Fertilizers Use Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizers Use : योग्य पद्धतीने विद्राव्य खतांचा वापर

Team Agrowon

डॉ. बी. डी. जडे

Fertilizers Update : पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व निविष्ठांमध्ये पाणी आणि खते या दोन अत्यंत महत्त्वाच्या निविष्ठा आहेत. दोन्ही निविष्ठांचा पारंपारिक पद्धतीने वापर करीत असताना त्याची कार्यक्षमता फक्त ३० ते ४० टक्के मिळते. दोन्ही निविष्ठांचा ठिबक सिंचन पद्धतीमधून वापर केल्याने त्यांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते.

त्यामुळे पिकाचे अधिक उत्पादन तर मिळतेच आणि उच्चतम गुणवत्ता मिळते. त्याच बरोबर दोन्ही निविष्ठांच्या वापरामध्ये अनुक्रमे ५० ते ६० आणि २५ ते ३० टक्के बचत होऊन खर्चामध्ये बचत होते.

विद्राव्य खतांच्या मात्रा ठरविण्यापूर्वी माती परीक्षण होणे आवश्यक आहे. आपल्या जमिनीचा सामू, विद्युत वाहकता तसेच जमिनीत उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये किती आहेत हे लक्षात येते. त्यानुसार विद्राव्य खतांची मात्रा ठरविता येते. विद्राव्य खतांचा वापर शिफारशीनुसार आवश्यक आहे. जमिनीत निंबोळी पेंड, शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करावा.

फर्टिगेशनमध्ये अन्नद्रव्यांची मात्रा ठरवताना माती परिक्षणाचा अहवाल तपासावा. आपणास किती टन किंवा क्विंटल पीक उत्पादन घ्यावयाचे आहे आणि त्यासाठी किती अन्नद्रव्ये पिके जमिनीतून शोषण करतात यानुसार किंवा स्थानिक कृषी विद्यापीठाच्या संबंधित पिकाच्या शिफारशीनुसार अन्नद्रव्यांची मात्रा ठरवावी. फर्टिगेशन करत असताना पिकाच्या अवस्थेनुसार त्वरित बदल करावेत.

फर्टिगेशन तंत्राचा वापर

फर्टिगेशन तंत्रामुळे २५ ते ३० टक्के रासायनिक खतांच्या वापरामध्ये बचत होते. पाण्यात विरघळणारी खते ठिबक सिंचनासोबत वापरल्यास खत वापर कार्यक्षमता ८० टक्क्यांपेक्षा अधिक मिळते. राज्यात द्राक्ष, हरितगृहातील गुलाब, कार्नेशन, जरबेरा, टोमॅटो, ढोबळी मिरचीसाठी पूर्णपणे फर्टिगेशनचा वापर होत आहे. तर डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा, पेरू, पपई, ऊस, कापूस पिकांसाठी निम्मे पारंपरिक आणि निम्मे विद्राव्य खतांचा वापर शेतकरी करीत आहे. ठिबकने पाणी देताना पाण्यात विरघळणारी खते दिली पाहिजेत. ठिबक सिंचन हे केवळ फक्त पाणी देण्यासाठी नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

आवश्यक अन्नद्रव्ये

मुख्य अन्नद्रव्ये : कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नत्र, स्फुरद, पालाश

दुय्यम अन्नद्रव्ये : कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सल्फर

सूक्ष्म अन्नद्रव्ये : कॉपर, मँगेनीज, झिंक, लोह, बोरॉन,क्लोरिन, मॉलिब्डेनम, सिलिकॉन

विद्राव्य खताचे फायदे

१०० टक्के पाण्यात विद्राव्य असल्यामुळे आणि त्यातील अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात असल्यामुळे पिकांस लगेच उपलब्ध होतात.

निर्यातक्षम गुणवत्तेचे अधिक उत्पादन मिळते.

पिकांना पाणी आणि अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा होत असल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते.

पिकांच्या गरजेनुसार व अवस्थेनुसार दररोज अथवा दिवसाआड देता येतात.

थेट पिकांच्या मुळांच्या कक्षेत दिली जातात, ती मुळांना त्वरित उपलब्ध होतात.

खते सौम्य द्रावणातून दिली जात असल्यामुळे मुळावर अनिष्ट परिणाम होत नाही.

खते देण्याची पद्धत अतिशय सोपी असल्यामुळे वेळ, मजूर, खर्च, ऊर्जा, यंत्रसामग्रीची बचत होते.

खते रोज कमी मात्रेत दिली जात असल्यामुळे अन्नद्रव्ये निचऱ्यावाटे, स्थिरीकरणाद्वारे वाया जात नाहीत.

खते आम्लधर्मीय असल्यामुळे जमिनीचा सामू नियंत्रण करण्यास मदत होते. ठिबक संचात क्षार साचत नाहीत. ड्रीपर्स बंद पडत नाहीत.

खतांच्या मात्रेमध्ये २५ टक्के बचत होते.

सोडियम क्लोराइड्स सारख्या हानिकारक मुलद्रव्यापासून मुक्त असल्यामुळे जमिनीच्या पोताचा ऱ्हास होत नाही. तसेच उत्पादनाची गुणवत्ता अप्रतिम राहते.

खते फवारणीसाठी वापरता येऊ शकतात.

हलक्या जमिनीतही फर्टिगेशनद्वारे अधिक उत्पादन मिळविणे शक्य होते.

विद्राव्य खते द्यायची साधने

ठिबक सिंचन पद्धतीमध्ये व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक किंवा इंजेक्शन पंपाव्दारे विद्राव्य खतांचा वापर करता येतो.

व्हेंचुरी

हे पाण्याचा दाबामधील फरकावर चालणारे साधन आहे. व्हेंचुरीद्वारे विद्राव्य खते पाण्याच्या प्रवाहाबरोबर झाडांच्या मुळांच्या कक्षेत दिली जातात. व्हेंच्युरीच्या शोषणाचा दर १२० ते १५०० लिटर प्रती तास असतो. मुख्य वाहिनीवरील व्हॉल्व्हद्वारे कमी जास्त करता येतो. व्हेंचुरी १.०, १.५, २.०, २.५ इंच आकारामध्ये उपलब्ध आहेत.

फर्टिलायझर टँक

ही एक स्टीलची टाकी किंवा एचडीपीई प्लॅस्टिकची असून मुख्य जलवाहिनीस इनलेट व आऊटलेट जोडलेले असते. खतांचे प्रमाण सिंचनाबरोबरच पिकांना दिले जाते. टँक ३०, ६०, ९०, १२०, १६० लिटरमध्ये उपलब्ध आहेत.

फर्टिगेशन करताना घ्यावयाची काळजी

विद्राव्य खते ही ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची असल्यामुळे ठिबक सिंचन काळजीपूर्वक देखभाल करणे हे महत्त्वाचे ठरते.

सर्वप्रथम ठिबक सिंचन संचातील फिल्टर्स (सँड फिल्टर, स्क्रीन फिल्टर) मेन लाइन, सबमेन लाइन, लॅटरल, फिटिंग्ज, व्हॉल्व्ह व फ्लश व्हॉल्व्ह इत्यादी ठिकाणाहून होणारी गळती पूर्णपणे बंद कराव्यात.

ऑनलाइन ड्रीपर्स वापर करीत असल्यास शेतातील सर्व ड्रीपर्समध्ये चकत्या आहेत किंवा नाही हे तपासून घ्यावे. जर चकत्या नसतील तर योग्य चकत्या टाकून ड्रीपर्स पूर्ववत करून घ्यावे. जर ड्रीपर्स जवळ गळती असेल तर ते सुद्धा बंद करावे.

पिकांसाठी इनलाइन किंवा ऑनलाइन ठिबकमधून सर्व ठिकाणी सारखे पाणी मिळते की नाही ते बघावे.

फिल्टर जवळ १.५ ते २ कि.चौ.सेंमी. आणि सबमेनच्या शेवटी १.०० कि/ चौ. सेंमी दाब असावा. तसेच ड्रीपर्सचे झाडापासून अंतर योग्य आहे किंवा नाही ते वारंवार निरीक्षण करीत राहावे.

खते आणि पाणी पांढऱ्या मुळांच्या क्षेत्रातच द्यावे. साधारणत: जमीन ही रोज वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी झाडांना दिले पाहिजे.

