Drip Irrigation Method : जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती

Article by Arun Deshmukh : ऊस पिकासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन (सबसरफेस ड्रीप) अतिशय योग्य आहे. या पद्धतीमध्ये पाणी आणि खते थेट पिकाच्या मुळाजवळ दिली जातात, वाढ जोमदार होते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
Drip Irrigation in Agriculture
Drip Irrigation in AgricultureAgrowon

अरुण देशमुख

Agriculture Irrigation : ऊस पिकासाठी जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन (सबसरफेस ड्रीप) अतिशय योग्य आहे. या पद्धतीमध्ये पाणी आणि खते थेट पिकाच्या मुळाजवळ दिली जातात, वाढ जोमदार होते, पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.

वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये पाणी व खताच्या कार्यक्षम वापरामुळे उत्पादन आणि साखर उताऱ्यात भरीव वाढ होते.

चांगले व्यवस्थापन केल्यास उसाचे एक लागण पीक व कमीत कमी चार खोडवा पिके अतिशय उत्तमरीत्या घेता येतात. यामुळे उत्पादन खर्च कमी होतो, निव्वळ नफ्यामध्ये वाढ होते.

जास्त पाणी वापर कार्यक्षमता मिळते. बाष्पीभवनामुळे, वाहून जाण्यामुळे तसेच जमिनीत खोलवर पाण्याचा निचरा होणे थांबल्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उत्पादनवाढीसाठी अतिशय चांगला उपयोग होतो.

पाणी व अन्नद्रव्ये थेट मुळाजवळ दिली जातात, त्यामुळे वाढ चांगली होते. उसावरील इतर ताण कमी होतो. सरी- वरंबा पद्धतीशी तुलना करता पाण्यामध्ये ५० ते ५५ टक्के बचत होते. पृष्ठभागावरील ठिबक सिंचनाच्या तुलनेत १० ते १५ टक्के बचत होते. उत्पादनात कमीत कमी ३५ टक्के वाढ होते.

Drip Irrigation in Agriculture
Drip Irrigation : ठिबकची जागतिक बाजारपेठ ४८ हजार कोटींच्या पुढे जाणार

जास्तीचे पाणी उसात साचत नसल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

रासायनिक खते थेट मुळांभोवती मिळत असल्याने कार्यक्षमता वाढते. खतमात्रेत ३० टक्के बचत होते.

जमिनीच्या पृष्ठभागावरील भाग कोरडा राहत असल्याने तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. आंतरमशागत आणि तोडणीची कामे वेळेवर करणे सोपे जाते.

या पद्धतीत इनलाइन ठिबक नळ्या आणि ड्रीपर मजबूत पॉलिमरपासून बनविलेल्या असतात. त्या जमिनीखाली असल्याने सूर्याची अतिनील किरणे, वातावरणातील चढ-उतार आणि जमिनीतील इतर उपद्रवी घटकांपासून सुरक्षित राहतात. देखभालीचा खर्च कमी होतो.

या पद्धतीत ड्रीपर बंद होत नाहीत तसेच शेत चढ-उताराचे असेल तरी सर्व ठिकाणी सम प्रमाणात पाणी देणे शक्य होते. त्यामुळे उसाची वाढ एकसारखी होते.

यंत्रणा जमिनीखाली असल्याने हाताळणी कमी होते. त्यामुळे या पद्धतीचे आयुर्मानही जास्त असते.

योग्य व्यवस्थापन केल्यास जास्तीत जास्त खोडवे फायदेशीररीत्या घेणे शक्य होते.

यंत्रणा जमिनीखाली असल्याने लागण, आंतरमशागत व ऊस तोडणी यांत्रिक पद्धतीने करणे शक्य होते.

Drip Irrigation in Agriculture
Drip Irrigation : ठिबक सिंचन संचासाठी आम्ल प्रक्रिया

देखभाल

महिन्यातून एकदा न चुकता ड्रीपलाइन फ्लश कराव्यात. यामुळे त्यात साठलेली घाण निघून जाईल. ड्रीपलाइन फ्लश करण्याअगोदर सबमेन फ्लश करून घ्याव्यात.

पाणी परीक्षण अहवालानुसार आम्ल प्रक्रिया करावी.

योग्य ड्रीपलाइनची निवड

पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन वापरताना ऊस लागण जोड ओळ पद्धतीने केली जाते. दोन नळ्यांतील अंतर १.८० मीटर आणि दोन उसाच्या ओळीतील अंतर ४० ते ५० सेंमी ठेवले जाते.

चढ-उताराच्या जमिनीत दाबनियंत्रित तोट्या असलेली ड्रीपलाइन वापरावी.

एकदम सपाट जमिनीमध्ये १६ मिमी. व्यास आणि ०.८ मिमी किंवा ०.५ मिमी जाडी असलेली ड्रीपलाईइन वापरावी.

जमिनीच्या प्रकारानुसार ड्रीपरमधील अंतर व त्याचा प्रवाह बदलतो. त्याबद्दलची शिफारस ः

जमिनीचा प्रकार ड्रीपरमधील अंतर (सेंमी.) ड्रीपरचा प्रवाह (लिटर / तास)

खोल काळी जमीन ५० १ किंवा १.६ किंवा २

मध्यम खोलीची जमीन ४० १.६ किंवा २

उथळ जमीन ३० १

अरुण देशमुख, ९५४५४५६९०२

(उपसरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com