Food Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Food Processing : नोकरीतील अनुभवातून घडविली प्रक्रिया उद्योजकता

Food Processing Industry : सातारा जिल्ह्यातील वाई येथील रवींद्र धनावडे यांनी प्रक्रिया उद्योगातील कंपनीत दीर्घ नोकरी केली. त्या अनुभवातून स्वतःचाच उद्योग सुरू करण्याची दिशा मिळाली.

विकास जाधव 

विकास जाधव

Sauce Making : सातारा जिल्ह्यातील वाई येथील रवींद्र धनावडे यांनी प्रक्रिया उद्योगातील कंपनीत दीर्घ नोकरी केली. त्या अनुभवातून स्वतःचाच उद्योग सुरू करण्याची दिशा मिळाली. बाजारपेठेतील मागणी व संधी ओळखून विविध मसाले व सॉसेसची निर्मिती सुरू केली. त्यास आश्‍वासक बाजारपेठ दिली. आज नोकरदार ते प्रक्रिया उद्योजक होण्यापर्यंत मजल मारल्याचे समाधान त्यांनी मिळवले आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई हा हळद निर्मितीसाठी प्रसिद्ध तालुका आहे. तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी हे पीक घेतात. तालुक्यात नागेवाडी हे छोटे गाव आहेत. येथे छोटा धरण प्रकल्प उभारल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यात गेल्या. यापैकी रवींद्र धनावडे हे शेतकरी आहेत. त्यांच्या तीन एकरांपैकी दोन एकर क्षेत्र धरणात गेले. त्यामुळे एक एकर जमीन त्यांच्यासाठी शिल्लक राहिली.

रवींद्र व सुनीता या धनावडे दांपत्याचे रसायनशास्त्र विषयातील ‘बी.एस्सी.’पर्यंत शिक्षण झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र यांनी पुणे येथे अन्न प्रक्रिया करणाऱ्या खासगी कंपनीत नोकरी पत्करली. विविध कंपन्यांत २० वर्षे अनुभव घेतल्यानंतर या उद्योगातील चांगले ज्ञान व तंत्रज्ञान त्यांना अवगत झाले.

पत्नी सुनीतादेखील आधीपासून प्रक्रिया उद्योगात कार्यरत होत्या. दरम्यानच्या काळात वाई येथे जमीन घेऊन ठेवली होती. अखेर नोकरी करण्यापेक्षा आपलाच स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू करावा असे रवींद्र यांना वाटू लागले. त्यादृष्टीने त्यांनी पावलेदेखील टाकली.

व्यवसायाचा श्रीगणेशा

सन २०१७ च्या दरम्यान नोकरी सोडून वाई येथील जागेत एक हजार चौरस फूट जागेत शेड उभे केले. मिक्सर, ग्राइंडर, पल्पर आदींची खरेदी केली. प्रथम ‘रेडी टू कुक मिसळ, मांसाहारी बिर्याणी, मालवणी आदी प्रकारचे मसाले बनविण्यास सुरुवात केली.

एका खासगी कंपनीस केवळ उत्पादने तयार करून देणे एवढेच स्वरूप होते. दोन- तीन वर्षे या पद्धतीने व्यवसाय सुरू ठेवला. त्यानंतर मग स्वतःची उत्पादने, पॅकिंग, ब्रॅण्डिंग याकडे लक्ष देण्याचे ठरविले. सन २०२० मध्ये ‘माम’ व ‘टेस्ट सिक्रेट’ हे ब्रॅण्ड नोंदणीकृत केले.

रवींद्र सांगतात की बाजारपेठेतील मागणी, संधी, आपली आर्थिक क्षमता, भांडवल, मनुष्यबळ आदी गोष्टी लक्षात घेऊन मसाले व सॉसेस निर्मितीत उतरण्याचे नक्की केले. व्यवसाय नियमित सुरू होऊन विस्तार होऊ लागला. मग जागा कमी पडू लागली. त्यामुळे पूर्वीच्या शेडला लागून पाचशे चौरस फूट शेड वाढवले. सध्या पंधराशे चौरस फूट जागेत विविध उत्पादने तयार केली जातात.

उद्योगातील ठळक बाबी
-सुमारे १५ प्रकारच्या ‘रेडी टू कुक मसाल्यांची निर्मिती. त्यामध्ये मांसाहारी पदार्थांसाठी दहा व पाच शाकाहारी पदार्थांसाठीच्या मसाल्यांचा समावेश.
-सुमारे पाच प्रकारचे सॉसेस. यात टोमॅटो, सोया, हिरवी व लाल मिरची व इमली सॅास यांचा समावेश.


-उन्हाळ्यात कोकम, आवळा, कैरी पन्हे आदी सरबतांची निर्मिती सुरू केली.
-व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल उदा. टोमॅटो, मिरची आदी पदार्थ बाजार समितीतील दरांनुसार शेतकऱ्यांकडून घेतले जातात. त्यासाठी १५ शेतकरी निश्‍चित केले आहेत.
-सातारा जिल्हा व बारामती मिळून सुमारे पाच ते सह वितरक नेमले आहेत. मुंबई, पुणे येथेही मागणीनुसार पुरवठा केला जातो.
- लॅमिनेटेड पाऊच, एचडीपीई प्लॅस्टिक तसेच पेट यातून पॅकिंग केले
जाते.

-ग्राहकांची गरज लक्षात घेऊन मसाल्याचे ७० ग्रॅम, १०० ग्रॅम, १२५ ग्रॅम व एक किलो
तर सॅासचे २०० ग्रॅम, ७०० ग्रॅम, एक किलो व पाच किलो पॅकिंग केले जाते.
-उत्पादनांसाठी अन्न सुरक्षितता विषयक केंद्र सरकारच्या ‘एफएसएसएआय’ संस्थेचा परवाना घेतला आहे.


- सुमारे पाच जणांना कायमस्वरूपी रोजगार व आवश्यक प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे
उत्पादन प्रक्रिया सुरळीत पार पडणे व गुणवत्ता राखणे सोपे होते.
-कच्चा माल खरेदी व विक्री व्यवस्थेची जबाबदारी रवींद्र तर उत्पादन निर्मिती, पॅकिंग आदी जबाबदाऱ्या सुनीता सांभाळतात.

‘प्रमोशन’ व उलाढाल

उत्पादनांचे ‘प्रमोशन’ करण्यासाठी सुरुवातीला धनावडे दांपत्याने विविध प्रदर्शनांमधून आपल्या उत्पादनांचे ‘प्रमोशन’ केले. त्यातून वितरक त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास मदत झाली. गेल्या पाच वर्षांच्याकाळात निर्मिती व उलाढालीचा आलेख वाढू लागला आहे. सन २०२० मध्ये प्रति महा दोन टन, २०२१ मध्ये तीन टन, २०२२ मध्ये चार टन तर २०२३ मध्ये हेच उत्पादन सात टनांपर्यंत पोहोचले आहे.


कच्चा माल, मजुरी, वीज बिल, पॅकिंग, वाहतूक, विक्री व अन्य खर्चाची रक्कम वगळता १५ ते २० टक्के रक्कम शिल्लक राहते. येत्या काळात अजून विस्तार करण्यात येणार आहे. प्रक्रिया यंत्रे, पॅकिंग, कच्चा माल ठेवण्यासाठी तसेच छोटे कार्यालय असे विभाग तयार केले आहेत. सुरुवातीला प्रकल्प उद्योगासाठी पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक कली होती. आता ती ५० ते ७० लाखांपर्यंत पोहोचली
आहे. यंत्रसामग्रीस कृषी विभागाच्या माध्यमातून पावणेतीन लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

अनुभव ठरला मोलाचा

रवींद्र यांना प्रक्रिया उद्योगात नोकरी केलेल्या कामाचा अनुभव अत्यंत उपयुक्त ठरला आहे.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे येथे या विषयातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासदौराही
आयोजित करण्यात आला होता. रवींद्र सांगतात की उद्योग सुरू केल्यानंतर पहिली तीन वर्षे
संघर्षाची होती. नोकरीच बरी असे वाटायचे. पण आता या क्षेत्रात स्थिरता आली आहे.


नोकरीत केवळ आपल्याला नेमून दिलेल्या कामापुरताच आवाका होता. स्वतः उद्योजक झाल्याने
उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, विपणन अशा विविध आघाड्यांचा आवाका आला आहे. या उद्योगाने आयुष्य समाधानी केले आहे.

रवींद्र धनावडे, ९४२२४००८६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT