Maharudra Mangnale : माझ्या जगण्याची प्रेरणा शेतीच!

शेती कितीही तोट्याची असली तरी, माझ्या जगण्याची आता तिच प्रेरणा आहे. आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत मी इथं निसर्गात नसतो तर, नैराश्यग्रस्त झालो असतो.
Maharudra Mangnale
Maharudra MangnaleAgrowon

शेती परंपरेतील माझा सगळ्यात आवडता सण वेळामवस्या. कसलं अवडंबर नाही, पुजेचा दिखाऊपणा नाही, डामडौल नाही ना गोंधळ. शांततेत निसर्गाची पुजा करून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि मित्रांसोबत निवांत जेवण करायचं.

मेनूही ठरलेला. ज्वारी, बाजरीची भाकरी, भजी,गव्हाची खीर, फिकं वरण, भात आणि आंबील. वर्षांनुवर्षे यात बदल नाही. अगदी बालपणापासूनच्या या सणाचे प्रसंग स्मरणात आहेत. मी कुठंही असलो तरी, या सणाला आवर्जून हजर राहातो. वडील हयात असतानाच्या वेळामवस्या. वडिलानंतर वेळामवस्येची सुत्रं मायीकडं आली.

तीन दिवस आधीपासून तिची या सणाच्या तयारीसाठीची धावपळ बघायचो. माय गेल्यानंतर, हा सण साजरा करू नये असंच पहिल्या वर्षी वाटलं. पण मायीचा आवडता सण म्हणून सविता आणि वहिनींनी ही परंपरा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. तसाही तो माझा विषय नव्हता. मायीच्या पश्चात साजरी होत असलेली ही तिसरी वेळामवस्या. तिची आठवण येण अटळ. ती आजुबाजुला वावरतेय असाच भास झाला.

Maharudra Mangnale
Maharudra Mangnale : या खरीप हंगामातून मुक्त झालो!

एके काळी वेळामवस्येला ४०-५० जण असायचे. हळूहळू ही संख्या रोडावत वीसवर आलीय. माझे पहिलीपासूनचे वर्गमित्र विठ्ठल कामाळे ,ख्वाजा किनीवाले गुरूजी ,पत्रकार मित्र दिनकर मद्देवार आणि माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यावर महत्त्वाची भूमिका बजावलेले अशोक वेदपाठक यांना दरवर्षी निमंत्रण देतो. ते आजही आले. छान गप्पा झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हे निमित्त आहे. अन्यथा या भेटी दुर्मिळ झाल्यात.आजकाल माणसांचं काही खरं राहिलेलं नाही. कोण,कोणत्या कारणाने ,कधी दूरावेल ते सांगणं कठीण आहे. त्यामुळं या भेटी तशा मोलाच्या असतात.

सगळे आपापल्या व्यापात अडकलेत. त्याच जगात आहेत. मी त्यांच्या जगात नाममात्र आहे. फार काळ त्यात रमू शकत नाही. त्यांना त्या जगातून बाहेर पडावं वाटलं नसेल, शक्य झालं नसेल किंवा यापेक्षा वेगळं काही जग असतं, याची कल्पनाही नसेल. अशोकनी त्यांच्या कल्पनेत त्यावेळी पाहिलेलं जगणं, मी काही प्रमाणात जगतोय. अशोक मात्र त्यात अडकून पडले. बाहेर पडू शकले नाहीत. ते मानसिक आणि शारिरीक दृष्टीने थकलेत. त्यामुळे त्यांची आजची उपस्थिती मोलाची होती.अशोकसोबत मी घालवलेला काळ हा एका कादंबरीचा विषय आहे. आम्ही स्वप्नवत जगलो. हा माझ्या जडणघडणीचा काळ यावर लिहिण्याचा मानस आहेच.

शेती कितीही तोट्याची असली तरी, माझ्या जगण्याची आता तिच प्रेरणा आहे.आजच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत मी इथं निसर्गात नसतो तर, नैराश्यग्रस्त झालो असतो. आता जगायचं, प्रयोजनाशिवाय!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com