विद्राव्य खतांचा वापर एकूण सिंचनाच्या कालावधीच्या मधल्या कालावधीत करावयाचा असतो. समजा, आपण १२० मिनिटे ठिबक सिंचन संच चालवीत असल्यास ८० मिनिटे ठिबक सिंचन संचाव्दारे फक्त पाणी द्यावे. नंतर ३० मिनिटे विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. त्यानंतर ५ ते १० मिनिटे पुन्हा पाणी द्यावे. शेवटी पाणी एवढ्यासाठी द्यावे की जेणेकरून ठिबक सिंचन संचात खते साचून न राहता खतांची संपूर्ण मात्रा झाडांच्या मुळापर्यंत पोहोचेल.

ठिबकमधून पाण्यासोबत खते सोडल्यानंतर खूप जास्त वेळ ठिबकने पाणी देऊ नये. अन्यथा दिलेली खते पाण्यासोबत झिरपून जातील.

ठिबक सिंचनासोबत रासायनिक खतांचा वापर करताना ती पाण्यात संपूर्णपणे विरघळणारी असावीत. सर्व प्रथम द्यावयाची खते पाण्यात संपूर्णपणे विरघळून द्यावी. खते फर्टिलायझर टँकमध्ये टाकू नयेत.

खताच्या मात्रेमध्ये युरिया, १९:१९:१९, १२:६१:०, १३:०:४५, ०:०:५० वापरायचे असल्यास प्रथम १२:६१:०, ०:०:५०, १३:०:४५ पाण्यात संपूर्णपणे विरघळल्यानंतर १९:१९:१९ आणि शेवटी युरिया पाण्यात विरघळून घ्यावा. सर्वांत प्रथम युरिया विरघळल्यास पाणी थंड होते आणि नंतर टाकलेली खते पाण्यात विरघळल्यास वेळ लागतो.

स्फुरदयुक्त खते उदा. १२:६१:०, ०:५२:३४ सोबत कॅल्शिअम नायट्रेट विरघळू नये, कारण तसे केल्यास साका तयार होतो. कॅल्शिअम नायट्रेट सोबत ०:०:५० पाण्यात एकत्र विरघळू नये.

पोटॅश वापरताना फक्त पांढरा पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळतो. लाल पोटॅश पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही. म्हणून फक्त पांढरा पोटॅश वापरावे.

रासायनिक खतांची पाण्यात विरघळण्याचे प्रमाण पाण्याच्या तापमानावर अवलंबून असते. पाणी जास्त थंड असल्यास खते कमी विरघळतात. फर्टिगेशन (ठिबक सिंचनमधून खते) नेहमी दुपारी/सायंकाळी करावे, पाणी कोमट असल्यास खते चांगली विरघळतात. जमिनीत तापमान योग्य असल्याने अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होते.

फवारणी करताना

पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची उणीव आहे, अशाच विद्राव्य खतांची निवड करून त्याची फवारणी करावी. उत्तम वाढीसाठी १९:१९:१९ विद्राव्य खताची फवारणी करावी.

फुले भरपूर येण्याकरिता १३:४०:१३ ची फवारणी करावी, फळांची, बोंडांची चांगली वाढ होण्यासाठी ०:५२:३४ ची फवारणी करावी.

फळे, बोंडे परिपक्व होताना १३:०:४५ ची फवारणी करावी.

ठिबक सिंचनासोबत वापरण्यात येणारी खते

खालील सर्व खते पाण्यात संपूर्णपणे विरघळणारी आहेत. यातील अन्नद्रव्ये सहज व त्वरित उपलब्ध होतात. यांचा ठिबक सिंचन पद्धतीमधून सहज वापर करता येतो.

०:५२:३४ मोनो पोटॅशिअम फॉस्फेट

१७:४४:०० युरिया फॉस्फेट

१३:००:४५ पोटॅशिअम नायट्रेट

१२:६१:०० मोनो अमोनिअम फॉस्फेट

१९:१९:१९ सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त

१३:४०:१३ सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त

१६:०८:२४ सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त

०:०:५० सल्फेट ऑफ पोटॅश

४६:०:० युरिया

२०:०:० अमोनिअम सल्फेट

०:०:६० म्युरेट ऑफ पोटॅश

०:५२:० फॉस्फोरिक अॅसिड

डॉ. बी. डी. जडे, ९४२२७७४९८१

(वरिष्ठ कृषिविद्या शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT