Mango Blossom Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : पावसाने आंबा, द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले

Team Agrowon

Pune News : आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले असून, कोकणात मुसळधार पावसाने सोमवारी (ता. ९) हजेरी लावली. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसह राज्यभरातील द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. मागील दोन दिवसांपासून बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. यासह भाजीपाला, कांदा, डाळिंब, रब्बी ज्वारीला फटका बसण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात मंगळवारी दुपारनंतर संततधार पाऊस सुरू झाला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कांदा लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली. पिके भाजीपाला तसेच रब्बीतील पिकांना अडचण ठरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी ऊसतोडी खोळंबण्याची शक्यता आहे. तसेच वाहतुकीसाठीही पाऊस अडचण ठरू शकते.

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवार (ता. ८) मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. मंगळवारी (ता. ९) सकाळीही रत्नागिरी, दापोली, लांजा, राजापुरात हलका पाऊस झाला. दोन तासांहून अधिक काळ पडलेल्या पावसाने आंबा बागायतदारांचे नुकसान झाले असून, मोहरासह आणि फळधारणेसह कैरीच्या अवस्थेत असलेल्या झाडांवर बुरशीजन्य आणि कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. हवामान विभागाने किनारपट्टी भागात काही मोजक्याच ठिकाणी तुरळक पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविली असून, बुधवारपर्यंत (ता. १०) जोर राहील असा अंदाज वर्तविला आहे.

रत्नागिरी तालुक्यात १८.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यंदा पहिल्या टप्प्यात हापूस आंबा कलमांवर चांगला मोहर आल्यामुळे बागायतदार सुखावले होते. उशिराने थंडी सुरू झाली असली तरीही वातावरण पोषक होते. मात्र पडलेल्या पावसासह ढगाळ वातावरणाने बागायतदारांच्या आशांवर पाणी फिरले आहे.

काही बागायतदारांनी थ्रीप्स, तुडतुड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन दिवसांपूर्वीपासून कीटकनाशके फवारणी केली होती. आज पडलेल्या पावसाने हा खर्च वाया गेला आहे. पुढील दोन दिवसांत बुरशीजन्य आजारासह कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा फवारणी करण्याची वेळ बागायतदारांवर येणार आहे. सध्या मोहर, कणी, सुपारी एवढी कैरी आणि मोठी कैरी अशा विविध टप्पे झाडावर दिसत आहेत. त्यावर पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होणार आहे. संगमेश्‍वर तालुक्यात आंबा-काजूचा मोहर पावसाने गळून गेला आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला विजांच्या गडगडाटांसह मॉन्सूनोत्तर पावसाने सोमवारी (ता. ८) झोडपून काढले. सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या पावसामुळे आंबा, काजूचा मोहर काळवंडण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील पडेल मंडलात सर्वाधिक ५०.३ मिलिमीटर, तर शिरगाव मंडलात ४३.५ मिलिमीटर (ता. देवगड) पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाळी वातावरण निर्माण झाले. वैभववाडी, फोंडा या परिसरांत पावसाळी वातावरणच होते.

दरम्यान, साडेचार वाजेच्या सुमारास वैभववाडी तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री जिल्ह्याच्या बहुतांशी भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

सर्वच तालुक्यांत पावसाच्या सरीवर सरी सुरू होत्या. जिल्ह्यातील पडेल मंडलात सर्वाधिक ५०.३ मिलिमीटर, तर शिरगाव मंडलात ४३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. याशिवाय देवगड तालुक्यातील इतर मंडलांत देखील जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका देवगड हापूसला बसणार आहे.

वैभववाडी तालुक्यातील एडगाव मंडलात २३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, वैभववाडी मंडलात १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या मंडलामध्ये काजू पिकांची मोठी लागवड आहे. त्यामुळे या भागातील काजू पीक संकटात सापडले आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. ९) पहाटेपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

राज्यात कसे आहे हवामान ...

- राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची हजेरी.

- सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरीत सोमवारी रात्री पावसाची हजेरी.

- परभणी, हिंगोली, खानदेश, मराठवाड्यात ढगाळ हवामान.

- पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस.

- नाशिक, सोलापुरात ऊन-सावल्यांचा खेळ.

- विदर्भातील नागपूर, अमरावती जिल्ह्यांत ढगाळ हवामान.

पावसामुळे करपा, भुरी, थ्रीप्ससह तुडतुडा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव निर्माण होऊ शकतो. त्यासाठी बागायतदारांना परिस्थितीनुसार कीटकनाशकांची फवारणी करावी लागेल. हवेतील आर्द्रता वाढली तर बुरशीला पोषक स्थिती निर्माण होईल. तसेच जमिनीत पाणी मुरल्यामुळे काही झाडांना पालवीही फुटण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच गतवर्षी फेब्रुवारीत अचानक तापमान वाढले होते, तसे आता झाल्यास मोठ्या कैरीची गळ होऊ शकते.
- डॉ. के. व्ही. मालेश, संशोधक, कोकण कृषी विद्यापीठ
यंदा आंबा हंगाम चांगला येईल अशी आशा होती; परंतु बदलत्या वातावरणाने बागायतदारांच्या आशांवर पाणी फिरले आहे. बुरशीसह कीटकजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. हवामान विभागाने बुधवारपर्यंत पावसाची आणि ढगाळ वातावरणाची शक्यता वर्तविली आहे.
- डॉ. विवेक भिडे, आंबा बागायतदार
पाऊस झाल्यास तयार होण्याच्या अवस्थेतील प्रामुख्याने निर्यातक्षम जम्बो जातीच्या द्राक्ष घडातील मणी क्रॅकिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे द्राक्ष उत्पादनांचा जीव भांड्यात पडला आहे. द्राक्ष बागांच्या छाटणीनंतर सातत्याने प्रतिकूल हवामान राहिल्याने या वर्षी द्राक्ष बागांच्या भांडवली खर्चात मोठी वाढ झाली आहे.
- गणेश गाडेकर, द्राक्ष उत्पादक नारायणगाव
ढगळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव संभवतो. त्यामुळे मॅकोन्झेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर व १० मिलि स्टिकर यांच्या आवश्यकतेनुसार फवारण्या घ्याव्यात. द्राक्ष पिकावर भुरीचा प्रादुर्भाव संभवतो. त्यासाठी बागेच्या अवस्थेनुसार शिफारशीच्या मात्रेत बुरशीनाशकांची फवारणी घ्यावी. तसेच जैविक बुरशीनाशक जसे की, अम्पीलोमायसिस, किंवा ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनास यांची ५ ग्रॅम प्रतिलिटर मात्रेत फवारणी घ्यावी.
- डॉ. राकेश सोनवणे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

Ration Grain : ई-केवायसी नसल्यास एक नोव्हेंबरपासून रेशन बंद

Kolhapur market committee : कोल्हापूरच्या बाजार समितीत डुक्कर आणि चोरांनी केलं बेजार, आळा घालण्याची मागणी

Cold Storage Facility : जतला शीतगृह, अन्यत्र पायाभूत सुविधा देणार

SCROLL FOR NEXT