Sugarcane Harvester Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvester : ऊस तोडणी यंत्र वापरातील अडचणी अन उपाय

Sugarcane Harvesting Machine : येत्या सहा वर्षात महाराष्ट्रात सुमारे ५० ते ७५ टक्के क्षेत्रातील उसाची तोडणी यंत्राद्वारे होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

डॉ. योगेंद्र नेरकर
Sugarcane Harvesting : त्यादृष्टीने ऊस संशोधन संस्था, साखर कारखाने, शासन आणि ऊस तोडणी यंत्र विकसित करणाऱ्या कंपन्यांनी योग्य धोरण आखून ते अमलात आणणे आवश्यक झाले आहे. ऊस तोडणी यंत्राच्या वापरातील समस्यांचा आढावा घेऊन त्यांच्या निवारणासाठी रूपरेषा ठरविण्याकरिता डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशनतर्फे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ऊस तज्ज्ञ, प्रयोगशील ऊस उत्पादक, साखर कारखान्यातील अधिकारी आणि ऊस तोडणी यंत्र निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या चर्चेमध्ये नवीन ऊस जातींचा प्रसार, ऊस तोडणी यंत्रातील सुधारणांबाबत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये ऊस लागवड क्षेत्र वाढत आहे. त्यानुसार साखर कारखान्यांनी गाळप क्षमता वाढविली आहे. तथापि गेल्या काही हंगामात ऊस तोडणी मजुरांची उपलब्धता आणि समस्या तसेच मजुरांच्या टोळ्यांकडून होणारे गैरप्रकारही वाढले. वेळेवर ऊस तोडणी आणि गाळप करणे कठीण झाल्याने साहजिकच यंत्राद्वारे ऊस तोडणीचे प्रमाण वाढत आहे.

यंत्राद्वारे ऊस तोडणीचे फायदे ः
१) मोठ्या क्षेत्रातील उसाची जलद तोडणी केली जाते. यामुळे मजुरांची फारशी गरज भासत नाही.
२) जमिनीलगत ऊस तोडल्यामुळे बुडाजवळ जास्त शर्करा असलेली सर्व पेरे गाळपासाठी जातात. त्यामुळे साखरेची रिकव्हरी वाढते.
३) ऊस तोडणी करताना मजूर बुडापासून दहा ते बारा इंचावर कोयता चालवितात. त्यामुळे खालची चांगली पेरे शेतातच राहून नुकसान होते. यंत्राद्वारे सर्व उसाची जमिनीलगत एकसारखी तोडणी होत असल्याने फुटव्यांचे डोळे एकसारखे उगवतात. खोडवा पीक चांगले जोमदार वाढते.

यंत्राद्वारे तोडणीतील समस्या ः
१) आपल्याकडे बहुसंख्य शेतकऱ्यांचे क्षेत्र लहान असल्यामुळे प्रचलित ऊस तोडणी यंत्र चालविणे आणि शेतामध्ये वारंवार वळविणे जिकिरीचे होते. यंत्राचा डिझेल खर्च वाढून यंत्राद्वारे तोडणी करणे मजुरांकरवी तोडणी करण्यापेक्षा महाग ठरत आहे. अवजड यंत्राद्वारे ठिबक सिंचनाच्या नळ्या तुटतात, जमीनही कठीण होते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.
२) सध्या प्रचलित जातींचे (उदाहरणार्थ, को ८६०३२, फुले ०२६५, एम एस १०००१) ऊस पक्व झाल्यावर जमिनीवर लोळतात. त्यामुळे तोडणी यंत्र कार्यक्षमपणे चालविणे अडचणीचे ठरते. या जातींचे पाचट गळून पडत नसल्याने ते काही प्रमाणात गाळप होणाऱ्या उसाबरोबर जाते. त्यामुळे साखरेची रिकव्हरी कमी होते. बिलेटमुळे मिलमध्ये फायब्रायझेशनची समस्या येते.
३) सरी खोल करून मोठी बांधणी केली तर ऊस लोळण्याचे प्रमाण कमी होते.तसेच तोडणी करताना ठिबकच्या नळ्या खोल सरीत टाकल्या तर नळ्यांचे नुकसान होत नाही असा काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
४) यंत्र चालविण्यासाठी उसाच्या दोन सरींमधील लागवडीचे अंतर कमीत कमी साडेचार ते पाच फूट ठेवावे लागते. सध्या सर्वसाधारणपणे शेतकरी तीन फुटांचे अंतर ठेवतात. जास्त अंतर ठेवल्यास उसाचे उत्पादन कमी होईल अशी काही शेतकऱ्यांना भीती वाटते. तथापि शिफारस केलेल्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास ऊस उत्पादन वाढते. जमिनीलगतचा ऊस तोडताना यंत्राद्वारे काहीवेळा शेतातील दगड-गोटे सुद्धा येतात. त्यामुळे यंत्राची पाती लवकर खराब होतात, अशी तक्रार आहे.

यंत्राद्वारे ऊस तोडणीची सद्यःस्थिती ः
१) भारतात सध्या सुमारे ३,५०० ऊस तोडणी यंत्रे कार्यरत आहेत.त्यापैकी ११८७ महाराष्ट्रात, १२८ तमिळनाडू, १०४ मध्य प्रदेश, ४८ गुजरात आणि चार यंत्रे उत्तर प्रदेशात कार्यरत आहेत.२०२३-२०२४ या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाने ९०० ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान मंजूर केले आहे. त्यापैकी २२५
यंत्रांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या यंत्रासाठी शासन ४० टक्के अनुदान (३५ लाख रुपयांची मर्यादा) देते. त्यापैकी केंद्र शासनाचा वाटा २४ टक्के आहे.
२) बुधनी (हरियाणा) येथील हार्वेस्टर टेस्टिंग सेंटरच्या अहवालाप्रमाणे ५ ते ११ टक्के वाळलेली पाने, इत्यादी (ट्रॅश मटेरिअल) गाळप होणाऱ्या बिलेटबरोबर जाते. महाराष्ट्र शासनाने ४.५ टक्के इतकेच ट्रॅश मटेरिअल गाळपास जाणाऱ्या उसात धरण्यास परवानगी दिली आहे.
३) महाराष्ट्रात २०२२-२३ या हंगामात सरासरी १५.४ टक्के क्षेत्रातील उसाची यंत्राद्वारे तोडणी झाली. ब्राझीलमध्ये सुमारे ९२ टक्के आणि ऑस्ट्रेलियात संपूर्ण क्षेत्रातील उसाची तोडणी यंत्राद्वारे केली जाते. तेथील ऊस सरळ वाढतात, जमिनीवर लोळत नसल्याने बिलेटबरोबर तीन टक्क्यांपेक्षा जास्त ट्रॅश मटेरिअल येत नाही. यंत्राची पाती ठराविक काळानंतर बदलली पाहिजेत, म्हणजे ट्रॅश मटेरिअल व्यवस्थित साळले जाईल. त्यासाठी कंपनीच्या सहकार्याने साखर कारखान्यावर जास्तीची पाती ठेवली पाहिजेत.
४) महाराष्ट्रात ५०, ७५ आणि १०० टक्के क्षेत्रावरील ऊस यंत्राद्वारे तोडण्यासाठी अनुक्रमे ३,६७१, ५,५०६ आणि ७,३४२ ऊस तोडणी यंत्रे उपलब्ध होतील अशी पाच ते दहा वर्षांची योजना आखली पाहिजे.
५) यंत्राद्वारे दररोज १६,००० ते १८,००० टन ऊस तोडणी होणे आवश्यक आहे. नॅचरल शुगर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांच्या अनुभवानुसार सध्या तोडणी झालेला ऊस कारखान्यामध्ये गाळप होण्यासाठी २५ ते ३० तास थांबावे लागते. यामुळे बिलेटमधील साखरेचे विघटन होते. हा कालावधी आठ तासांइतका कमी कसा करता येईल, याकडेही लक्ष दिले पाहिजे.

यंत्राद्वारे तोडणीसाठी योग्य ऊस जाती ः
१) ऊस सरळ वाढतील, पक्व झाल्यावर जमिनीवर लोळणार नाहीत आणि वाळलेली पाने सहजगत्या गळून पडतील अशा जाती उपलब्ध झाल्या तर ऊस तोडणी यंत्र चालवण्यासाठी अडचण येणार नाही. आपल्याकडे अशा ऊस जाती विकसित झाल्या आहेत. त्यांचा शेतकऱ्यांच्यापर्यंत जलद गतीने प्रसार गरजेचा आहे. असे गुणधर्म असलेली दामोदर (को ९९००४) ही जात कोइमतूर येथील ऊस प्रजनन संस्थेने विकसित केली आहे. २०२१ मध्ये दक्षिण भारतात ( महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू ) ही जात लागवडीसाठी प्रसारित झाली.
२) पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या फुले १३००७ (एम एस १४०८२ ) या जातीची संयुक्त कृषी संशोधन समितीने मे,२०२३ मध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली आहे. ही जात सरळ वाढणारी असून को- ८६०३२० आणि एमएस ०२६५ या प्रचलित जातींपेक्षा ऊस आणि साखर उत्पादनात सरस आहे.
३) को एम १५००६ ही जात सरळ वाढणारी असून ऊस संशोधन केंद्र आणि काही साखर कारखान्यांच्या प्रक्षेत्र चाचण्यांमध्ये सरस ठरल्याने पूर्व-प्रसारित करण्यात आली आहे. यंत्राद्वारे तोडणीसाठी योग्य असलेल्या काही जाती चाचण्यांमध्ये आशादायक दिसून आल्या आहेत. येत्या तीन वर्षात लागवडीसाठी उपलब्ध होतील.

ऊस तोडणी यंत्रामध्ये सुधारणा ः
१) विविध कंपन्या ऊस तोडणी यंत्रामध्ये गरजेनुसार बदल करत आहेत. पूर्वीचे यंत्र एका हंगामात सुमारे १५,००० टन ऊस तोडणी करत होते, आता सुधारित यंत्र एका हंगमात ३५,००० टन ऊस तोडणी करत आहे. यंत्रामध्ये ॲन्टी व्हर्टेक्स तंत्रज्ञान वापरल्यामुळे बिलेटबरोबर फक्त २.७ टक्के इतकेच ट्रॅश मटेरिअल येते. काही कंपन्यांनी बिलेट वाहतुकीसाठी अधिक कार्यक्षम इनफिल्डर ट्रॅक्टर विकसित केला आहे. यंत्राच्या गियर शिफ्टिंग यंत्रणेमुळे डिझेल खर्च कमी झाला आहे. लहान, कमी वजनाचे ऊस तोडणी यंत्र विकसित होत आहे.
२) नवीन सरळ वाढणाऱ्या आणि जमिनीवर न लोळणाऱ्या सुधारित ऊस जातींची लागवड केल्याने सुधारित यंत्रांचा वापर येत्या काळात वाढणार आहे. या यंत्रासाठी डिझेलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणास परवानगी मिळाल्यास आणि सीबीजीचा वापर केल्यास इंधन खर्चामध्ये बचत होणार आहे.
-----------------------------------------
संपर्क डॉ. योगेंद्र नेरकर, ७७०९५६८८१९
( लेखक महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे माजी कुलगुरू आहेत)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT