Use of Nutrients : पिकास एकूण १७ अन्नद्रव्यांची गरज असते. या सर्व अन्नद्रव्यांचे संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. निरनिराळ्या अन्नद्रव्यांचा जमिनीतून होणारा पुरवठा व त्यांचे प्रमाण हे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच इतर घटकांचा शोषणावर काय परिणाम होतो, हे पाहणे ही महत्त्वाचे असते. शोषणाचा वेग,
मुळांनी अन्नद्रव्य शोषण केल्यावर मुळाकडून पानापर्यंत होणारी अन्नद्रव्याची गतिमानता आणि गरज असलेल्या भागात पोहोचल्यावर तेथे होणारे कार्य या सगळ्या गोष्टी अन्नद्रव्ये शोषणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. प्रत्येक क्रियांवर अन्नद्रव्यांचा एकमेकांतील परस्परक्रियांचा परिणाम होत असतो. या परस्परक्रिया निरनिराळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जशा होतात, तशाच त्या मुख्य अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्यातही होतात. या प्रक्रिया जमिनीत होतात, तशाच पिकातही होतात.
अन्नद्रव्यातील परस्परक्रिया याचा स्थूलमानाने अर्थ होतो, की पिकांच्या अन्नद्रव्य शोषणाच्या दृष्टीने एका अन्नद्रव्याचा दुसऱ्या अन्नद्रव्यांवर होणारा अनुकूल किंवा अनिष्ट परिणाम. दुसरा अर्थ असा की, एका अन्नद्रव्याबरोबर दुसरे अन्नद्रव्ये निरनिराळ्या प्रमाणात एकाच वेळी वापरले असतात, पिकांकडून मिळणारा भिन्न-भिन्न प्रतिसाद.
दोन अन्नद्रव्ये अशा तऱ्हेने एकाच वेळी वापरली असता पिकाकडून मिळणारा प्रतिसाद वाढू शकतो किंवा त्यात खूप घट येऊ शकते. उदा. जस्त व स्फुरद अन्नद्रव्याचा एकेरी वापर केला असता जो प्रतिसाद मिळतो त्याची बेरीज ही जस्त व स्फुरद अन्नद्रव्य एकाच वेळी विशिष्ट प्रमाणात मिसळून दिली असता मिळणाऱ्या एकूण प्रतिसादापेक्षा कमी असण्याची शक्यताही खूप असते.
जस्त आणि लोह
जमिनीत जस्ताची मात्रा कितीही असली किंवा जास्त अन्नद्रव्ये वरुन दिली तर लोहांचे प्रमाण वाढते. मात्रेबरोबर जस्ताची जमिनीत उपलब्धता कमी होत जाते.
पाणथळ जमिनीतील लोहाचे फेरिकमधून फेरस स्वरुपातील रुपांतरामुळे लोहाचा जस्तावरील परिणाम जास्त तीव्र होऊन जस्ताची कमतरता वाढते.
जमिनीत होणाऱ्या लोह आणि जस्त यातील विरोधी आंतरप्रक्रियेप्रमाणे पिकामध्ये त्याचे परिणाम दिसून येतात.
लोहाची मात्रा वाढवून दिल्याने पिकातील जस्ताचे शोषण कमी होते. अन्नद्रव्यांची जमिनीतून होणारी उपलब्धता कमी झाली.
जस्त, लोह आणि स्फुरद
जस्त आणि स्फुरद, जस्त आणि लोह तसेच लोह आणि स्फुरद या जोडीने होणाऱ्या अन्नद्रव्यांतील परस्पपरक्रियांमुळे जस्त, लोह आणि स्फुरद या तीनही अन्नद्रव्यांची जमिनीतील उपलब्धता जशी कमी होते तसेच पिकाकडून होणारे, त्यांचे शोषणही खूप कमी होते.
जस्ताचा लोह अन्नद्रव्यांतील, शोषणावरील अनिष्ट परिणाम स्फुरदाच्या अनुपस्थितीत आणखी तीव्र होतो.
जस्त आणि स्फुरद
जस्त व स्फुरद यांच्यात जमिनीत होणाऱ्या परस्परक्रियेमुळे दोन्ही अन्नद्रव्यांची जमिनीत होणारी उपलब्धता कमी होते.
मुळांमधून पानांकडे जाण्याची जस्त अन्नद्रव्यांची गतिशीलता खूप कमी होते.
पिकाचा स्फुरदाला मिळणारा वाढीतील प्रतिसाद वाढण्यास पिकाची पाने आणि वरचा कोवळा भाग यातील जस्ताचे प्रमाण कमी झाले, असे जाणवते.
