Buffalo Agrowon
ॲग्रो विशेष

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Animal Care : सकाळची गांडूळ खतावर पाणी मारण्यासह सगळी काम आटोपून आंघोळ केली. साडेअकरा वाजता हटवर आलो.

Team Agrowon

महारुद्र मंगनाळे 

Buffalo Story : सकाळची गांडूळ खतावर पाणी मारण्यासह सगळी काम आटोपून आंघोळ केली. साडेअकरा वाजता हटवर आलो. बारा वाजता जेवण करून आराम केला. बाहेर पडू वाटत नसतानाही,  एक वाजता गोठ्यात जाऊन जनावरांना पाणी पाजून आलो. सगळ्या सजिवांची स्थिती सारखीच आहे. प्रत्येकजण पाणी, पाणी करतोय. हिवाळ्यात अर्ध बकेट पाणी न पिणारी गाय, आता दिड-दोन बकेट पाणी पितेय. म्हशीने तर दम खाऊ खाऊ तीन बकेट पाणी संपवलं.

पाठिवर पाणी टाकलं की, पुन्हा अर्ध बकेट पिलं. एकवेळ चारा नाही टाकला तरी चालेल पण पाण्याविना पशू-पक्षी जिवंत राहू शकत नाहीत. पक्ष्यांसाठी बागेत चार हौद आहेत. त्यात कुत्रेही अधूनमधून डुबक्या मारतात. शिवाय गोठ्यासमोरचा सिमेंटचा हौद कायम भरलेला असतो. तरीही हटच्या दरवाजात सविताने एक येळणी लटकावून ठेवलीय. त्यात पाणी ओतणं सुरूच असतं. इथं इवल्याशा चिमण्या पाणी पितात अन् आंघोळही करतात.

पक्षीही हौदात डुबकी मारतात. मी ही सध्या दिवसभरात तीन-चार वेळा आंघोळ करतोय. मी दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी सहज पित असेन. जनावरांना वाळलेला, कुट्टी केलेला चारा टाकताना तो अंगावर पडतो. धुरळा केसात जातो. उकाड्यामुळं अंग घामानं डबडबून जातं. टी शर्ट ओलं होतं. तेव्हा अंगावर पाणी ओतून घेण्याशिवाय पर्याय राहात नाही. आम्ही कुठल्याही कारणासाठी वापरलेलं पाणी वाया जात नाही. ते झाडांना मिळतं. हे ही महत्त्वाचं.

उन्हाळा आणि पाण्यावरून मला भूतकाळ आठवला. शालेय आयुष्यात अनेक उन्हाळ्यात आमच्या विहिरीचं पाणी आटून जायचं किंवा पालापाचोळा पडून ते पिण्यायोग्य राहायचं नाही. शेजारच्या शेतकऱ्याच्या विहीरीतून पाण्याची घागर आणायचो. तशी ती विहीरही डबकाडच होतं. पण उन्हाळ्यातही तिथं पाणी असायचं. मे अखेरीस त्या पाण्यालाही चिखलाचा वास यायचा.. पण त्याच्याकडं दूर्लक्ष करून ते प्यायचो. माळावरच्या शेतात दगड, धसकटं वेचायला जायचो तेव्हा एकाच्या खांद्यावर पाण्यानं भरलेली लोखंडी घागर असायची.

तेवढंच पाणी दिवसभर पुरवणीने घालायचो... उन्हाळ्याचे ते दिवस आठवले की, आजही अंगावर काटा येतो. शेतीतील जुन्या दिवसाचे कोणी गुणगान करू लागला की, माझ्या लक्षात येतं. याचा शेतीशी काहीही संबंध राहिलेला नाही. जुनी शेती अधिक कष्टप्रद, काहीही सुविधा नसलेली होती. गरजा फारशा नव्हत्याच. त्यामुळं भागून जायचं. आज शेती कोणाचीही रंगीबेरंगी स्वप्नं पूर्ण करू शकत नाही. त्यामुळं शेतीच्या नावानं बोटं मोडणं वाढलयं. पण आज शेतीत बऱ्यापैकी सुविधा आहेत. ठरवलं तर कोणीही आपल्या शेतीत राहू शकतो... लोकांना मात्र गाव सोडायचं नाही, हे वास्तव आहे.

मी शेतीत आल्यानंतर २५-३० फुट खोलीची विहीर ७२ फुट खोल घातली. तरीही पाण्याचा झरा लागला नाही. मात्र या खोलीमुळे खात्रीची साठवणूक झाली. विहीरीतील पाण्याचं अजिबात बाष्पीभवन होत नाही. साधारण डिसेंबर, जानेवारी पर्यंत हिवाळी झरे चालू असतात. ते थांबले की, आम्ही पाण्याचं काटेकोर नियोजन करतो. इतरवेळी बागेला आणि आम्हा सगळ्यांना वापरायला हे पाणी पुरेसं ठरतं.

पण दुष्काळी वर्ष लागलं की, आम्हाला पाणी टंचाई जाणवू लागली. दहा वर्षांत तीनवेळा टँकरने पाणी आणून फळझाडांना दिलं. तरीही काही झाडं वाळलीच. हा त्रास लक्षात घेऊन, गतवर्षी शेततळं केलं. प्लास्टिक अंथरून पाणी भरलं. सध्या शेततळ्यात फक्त पाच फुट पाणी कमी आहे. तर विहीरीत २०-२२फुट पाणी आहे. एवढ्या पाण्यावर आम्ही या उन्हाळ्याला नीट तोंड देऊ शकतो. बागेची चिंता मिटलीय. पाण्याअभावी एकही झाड वाळायला नको याबाबत मी सजग आहे. हे पाणी आहे म्हणून बाग, रुद्रा हट आहे. पाणी नसतं तर, इथं एकही दिवस राहणं शक्य नव्हतं.

मी हा मुद्दा सातत्याने मांडत आलोय. शेतकरी अल्पभूधारक असला तरी, त्याच्या शेतात पाण्याची किमान सोय असलीच पाहिजे. भलेही ते पाणी साठवलेले का असेना! निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MLA Hearing: तीन आमदारांच्या प्रकरणात २२ ऑगस्टपासून अंतिम सुनावणी

Foreign Agri Tour: विदेश दौऱ्याच्या नावाखाली पैसे उकळण्याचे प्रयत्न

Satyapal Malik Death: सत्यपाल मलिक यांचे निधन

Bhimashankar Sugar Mill: ‘भीमाशंकर’चा प्रतिटन २१० रुपयांचा हप्ता जाहीर

NAFED Onion Procurement: अवसायनातील संस्थेकडून ‘नाफेड’ची कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT