
Nashik News : नाशिक : नैसर्गिक आपत्ती व वातावरणीय बदलांमुळे राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. द्राक्ष बागांसाठी राज्य सरकारने ‘क्रॉपकव्हर’ योजना राबवली आहे; मात्र त्याचा लाभ शेतकऱ्यांना अद्याप मिळत नाही. त्यामुळे ‘मागेल त्याला क्रॉपकव्हर’ देण्यात यावे. यासाठी शेतकऱ्यांना भरीव अनुदान द्यावे, अशी मागणी देवळाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान सभागृहात केली.
नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या काही वर्षांत द्राक्ष उत्पादकांचे सातत्याने मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर होणारा लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. त्यातच व्यापारी, दलालांकडून होणारी फसवणूक, कीटकनाशके, रासायनिक खतांचे वाढलेले दर यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. परिणामी शेतकरी कर्जाच्या ओझाखाली दाबला गेला आहे.
त्यामुळे गेल्या वर्षभरात हजारो हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी तोडल्या आहेत. त्यामुळे द्राक्ष शेती वाचवायची असेल तर राज्य सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार अहिरे यांनी केली.
कृषी निविष्ठा व शेती अवजारांवरील जीएसटी रद्द केला पाहिजे. हा अधिकार केंद्र शासनाचा असल्याने राज्य सरकारने पाठपुरावा करून मागणी करावी. तसे झाल्यास मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल. यांसह झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागांसह इतर पिकांचे मोठे नुकसान आहे. याचे बरेचसे पंचनामे झाले. या पंचनाम्यांचा अहवाल मागवून जे काही नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे, त्यांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आमदार अहिरे यांनी केली.
द्राक्ष निर्यातीसाठी प्रोत्साहनाची गरज
बांगलादेशात किलोमागे सफेद द्राक्षांना जवळपास १००, तर रंगीत द्राक्षांना ११० रुपये आयात शुल्क आकारला जातो. परिणामी भारतीय द्राक्षांची निर्यात बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे. त्यामुळे द्राक्ष निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे आमदार सरोज अहिरे यांनी नमूद केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.