वनस्पतीतील स्फुरदाचे प्रमाण फार वाढल्याने ज्या शरीरविज्ञान प्रक्रियांसाठी वनस्पतीकडून जस्ताचे शोषण होते, त्या जैवरासयनिक प्रक्रिया थंडावतात, त्यामुळे वनस्पतीची वाढ खुंटते. हे सर्व परिणाम स्फुरदामुळे घडतात.
ज्या जमिनीत जस्ताची उपलब्धता भरपूर आहे, तेथे स्फुरद खताची मात्रा जादा प्रमाणात दिली तर त्याठिकाणी पिकांच्या दृष्टीने जस्ताची कमतरता तीव्रपणे जाणवते. या उलट जस्त अन्नद्रव्य वाढत्या मात्रेमध्ये जमिनीस दिल्यास त्या प्रमाणात स्फुरदाची उपलब्धता कमी होत नाही. जस्त आणि स्फुरद यातील विरोधी संबंधामुळे पिकाचे उत्पादन घटण्याचा धोका असतो.
जस्त आणि तांबे
जमिनीला तांबे अन्नद्रव्य खतरुपाने दिले असता, जमिनीतील जस्त अन्नद्रव्यांची उपलब्धता बरीच कमी होते. मात्र जस्त अन्नद्रव्य वाढीव मात्रेने जमिनीत दिल्यास तांबे, जस्त अन्नद्रव्यातील परस्परक्रिया सौम्य स्वरूपाची होते. त्यामुळे पिकाला काही प्रमाणात जस्त अन्नद्रव्य मिळत राहते.
जस्ताची मात्रा वाढीव स्वरूपात दिली तर तांबे अन्नद्रव्याचा जमिनीतील उपलब्धतेवर गंभीर स्वरूपाचा अनिष्ट परिणाम होत नाही.
ताम्र आणि स्फुरद
स्फुरदाच्या वापरामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत जाते.
ताम्राच्या वाढीव मात्रेमुळे स्फुरदाची उपलब्धता काही थोड्या प्रमाणात कमी होते.
मंगल आणि स्फुरद
सर्वसाधारणपणे स्फुरदाच्या वापरामुळे मंगलाचे शोषण वाढले जाते.
चुनखडीचे प्रमाण वाढल्यास मंगलाच्या प्रत्यक्ष शोषणात घट वाढत जाते. परंतु स्फुरदाच्या वापराने मंगलाच्या शोषणात सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
लोह आणि स्फुरद
जमिनीतील लोह अन्नद्रव्याची उपलब्धता बऱ्याच मोठ्या प्रमाणात जमिनीतील उपलब्ध स्वरुपातील स्फुरदाच्या पातळीवर अवलंबून असते. शेवटी स्फुरदाची पातळी जास्त, त्या प्रमाणात लोह अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होत जाते.
ज्यावेळी जमिनीत लोह आणि स्फुरदाची एकाच वेळी कमतरता असते, त्यावेळी दिलेल्या लोह, स्फुरदामुळे वरील परिणाम दिसेलच असे सांगता येत नाही.
लोह आणि मंगल
सर्वसाधरणपणे मंगल अन्नद्रव्याच्या वाढीव मात्रेबरोबर लोहाचे शोषण कमी होत जाते. प्रत्यक्षात दिसणारा परिणाम हा लोह व मंगल यांच्या उपलब्धतेतील प्रमाणाचे गुणाकावर अवलंबून असतो.
हा गुणक १:५ असताना दोन्ही अन्नद्रव्यांचे शोषण सरळपणे होण्याची शक्यता असते. गुणक वाढला की, मंगलाची कमतरता जाणवते. गुणक कमी झाला तर लोहाची कमतरता जाणवते.
लोह आणि गंधक
गंधकाच्या वापरामुळे सर्व साधारणपणे जमिनीतील लोहाची उपलब्धता वाढते. लोह दिल्यामुळे होणाऱ्या वाढीपेक्षा गंधक दिल्याने होणारी वाढ जास्त असते.
लोह,गंधक ही दोन्ही अन्नद्रव्ये एकाच वेळी जमिनीस दिली तर लोहाची उपलब्धता १०० टक्के वाढू शकते.
ज्या जमिनीत लोहाची कमतरता आहे तेथे नुसते गंधक दिल्यानेसुद्धा लोहाच्या उपलब्धतेमध्ये भरपूर वाढ होते. लोहाची उपलब्धता जमिनीत जसजशी वाढते, त्याप्रमाणे पिकाकडून लोहाचे शोषण वाढते. लोह आणि गंधकाचा एकमेकांवरील परस्पर क्रियाचा परिणाम दिसून येतो.
डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६ (सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.