालवडी आहेत.

दूध उत्पादनात वाढ ः
सध्या प्रतिदिन ४५० ते ५०० लिटर दूध उत्पादन मिळत आहे. पंजाब येथील गोठ्यातील दहा गाईंचे सरासरी उत्पादन दूध २५ ते ३० लिटर आहे. तुलनेत दत्तात्रय यांच्या गाई सरासरी १२ लिटर दूध देतात. पंजाबमधील एका गाईचे दूध उत्पादन येथील गाईच्या दूध उत्पादनाच्या जवळपास दुप्पट असल्याचे दिसून आले. यामागे दर्जेदार सिमेन हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले. सर्वच शेतकऱ्यांनी मागणी केल्यावर गोविंद मिल्क या सिमेनची उपलब्धता करून दिली. त्या सिमेनचा वापर वाघ १५ कालवडींमध्ये केला. त्यातून दर्जेदार कालवडी तयार होऊ लागल्या आहेत. सध्या वार्षिक दूध उत्पादन सरासरी १२ लिटर वरून १८ लिटर पर्यंत पोचले आहे.

व्यवस्थापनातील बाबी ः
- दररोज सकाळी ४ वाजता गाईंना दूध काढण्यासाठी गव्हाणीमध्ये आणून बांधले जाते. तेथे त्यांना ओला चारा, सुका चारा यांची कुट्टी आणि पशुखाद्य दिले जाते. त्यानंतर मिल्किंग मशिनद्वारे दूध काढले जाते.
- दूध काढल्यानंतर गाईंनी चारा पूर्ण खाल्ला की पुन्हा त्यांना दिवसभर मुक्त संचार गोठ्यात सोडले जाते.
- गाभण गाईंची विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्यासाठी मुक्त संचार गोठ्यामध्येच वेगळी व्यवस्था केली जाते.
- वासरांच्या जन्मापासून सर्व नोंदी ठेवल्या जातात. त्यामुळे त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे सोयीचे होते.
- मुक्त संचार गोठ्यात गाईंना पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध केले जाते. त्यासाठी सायपण पद्धतीचा वापर केला आहे.
- गाईंचे दूध काढण्यासाठी मिल्किंग मशिनचा वापर केला जातो.
- गोठ्यातील कामांसाठी सहा मजूर ठेवले आहेत. हे मजूर चारा कुट्टी करण्यापासून ते दूध काढणीपर्यंत सर्व दैनंदिन कामे करतात. मजुरांना महिन्याकाठी चांगला पगार दिला जातो. त्यामुळे प्रत्येक गाईचे बारकाईने आणि योग्य व्यवस्थापन ते करतात.

चारा पिकांची लागवड ः
गाईंना दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी शेतात चारा पिकांची लागवड केली आहे. साधारण १ एकरांत सुपर नेपिअर आणि २ एकरांत मका पिकाची लागवड केली जाते. वर्षभरात साधारण ३ वेळा मका पीक घेतले जाते. त्यातील अर्धी मका चाऱ्यासाठी आणि अर्धी मुरघास निर्मितीसाठी वापरली जाते.

खाद्य नियोजन ः
- गाईंना दर्जेदार आणि चांगला चारा उपलब्ध केला जातो. त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य राखणे शक्य होते.
- ओल्या चाऱ्यामध्ये मका, नेपियर गवताचा वापर केला जातो.
- एका गाईला दोन्ही वेळचे मिळून प्रतिदिन ५ किलो गोळीपेंड, चारा कुट्टी २० किलो, मुरघास १५ किलो याप्रमाणे दिले जाते. शिवाय दूध उत्पादनानुसार पशुखाद्य दिले जाते.
- वर्षभर गाईंना दर्जेदार चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी २०० टन मुरघास तयार केला जातो.

आरोग्य व्यवस्थापन ः
- दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यासाठी गाईंचे आरोग्य चांगले राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी नियमितपणे पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण केले जाते.
- गाईंची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी त्यांना खनिज मिश्रण ५० ग्रॅम प्रति गाय प्रमाणे दररोज दिले जाते.
- तीन महिन्यातून १ वेळ जंतनाशकाची मात्रा दिली जाते.
- गोचीड निर्मूलनासाठी गोठ्यात गोचिडनाशकाची फवारणी तसेच लसीकरण केले जाते.
- लाळ्या खुरकूत आणि इतर आजारांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते.

लहान वासरांचे व्यवस्थापन ः
- लहान वासरांसाठी ४ बाय ४ फूट आकाराचे काल्फ बॉक्स तयार केले आहेत. त्यात त्यांना सुरवातीचे ३ महिने ठेवले जाते.
- काल्फ बॉक्सला पाणी आणि गोळी पेंड देण्यासाठी दोन स्वतंत्र बादल्या जोडून ठेवलेल्या आहेत. त्याद्वारे खाद्य आणि पाणी पुरवठा केला जातो.
- वासरांना जन्मानंतर सुरवातीच्या काळात बाटलीच्या मदतीने अडीच ते ३ लिटर दूध पाजले जाते. साधारण २ महिन्यांनी हळूहळू दूध बंद करून चारा खाण्याची सवय लावली जाते. दहा दिवसांनी वासरांसाठी येणारी गोळी पेंड दिली जाते.
- साधारण ३ महिन्यांनी दूध पूर्णपणे बंद करून चारा कुट्टी आणि गोळी पेंड देण्यास सुरवात केली जाते. आणि मुक्त संचार गोठ्यात सोडली जातात.
-------------------
- दत्तात्रय वाघ, ९८५०२२२५६८
(शब्दांकन ः विकास जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT