Orchard Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Planting : फळबाग लागवडीची पूर्वतयारी

Team Agrowon

Orchard Plantation Management : फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी लागवडीची पूर्वतयारी आणि योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच फळझाडांची लागवड करण्याआधी योग्य पूर्वतयारी करून घ्यावी.

फळबाग लागवडीपूर्वी जमिनीचा प्रकार, फळझाडांची निवड, बारमाही पाणी व्यवस्था, स्थानिक हवामान, माती, पाणी परिक्षण, कलमांची उपलब्धता या सर्व बाबींचा विचार अवश्‍य करावा.

जागेची निवड

उत्तम निचरा, मध्यम खोलीची जमीन फळबाग लागवडीसाठी निवडावी.

हवामान

फळबागेसाठी विशिष्ट प्रकारचे हवामान आवश्यक असते. चिकू, आंबा, केळी या फळपिकांना तुलनेने जास्त उष्ण हवामान मानवते. जास्त पावसाच्या प्रदेशात नारळ, फणस, चिकू, आंबा तर पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी सीताफळ, आवळा, बोर, अंजीर इ. कोरडवाहू फळपिकांचा विचार करावा.

जमीन

लागवडीपूर्वी माती परिक्षण अवश्य करावे.

फळझाडांची कलमे अनेक प्रकारच्या जमिनीत येऊ शकतात. तथापि, मध्यम प्रतीची, पोयटायुक्त, पाण्याचा निचरा होणारी जमीन योग्य असते.

रोप कलमांची मुळे कालांतराने जमिनीत खोलवर जातात. त्यामुळे जमिनीची खोली १ ते २ मीटर असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ दरम्यान असावा.

भारी पोयटायुक्त जमिनीत केळी, पपई, मोसंबी, चिकू तर, हलक्या जमिनीत सीताफळ, बोर, आवळा, चिंच तसेच चुनखडीचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीमध्ये क्षारास काटक असणाऱ्या फळझाडांची निवड करावी.

पूर्वमशागत

निवडलेल्या जमिनीची उन्हाळी खोल नांगरट करून कुळवाच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. त्यानंतर जमीन समपातळीत आणून योग्य अंतरावर खड्डे खोदण्यासाठी बागेची आखणी करावी.

लागवड पद्धती

फळबाग लागवडीसाठी चौरस, आयताकृती पद्धत तर डोंगर उतारासाठी कंटूर पद्धत वापरली जाते.

चौरस पद्धत सोपी, आखणीस सोयीची, मशागतीस योग्य असते. यात ओळींतील आणि दोन कलमांतील अंतर समान असते. आंबा, चिकू, पेरू इ. फळपिके या पद्धतीने लावली जातात.

घन लागवडीमध्ये जोड ओळ पद्धत तसेच ताटी पद्धतीचा फळपिकांनुसार अवलंब केला जातो.

खड्डा भरताना घ्यावयाची काळजी

फळपिकांच्या निवडीनुसार खड्ड्यांचे आकारमान ठरते. आंबा, चिक्कू, नारळ, जांभूळ, मोसंबी, लिंबू, संत्रा यांच्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर तर पेरू, बोर, सीताफळ, आवळा या पिकांसाठी ४५ बाय ४५ बाय ४५ सेंमी आकाराचे खड्डे खोदावेत.

खड्डा खोदताना चांगली माती खड्ड्याच्या एका बाजूस व तळाची मुरूम, खडक मिश्रित माती दुसऱ्या बाजूस टाकावी. म्हणजे चांगल्या मातीचा पुन्हा खड्डे करण्यासाठी उपयोग होतो.

खड्डे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरावेत. खड्डा भरताना खड्ड्याच्या बुडाला अर्धवट कुजलेला पालापाचोळा पसरून खड्ड्याच्या आकारमानानुसार ४ ते ५ घमेली चांगले कुजलेले शेणखत टाकावे. साधारण १.५ ते २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकून शेणखत व पोयटा माती मिसळून अशा मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. खड्डे भरताना जमिनीच्या पातळीपेक्षा ४ ते ५ सेंमी अधिक भरावेत.

लागवडीची वेळ

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करावी. तर पाऊसमान जास्त असलेल्या ठिकाणी पाऊस कमी झाल्यावर किंवा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये लागवड करावी. लागवडीच्या वेळी कडक ऊन व कोरडी हवा नसावी. ढगाळ आकाश व थोड्या प्रमाणात पाऊस पडेल अशावेळी दुपारनंतर फळझाडांची लागवड करावी.

फळपिकांच्या महत्त्वाच्या जाती, लागवड अंतर आणि हेक्टरी संख्या

फळझाडाचे नाव महत्त्वाच्या जाती लागवड अंतर हेक्टरी झाडे एकरी झाडे

आंबा केसर, पायरी, लंगडा, तोतापुरी, हापूस, रत्ना, सिंधु, वनराज, फुले अभिरुची १० × १० मीटर १०० ४०

चिकू कालीपत्ती, क्रिकेट बॉल, बारामशी, को-१, को-२, पीकेएम-१,२,३ १० × १० मीटर १०० ४०

सीताफळ बाळानगर, फुले पुरंदर, फुले जानकी, अर्का सहान ५ × ५ मीटर ४०० १६०

पेरू सरदार (एल-४९), ललित, अलाहाबाद सफेदा, सफेद जाम, अर्का रश्मी ६ × ६ मीटर २७७ १११

मोसंबी फुले मोसंबी, न्यूसेलर, काटोल गोल्ड, साथगुडी ६ × ६ मीटर २७७ १११

कागदी लिंबू साई सरबती, फुले शरबती, विक्रम, प्रमालिनी ६ × ६ मीटर २७७ १११

संत्रा नागपूर संत्रा, खासी, कुर्ग, किन्नो ६ × ६ मीटर २७७ १११

आवळा कृष्णा, कांचन, चकय्या, बनारसी, एन.ए.-७, एन.ए.-९ ७ × ७ मीटर २०४ ८२

डाळिंब फुले भगवा, फुले भगवा सुपर, आरक्ता, मृदुला, सोलापूर-६ ४.५ × ३.० मीटर ७४० २९६

केळी बसराई, श्रीमंती, जी-९ १.५ × १.५ मीटर ४४४४ १७७८

अंजीर पुना फिग, दिनकर, व्हिएन्ना, फुले राजेवाडी, काबूल, लखनौ, बंगलोर ४.५ × ३.० मीटर ७४० २९६

बोर उमराण, कडाका, चुहारा, मेहरुण, नरेंद्र बोर नं. १, फुले शबरी ६ × ६ मीटर २७७ १११

चिंच प्रतिष्ठान, योगेश्वरी, पीकेएम-१, नंबर २६३, अकोला स्मृती, फुले श्रावणी १० × १० मीटर १०० ४०

जांभूळ कोकण बहाडोली, स्थानिक १० × १० मीटर १०० ४०

पपई पुसा डेलिसिअस, पुसा मॅजेस्टी, पुसा नन्हा, पुसा जायन्ट, पुसा डॉर्फ व इतर संकरित वाण २.५ × २.२५ मीटर, २.५० × २ मीटर १९७६, २००० ७९०, ८००

नारळ बाणावली, प्रताप, टी × डी, लक्षद्वीप ऑर्डिनरी, फिलीपीन्स ऑर्डिनरी ७.५ × ७.५ मीटर १७८ ७१

लागवडीवेळी घ्यावयाची काळजी

लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीस करावी.

लागवड करताना कलम रोपांची पिशवी किंवा कुंडी रोपास कोणतीही इजा होऊ न देता अलगद वेगळी करावी. खड्ड्याच्या मध्यभागातील माती बाजूला करून कलम किंवा रोप मातीच्या गोळ्यासह लावावे.

कलम लावताना कलमाचा जोड जमिनीपासून १५ ते २० सेंमी वर ठेवावा.

कलम सरळ उभे ठेवून लावावे. नंतर पायाने सभोवतालची माती दाबावी.

लागवडीनंतर बांबू काठीचा आधार द्यावा.

दोन ते तीन दिवसांनी पुन्हा रोपाभोवतीची माती घट्ट दाबून घ्यावी.

पाऊस नसेल तर लागवडीनंतर आळ्यामध्ये आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीत ओलावा जास्त वेळ टिकून राहतो.

उन्हाची तीव्रता जास्त असलेल्या ठिकाणी रोपांना शेडनेट किंवा काड किंवा पाचट यांचा वापर करून सावली तयार करावी.

कलमे रोपांची निवड

कलमे जातिवंत चांगल्या प्रतीची, दर्जेदार, कीड व रोगमुक्त असावीत.

कणखर हार्डनिंग झालेली कलमे निवडावीत.

निवडलेल्या कलमांची जात भरपूर फळे येणारी असावी.

कलमे / रोपे एक वर्ष वयाची, मध्यम वाढीची आणि ६० ते ७५ सेंमी उंच असावीत.

कलम केलेल्या रोपांमध्ये खुंट व कलम काडीची जाडी एकसारखी असावी. जोड एकजीव झालेला असावा. फळझाडांचे कलम किंवा भरलेले डोळे जमिनीपासून १५ ते २० सेंमी पेक्षा उंच नसावेत.

कलमांना व छाट्यांना भरपूर मुळ्या असाव्यात. कलमांच्या फांद्या, पानांची वाढ समतोल व निरोगी असावी.

विद्यापीठाने संशोधित व शिफारशी केलेल्या नवीन, सुधारित व चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची लागवडीसाठी निवड करावी.

रोपांची खरेदी कृषी विद्यापीठाची रोपवाटिका, शासकीय किंवा परवानाधारक शासनमान्य रोपवाटिकेतूनच करावी.

लागवडीसाठी आवश्यक रोपांच्या संख्येपेक्षा १० ते १५ टक्के जास्त रोपे खरेदी करावीत. अशी रोपे नांगे भरणे किंवा रोपे मर झालेल्या ठिकाणी परत लावण्यासाठी उपयुक्त ठरतात.

उती संवर्धनाची रोपे निवडताना रोपांना पुरेशी हार्डनिंग केलेले असावे. शेंड कलम किंवा पाचर कलम केलेल्या रोपांच्या खुंटावरील फूट काढलेली असावी.

डॉ. सचिन मगर, ७५८८५१७९६७

(उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT