Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rabi Sowing : मराठवाड्यात रब्बी पेरणीला खीळ

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात दुष्काळाचे संकट अधिक गडद होत आहे. ऑक्टोबरअखेर सात जिल्ह्यांत झालेल्या नगण्य रब्बी पेरणीने त्याची प्रचिती दिली आहे. शिवाय फळबागा टिकविण्याच्या संकटाची चाहूलही लागली आहे. रब्बी पेरणीसाठी ओल मिळेल असा पाऊस झाला नाही. उपलब्ध असलेले पाणी किती दिवस, महिने टिकेल याची कल्पना नाही. या विवंचनेत रब्बीच्या पेरणीला खीळ बसल्याची स्थिती आहे.

यंदा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या आठ जिल्ह्यांत २० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

या प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत प्रस्तावित करण्यात आलेल्या १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर क्षेत्रासह छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील ३ जिल्ह्यांत प्रस्तावित करण्यात आलेल्या ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्रापैकी लातूर कृषी विभागातील पाचपैकी नांदेड वगळता चार जिल्ह्यांत ६०४५१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ४.४३ टक्के इतकी आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या तुलनेत ९७ हजार ८९३ हेक्टरवरच रब्बीची पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वांत कमी १.६ टक्का क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात १.९ टक्का, लातूर जिल्ह्यात ३.८८ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४.४४ टक्के, धाराशिव जिल्ह्यात १०.८९ टक्के, जालना जिल्ह्यात १३.४८ टक्के, तर बीड जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १८.६७ टक्केच पेरणी आटोपली आहे.

पाण्याअभावी रब्बीवर प्रश्‍नचिन्ह

मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची स्थिती दयनीय आहे. सर्वाधिक संख्येने असलेल्या लघू व मध्यम प्रकल्पात अनुक्रमे ३५ व ३१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण ८७७ प्रकल्पात ५० टक्के ही उपयुक्त पाणीसाठा नाही.

दुसरीकडे विहीर बोअरवेल यांना असलेले पाणी किती दिवस महिने टिकेल याची शाश्‍वती नाही. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जमिनीत ओल नाही. अशा स्थितीत प्रस्तावित करण्यात आलेली रब्बी पेरणी होईल कशी हा प्रश्‍न आहे.

कृषी विद्यापीठाने केले सजग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी विभागाच्या यंत्रणेला ‘एल निनो’मुळे उद्‍भवलेल्या स्थितीबाबत नुकतीच एका कार्यशाळेच्या माध्यमातून अवगत केले आहे.

पाणीसाठांमध्ये उपलब्ध असलेले पाणी, शेततळे, जलस्रोतांची अवस्था, भूगर्भातील पाणीसाठा स्थिती, फळबागांना लागणारे पाणी, रब्बीत शेतकरी घेत असलेल्या पिकासाठी लागणारे पाणी आणि नागरिकांसह जनावरांना पिण्यासाठी लागणारे पाणी, याचा अंदाज घेऊन अत्यंत सूत्रबद्धपणे पुढची वाटचाल करण्याची गरज असल्याचेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

परिस्थिती पाहता गंभीर संकट उद्‍भविल्यानंतर कामाला लागण्यापेक्षा आधीच नियोजनपूर्वक येऊ घातलेल्या संकटाला तोंड देण्याची तयारी करण्याच्या सूचना या कार्यशाळेतून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हानिहाय रब्बी पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा.......सर्वसाधारण क्षेत्र... प्रत्यक्ष पेरणी ...टक्का

छ.संभाजीनगर ..१९०९३५.... ८४८३.... ४.४४

जालना .... २१७८९२.... २९३७५.... १३.४०

बीड... ३३२३५३.... ६००३५..... १८.६७

लातूर ... २८०४३९..... १०८६९.... ३.८८

धाराशिव... ४१११७२.... ४४७७१... १०.८९

परभणी... २७०७९४.... २८७७.... १.०६

हिंगोली... १७६८९१.... १९३४.... १.०९

झालेली पेरणी पाहता सरासरी इतकी पेरणी होण्याची शक्यता कमीच आहे. जी पेरणी झाली त्या पिकांनाही पाण्याची आवश्यकता भासणार आहे. विहिरीच्या पाण्याची पातळीही वाढली नाही. तूर, कपाशी वगळता इतर पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. खत, बियाणे उपलब्ध असले तरी जमिनीत ओल नसल्याने शेतकरी पेरावे की नाही या विवंचनेत आहे.
- डॉ. तुकाराम मोटे, विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT