Electricity Safety Measures : विद्युत धक्का आणि आगीपासून सुरक्षितता महत्त्वाची...

Electric Shock : घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी असते. कृषी क्षेत्रामध्ये देखील वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. काही वेळा दुर्लक्ष झाल्याने शॉर्ट सर्किटने आग लागून जीवित व वित्तहानी होते. हे लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची ठरते.
Electricity
Electricity Agrowon
Published on
Updated on

ममता पटवर्धन
Electricity : घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस विजेची वाढती मागणी असते. कृषी क्षेत्रामध्ये देखील वीज मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. काही वेळा दुर्लक्ष झाल्याने शॉर्ट सर्किटने आग लागून जीवित व वित्तहानी होते. हे लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाची ठरते.

कमी विद्युत दाबावरील विद्युत प्रणालीसाठी विजेचा धक्का आणि आग यापासून काय खबरदारी घ्यावी याबाबत भारतीय मानांकित विद्युत वायरिंग कोड IS ७३२: २०१९ अर्थिंग कोड IS ३०४३:२०१८ अभ्यासणे आवश्यक ठरते. हे कोड आंतरदेशीय विद्युत कमिशनवर आधारित असून, सर्वच देशांना बंधनकारक आहेत.

भारतीय मानांकनानुसार महत्त्वाची माहिती ः
१) विद्युत यंत्रणा पेट घेऊन लागणाऱ्या आगीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अयोग्य पद्धतीचे ब्रेकर. यामुळे केबलला योग्य सुरक्षा मिळत नाही. कोणत्याही प्रकारची विद्युत यंत्रणा बसविताना जाणकार तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते. हे न केल्याने वरचेवर शॉर्टसर्किटने लागलेल्या मोठ्या आगीमुळे जीवित आणि वित्तहानी होते.
२) विजेचा धक्का टाळण्यासाठी ३० मिलि ॲम्पिअरच्या अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरचा वापर करावा. जास्तीचा विद्युत प्रवाह नियंत्रित करण्यासाठी मिनिएचर सर्किट ब्रेकर वापरावेत. यांचे एकत्रित युनिट म्हणजे रेसिड्युएल करंट सर्किट ब्रेकर ओव्हर करंट. मुख्यत्वे युरोपीय देशांमध्ये हे वापरले जाते. यामुळे जी सुरक्षितता मिळते याचा विचार करता खर्च तुलनात्मकदृष्ट्या खूप कमी असतो.

Electricity
Electrical Accident : पावसाळ्यातील विद्युत अपघाताचे धोके टाळा...

३) ज्या ठिकाणी पेट घेणाऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात अशा सर्व ठिकाणी अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवावेत. नियमानुसार आर्क फॉल्ट डिटेक्शन उपकरण बसवून गगनचुंबी इमारतीमध्ये विद्युत सुरक्षा मिळवता येते तसेच अर्थ फॉल्टमुळे लागणाऱ्या आगीवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
४) शक्यतो अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर किंवा रेसिड्युएल करंट सर्किट ब्रेकर ओव्हर करंट वापरावेत. यामुळे विजेमुळे होणारे अपघात टाळता येतात.

Electricity
उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपला धक्का

विद्युत अपघात होऊ नयेत यासाठी काळजी ः
१) विद्युत अर्थिंग किंवा भूसंपर्कन म्हणजे कोणत्याही विद्युत उपकरणाचा बाहयभाग हा पृथ्वीला कमी रोधाच्या तारेने जोडणे. यामुळे सर्व विद्युत उपकरणांचे बाहयभाग हे पृथ्वीचा शून्य विद्युतदाबाशी जोडले जातात. जर चुकून काही वीज गळती होत असली तरीही अशा उपकरणाच्या संपर्कात येऊनही व्यक्तीस धक्का लागण्यापासून संरक्षण मिळते. भारतीय विद्युत नियमानुसार विद्युत अर्थिंग करणे सक्तीचे आहे.
२) जेव्हा विद्युत तारांवरील विद्युतविरोधी आवरण काही कारणाने खराब होते, तुटते तेव्हा जास्त विद्युतधारा खेचली गेल्याने तार गरम होते. ती तार प्रमाणाबाहेर गरम होत राहणे धोक्याचे ठरते. जेव्हा तारेचे तपमान विद्युतरोधी पदार्थाच्या वलनांकाहून वाढते तेव्हा सर्व विद्युत तार संरचना पेटण्याची शक्यता तयार होतो. तसेच अशा रीतीने उघड्या संरचना तारेला स्पर्श झाला, तर विद्युत धक्का बसू शकतो. विद्युत धक्क्याची तीव्रता ही वीज प्रवाह घनता, वीजप्रवाह वारंवारता आणि वीजप्रवाह शरीरातून कसा वाहतो तो मार्ग यावर अवलंबून असते.

१) वीज प्रवाह घनता ः
- वीज प्रवाह १ मिलि ॲम्पिअर पेक्षा कमी ः धक्का जाणवत नाही.
- वीजप्रवाह १ ते ८ मिलि अॅम्पिअर ः धक्का फारसा दु:खदायक नसतो.
- वीजप्रवाह ८ ते १५ मिलि ॲम्पिअर ः दु:ख / वेदनादायी, स्नायूला दुखापत
- वीजप्रवाह २० ते ५० मिलि ॲम्पिअर ः हात, पाय, छातीमधून गेल्यास श्‍वसनास त्रास
-वीजप्रवाह १०० ते २०० मिलि ॲम्पिअर ः हृदयमार्गाला दुखापत होऊन मृत्यू, इतरत्र धक्का जाणवल्यास कृत्रिम श्‍वसनाने बरा होऊ शकतो.

आपल्या शरीराचा विद्युतरोध शरीर ओले/कोरडे असण्यावर अवलंबून असतो. कोरडे शरीराचा विद्युतरोध ७०,००० -१,००,०००० ओहम/सेंमी वर्ग असतो. त्वचा व आतील भागानुसार बदलणारा असतो (त्वचा-जास्त, आत-कमी), तेच जर ओले शरीर असेल तर विद्युतरोध ७०० ते १००० ओहम/सेंमी वर्ग इतका असतो. विद्युतदाब किती आहे, त्यानुसार विद्युत धक्क्याची तीव्रता बदलते. म्हणजेच कोरडे शरीर आणि १०० कि.व्होल्ट विद्युतदाब हा ओले शरीर असताना १०० व्होल्ट विद्युतदाबाइतकाच घातक ठरू शकतो. विद्युतप्रवाह घनता, विद्युतदाब, शरीराचा ओलेपणा, कोरडेपणा या गोष्टी खूप महत्त्वाचा ठरतात.

२) विद्युतप्रवाहाची वारंवारता जेवढी कमी तेवढा धक्का मोठा बसतो. म्हणून डी.सी. एकलमार्ग प्रवाहाने जास्त हानी संभवते.

३) विजेची गळती होताना धक्का बसल्यास आपल्या शरीरातील कोणत्या भागातून वीज प्रवाह वाहतो हे तितकेच महत्त्वाचे आहे. जर छाती, हृदयमार्ग वगळून धक्का बसला तर संसर्गित व्यक्तीच्या जीवितास हानी संभवत नाही. धक्क्याच्या स्वरूपानुसार मोठ्या/लहान प्रमाणात भाजू शकते. बऱ्याचदा फारच क्षणिक संपर्काने जो धक्का बसतो, त्यामुळे जरी श्‍वास तात्पुरता बंद झाला तरी व्यक्ती थोड्याच काळाने भानावर येऊ शकतो.

विद्युत उपकरणे हाताळताना काळजी घ्या ः
१) विद्युत धक्का बसलेल्या माणसाला जर सोडविताना नीट काळजी घेतली नाही, तर वाचविण्याऱ्या माणसाला देखील धक्का बसू शकतो.
२) साधारणपणे विद्युत धक्का लागल्यावरच मनुष्य आणि तार हे दोन्ही विलग होऊन जातात. पण काही स्पष्ट कारणांमुळे जसे धक्का खूप मोठ्या प्रमाणात असेल किंवा मनुष्य तारेशी जास्तच निगडित असेल, तर विद्युत जिवंत तार मनुष्यास चिकटूनच बसते. ही तार लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संकटग्रस्त व्यक्तीस कदापिही हाताने धरू नये. जिवंत तार कोठे व कशी आहे ते पाहून शक्य असल्यास लाकडाने दूर करण्याचा प्रयत्न करावा. मुख्य प्रवाह कळ यंत्रणा बंद करणे शक्य असल्यास ती यंत्रणा बंद करावी. अशक्य असेल तर विद्युतरोधी पदार्थ म्हणजे खूप शुष्क वर्तमानपत्रे / कपडे, रबरी हातमोजे घेऊन माणसास ओढावे.

३) विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीस हात किंवा पाय धरून ओढावे. त्या माणसास आपल्या गळ्यात/ अंगावर पडू देऊ नये. त्यास हिंमत राखण्यास सांगावे. स्वत: घाबरून जाऊ नये. दुसरे कोणी तिथे हजर असेल तर त्याला डॉक्टरांकडे पाठवावे.
४) विद्युत धक्का बसल्यामुळे स्नायू शक्तिहीन होतात. अवयव पंगू बनू शकतात. धक्क्यामुळे हृदय व फुफ्फुस निकामी व अशक्त होऊ लागतात. फुफ्फुसाची गती कमी होण्यास सुरुवात होते. धक्का खूपच मोठा असेल, तर हृदयक्रियादेखील बंद पडू शकते. केव्हा केव्हा शरीरावर वलनामुळे जखमा पण होतात. थोड्याशा विद्युत धक्क्याने श्‍वासोच्छ्वास बंद पडण्याची शक्यता तयार होते. मनुष्य बेशुद्ध होऊ शकतो. हृदय गतिशील राहते, परंतु श्‍वासोच्छ्वास बंद असतो.

५) डॉक्टर आले असल्यास त्या व्यक्तीस डॉक्टरांकडे सुपूर्त करावे. अजिबात दिरंगाई न करता कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देण्यास सुरुवात करावी. मनुष्य बेशुद्धीतून शुद्धीवर आल्यास लगेच कृत्रिम श्‍वसन बंद करू नये. अन्यथा, तो पुनश्‍च बेशुद्ध होण्याची शक्यता असते. क्वचित प्रसंगी ६ ते ७ तासांपर्यंतही कृत्रिम श्‍वसनाची मदत लागू शकते. म्हणूनच दवाखान्यात दाखल करावे.
६) विद्युत धक्का खूपच मोठ्या स्वरूपाचा असेल, तर हृदयाचे तंतू विलग होऊ शकतात, तेव्हा मृत्यू निश्‍चितपणे होतो. जर हृदय चालू असेल तर प्राथमिक उपचार पुस्तिका आणि तपशिलाप्रमाणे कृत्रिम श्‍वसन सुरू करावे. मनुष्यास पालथे झोपवून पाठीवर थोपटावे, त्यास उताणे झोपवून हाताची हालचाल करावी. त्याचे तोंड उघडून दुसऱ्या कोणीतरी आपल्या तोंडाने त्याच्या तोंडात कृत्रिम श्‍वास सोडावा. छातीवर योग्य पद्धतीने दाब द्यावा आणि सोडावा. या गोष्टी कृत्रिम श्‍वसनाच्या प्रक्रियेमध्ये मोडतात.
७) विद्युत धक्का बसलेल्या मनुष्यास हायपर स्टॅटिक न्यूमोनिया होण्याची शक्यता असते, म्हणून त्यास कमीत कमी एक दिवस तरी काटेकोर नियोजनात ठेवणे आवश्यक ठरते. भाजले असल्यास त्यावरही योग्य पद्धतीने मलम लावून ड्रेसिंग करावे. त्यावर कधीही तेल लावू नये.

विजेचा धक्का टाळण्यासाठी महत्त्वाच्या बाबी ः
१) विद्युत वाहक तारेवर काम करणे टाळावे.
२) मुख्य प्रवाह बंद करूनच काम करावे. तसे शक्य नसल्यास हात/पाय कोरडे असण्याची खात्री करावी.
३) विजेच्या धक्क्यापासून कोणालाही वाचवताना विद्युतरोधी माध्यम वापरावे.
४) उच्च विद्युतदाबाच्या यंत्रणेवर काम करताना जमीन वाहक नसण्याची खात्री करावी.
५) विद्युत तारा डोक्याला लागत असतील अशा ठिकाणी मुख्य प्रवाह बंद करूनच काम करावे.
६) कितीही दडपण आले तरी सारासार विचार करूनच कृती करावी. पुढील दुर्घटना टाळावी.
--------------------------------------------------------
संपर्क ः ममता पटवर्धन, ९४२२०८१४८७
(सहायक प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी, प्रक्षेत्र संरचना व ग्रामीण विद्युतीकरण विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी, जि. नगर)


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com