Crop Protection Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Farming Tips: वाढत्या तापमानात फळझाडे, भाजीपाल्यांचे संरक्षण

Crop Protection: वाढत्या तापमानाचा फळझाडे आणि भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होतो. फुलगळ, फळगळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनासह सिंचन, आच्छादन आदी बाबींचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Team Agrowon

भूषण यादगीरवार, डॉ. महेश बाबर

Agriculture Solution: तापमानात वाढ झाल्यानंतर वनस्पतीचा श्‍वसन करण्याचा वेग वाढतो आणि त्यांना पुरेसा प्राणवायू मिळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच अतिउष्ण तापमानामुळे फूलगळ व फळगळ होताना दिसून येते. पीक फुलोरा अवस्थेत असताना ते परिपक्व होण्याच्या काळात तापमान वाढले, तर उत्पादनात घट होते. अशा वाढत्या तापमानात योग्य व्यवस्थापन न केल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.

ओलावा टिकवण्यासाठी उपाययोजना

सर्व सूक्ष्मजीव, वाळवी, भुंगेरे, गांडुळे जमिनीला अधिक समृद्ध आणि सच्छिद्र करतात. शेतामधील असंख्य सूक्ष्मजीव पालापाचोळ्यावर जगत असतात. माती समृद्ध झाल्याशिवाय तापमान वाढीला प्रतिकार करणे शक्य नसते. माती समृद्ध होण्यासाठी मातीत विविध प्रकारचे जिवाणू असणे आवश्यक आहे. जेणेकरून पालाशचा पुरवठा होऊन फळगळ कमी होते. तसेच खोडांना चिरा पडत नाहीत.

पालापाचोळा जाळल्यामुळे  सूक्ष्मजीवांना अन्न शिल्लक राहत नाही. जैविक आच्छादनामुळे वातावरणातील तापमानाच्या तुलनेमध्ये जमिनीचे तापमान ५ अंश सेल्सिअसने कमी राहते. वातावरणातील तापमान कमी असल्यास जमिनीचे तापमान ५ अंश सेल्सिअसने अधिक असते. त्यासाठी सेंद्रिय अवशेषांचा वापर करून माती आच्छादित करावी.

जैविक आच्छादनामुळे मुळांच्या सानिध्यातील माती थंड राहून ओलावा टिकण्यास मदत होते, शिवाय उष्णतेचा परिणाम कमी होतो.

नवीन लागवडीच्या रोपांजवळील किमान २ ते ३ फूट परिघामधे सेंद्रिय पदार्थांचा किमान १० सेंमी जाडीचा थर देऊन आच्छादन करावे. आच्छादनासाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर केल्यामुळे कालांतराने ते कुजून उत्कृष्ट सेंद्रिय खत उपलब्ध होते. त्याचा जमिनीस आणि पिकांना फायदा होतो.

आंबा

तापमानवाढीमुळे आंबा बागेत फळगळ जास्त प्रमाणात होते. फळगळ रोखण्यासाठी प्रतिझाड १५० ते २०० लिटर प्रमाणे पाणी द्यावे. तसेच १३:००:४५ याची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. गळून पडलेल्या फळांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेत गळून पडलेली फळे गोळा करून बागेबाहेर नेऊन योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी.

केळी

उन्हाळ्यात केळीच्या पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी १५ दिवसांच्या अंतराने केओलीन या बाष्परोधक पावडरची ८० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे केळीच्या पानावर पांढरा थर तयार होतो. तो पानातील छिद्रांना अंशतः बंद करतो.

पूर्ण निसवलेल्या घडाचा दर्जा राखण्यासाठी तसेच कीड, रोगापासून संरक्षण करण्यासाठी शिफारशीत घटकांची फवारणी करावी. या फवारण्यानंतर ६ टक्के सच्छिद्रतेच्या पांढऱ्या किंवा निळ्या प्लॅस्टिक पिशवीने किंवा पॉलिप्रोपेलिन पिशव्यांनी किंवा जुन्या साड्यांनी घड दांड्यासहीत झाकावेत. घडाच्या दांड्यावर सुतळीने पिशवी बांधावी. पिशवीचे खालचे तोंड मोकळे ठेवावे. पिशवीने घड झाकण्यामुळे घडाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन घडाचे तीव्र सूर्यप्रकाश आणि किडीपासून संरक्षण होते. तसेच घडाची पक्वता लवकर होऊन फळांची गुणवत्ता वाढते.

एप्रिल महिन्यात उष्ण वाऱ्यांमुळे जमिनीतून  पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते. त्यामुळे पाने फाटतात, मोडतात, घड सटकतात, झाडे वाकून मध्यावर मोडते. यासाठी झाडांना  आधार द्यावा. पक्व झालेल्या घडाची वेळेवर कापणी करावी.

नारळ

नवीन लागवड केलेली नारळ रोपे व त्यांची पाने कडक उन्हामुळे करपतात. ते टाळण्यासाठी रोपांना वरून सावली करावी. रोपांच्या जवळ दोन फूट अंतराच्या परिघात गोलाकार पद्धतीने तागाचे बी पेरावे. तागाची वाढ झपाट्याने होऊन नारळ रोपाभोवती सावली राहते.

तीन ते चार वर्षे वयापर्यंतच्या माडांना ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावी. पूर्ण वाढलेल्या माडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे.नारळाच्या मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावयाचे असल्यास प्रति दिन ४० लिटर पाणी द्यावे.

बोर्डो पेस्टचा वापर

उन्हामुळे फळझाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास झाडांच्या खोडावरील साल तडकण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. अशावेळी झाडांचे बुरशीजन्य व इतर रोगांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने फळझाडाच्या खोडांना बोर्डो पेस्ट लावणे गरजेचे असते. सर्वसाधारणपणे १ ते २ मीटर उंचीपर्यंत चुन्याची पेस्ट किंवा बोर्डोपेस्ट लावावी. बोर्डो पेस्ट लावण्याने सूर्यकिरण परावर्तित होण्यास मदत होऊन साल तडकत नाही.

भाजीपाला पिकांत क्रॉप कव्हरचा वापर

उन्हाळ्यात वाढत्या तापमानात भाजीपाला पिकांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी भाजीपाला पिकांत ‘क्रॉप कव्हर’ चा वापर फायदेशीर ठरतो. मिरची,  काकडी इत्यादी पिकांत ‘क्रॉप कव्हर’ (२७ जीएसएम) चा वापर करता येतो. क्रॉप कव्हरचा वापर केल्यामुळे सूक्ष्म वातावरण तयार होऊन किडी-रोगांना अटकाव करणे शक्य होते. फळभाज्यांचा दर्जा सुधारून फळांचे वजन वाढीस लागते. हे कव्हर रोपांभोवती घालण्यासाठी टनेल किंवा भुयारी आकाराची रचना करावी लागते. त्यासाठी साधारण  २६०० मीटर एवढ्या कव्हरची  गरज भासते. व्यवस्थितरीत्या क्रॉप कव्हरचा वापर केल्यास किमान दोन हंगामातील पिकांसाठी ते फायदेशीर ठरते. शिवाय कीडनाशकांच्या तीन ते चार फवारण्या कमी होतात.

डाळिंबामध्ये क्रॉप कव्हरचा वापर

वाढत्या तापमानामुळे डाळिंब फळांवर चट्टे पडतात. डाळिंब बागेचे वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी क्रॉपकव्हर तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. यामध्ये विशेषतः २२ ते २७ मेश जाडीच्या क्रॉप कव्हरने झाड झाकल्याने पिकाचे उन्हापासून संरक्षण होते. तसेच उन्हाळ्यात वातावरणातील तापमानाच्या तुलनेत बागेतील तापमान किमान ७ अंश सेल्सिअसने कमी राहू शकते. क्रॉप कव्हरचा वापर केल्यामुळे डाळिंब फळाची गुणवत्ता चांगली राहते. फळांवर पडणारे चट्टे रोखले जातात. त्यामुळे बाजारात या डाळिंबाला चांगला भाव मिळतो.

काकडी

जाळीदार नायलॉन नेटचा आधार

काकडी पिकाच्या भरपूर उत्पादनाच्या दृष्टीने सूर्यप्रकाश आणि वायुवीजन चांगले मिळणे आवश्यक असते. यासाठी जाळीदार नायलॉन जाळी महत्त्वाची असते. ही नायलॉन जाळी दोन ते तीन हंगाम टिकते. साधारणपणे एक किलो वजनात ७०० फूट लांबीचे नेट बसते. एक एकरसाठी साधारणपणे १२ ते १४ किलो नायलॉन नेट पुरेसे असते. या जाळीदार नेटमध्ये त्रिकोणी आकाराचे ७ इंचाचे कप्पे असतात, त्यामध्ये वेलवर्गीय पिकांना आधार मिळून त्यांची वाढ चांगली होते. वेलींना वाढण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध झाल्याने फवारणी सुलभ होते. आर्द्रता कमी राहिल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. वेलीला आधार देण्याच्या कामासाठी कमी मनुष्यबळ लागत असल्याने हाताळणी कमी होऊन पिकास बसणारा अजैविक ताण कमी होतो.

फळांच्या टोकाला कुजणे (ब्लॉसम एण्ड रॉट)

काकडी पिकामध्ये फळांच्या टोकाला कुजण्याची समस्या दिसून येते. यालाचा ‘ब्लॉसम एण्ड रॉट’ म्हणतात. त्यामुळे फळांच्या टोकावर लहान, हलके तपकिरी ठिपके दिसतात. फळांवर खोलवर, तपकिरी किंवा काळे डाग दिसतात. ही समस्या फळांमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण कमी असल्याने आणि पाण्याचा ताण पडल्यामुळे दिसून येते. जमिनीतील क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने किंवा जमिनीतील ओलावा कमी असल्यास ही विकृती वाढते. हलक्या जमिनीत ही विकृती जास्त दिसून येते.

ही विकृती टाळण्यासाठी काकडी पिकाचे नियमितपणे निरिक्षण करावे. आवश्यकतेनुसार चिलेटेड कॅल्शिअम ०.५ ते १ ग्रॅम किंवा कॅल्शिअम नायट्रेट २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फवारणी करावी.

काकडी वाकडी होणे

वाकडेपणा असलेल्या काकडीला बाजारभाव कमी होते. काकडी वाकडी होण्याची अनेक कारणे आहेत. पाने किंवा देठ वाढत्या ऊतींना नुकसान पोहोचवून फळांच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे फळे केळीसारखे वाकडी होतात. अशी काकडी बाजारात विक्रीसाठी योग्य नसते. जास्त तापमान, कमी आर्द्रता, अयोग्य पोषण आणि कमी वायुवीजन यामुळे देखील काकडी वाकडी होते. काकडी मऊ असताना पांढरी माशी, लाल कोळी, फुलकिडे आणि फळमाशी दंश करून विकसनशील ऊतींना नुकसान करतात. या विकृतेचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर रासायनिक कीटकनाशकांची तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. शिवाय नायलॉन जाळीचे किंवा मंडपाचा आधार देऊन पिकाचे संरक्षण करावे.

- भूषण यादगीरवार ९९७००७०९३२ 

(कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT