Green Manuring : जमिनीला आच्छादन अन् उन्हाळ्यात सावलीही

Green Manuring Crops : खानदेशातील हिरवळीच्या पिकांचे प्रयोग
Green Manuring
Green ManuringAgrowon

चंद्रकांत जाधव
Organic Farming : हिरवळीची पिके उत्तम सेंद्रिय आच्छादन तयार करून जमिनीची सुपीकता वाढवण्याचे काम करतातच. पण तीव्र उन्हाळा वा तापमानात उष्णता शोधून, केळीला काही प्रमाणात सावली देण्याचे काम ती करतात. खानदेशातील केळी उत्पादकांनी त्यानुसार प्रयोग करण्यास सुरवात केली असून त्यांना तसे फायदेही मिळू लागले आहेत.

केळी पिकात खानदेशची मोठी ओळख आहे. अलीकडील काळात हवामान बदल, तापमानवाढ या गंभीर समस्या बनल्या आहेत. त्याचा फटका केळीस बसत असून उत्पादकता व गुणवत्तेला मोठी हानी पोचत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी खानदेशातील प्रयोगशील केळी उत्पादकांनी विविध संकल्पना, प्रयोग राबवून त्यात यश मिळविले आहे.

हिरवळीच्या पिकांचा प्रयोग

धैंचा, ताग आदी हिरवळीची पिके जमीन सुपीकतेसाठी लाभदायी आहेत. बहुसंख्य शेतकरी फुलोऱ्यावर आल्यानंतर या पिकांचे अवशेष जमिनीत गाडण्याची पद्धती वापरतातच. जमिनीच्या प्रतीनुसार एकरी पाच ते १० किलो बियाणे पेरणीसाठी वापरण्यात येते.

एकरी तीन ट्रॉली शेणखत वापरून पिकास जो लाभ मिळतो तोच लाभ हिरवळीची पिके शेतात पेरून व गाडून मिळतो असे कठोरा (ता.जळगाव) येथील शेतकरी श्रीकांत पाटील अनुभवाअंती सांगतात.

उन्हाळ्यात हिरवळीच्या पिकांचा वापर

खानदेशात अलीकडे केळीच्या जून- जुलैच्या लागवडीत कुकुंबर मोझॅक विषाणूजन्य रोगाची समस्या येत आहे. त्यामुळे काहींनी लागवडीचा ‘पॅटर्न’ बदलला असून एप्रिल ते मे च्या मध्यापर्यंत लागवड केली जाते. अर्थात, महाशिवरात्रीसारख्या सणावेळी त्याचा फायदाही होतो.

लागवडीचा हा काळ भर उन्हाळ्याचा असल्याने व अलीकडे तापमान ४५ अंश व त्याहून अधिक वाढत असल्याने केळीच्या रोपांचे त्यापासून संरक्षण करणे मोठे आव्हानाचे झाले आहे. माचला (ता. चोपडा) येथील प्रयोगशील शेतकरी दीपक माणिक पाटील यांचे अनुभव त्या अनुषंगाने मार्गदर्शक आहेत. त्यांची २३ एकर शेती आहे. दहा एकर शेती ते भाडेतत्त्वावर करतात.

सहा कूपनलिका आहेत. मार्च- एप्रिल, जून-जुलै व नोव्हेंबर- डिसेंबर अशी तीन टप्प्यांत केळीची लागवड ते करतात. केळीचे एकूण क्षेत्र सुमारे १० ते १२ एकर असते. भर उन्हाळ्यातील लागवड चार एकरांत असते. दीपक सांगतात, की केळी लागवडीच्या सुमारे १५ दिवस आधी लागवडीच्या ‘मार्किंग’च्या दक्षिण व पश्‍चिमेला एल पट्टा तयार करतो.

तेथे लागवडीपासून १५ ते १८ सेंटिमीटरवर ताग, धैंच्या आदी हिरवळीच्या पिकांची लागवड करतो. ही पिके उष्ण वारा रोधण्याचे तसेच केळीला सावली देण्याचे काम करतात. योग्य अंतर ठेवल्याने केळीसोबत त्यांची स्पर्धा होत नाही. मुख्य पिकाची निकोप वाढ होते. मार्चमध्ये लागवड असल्यास अनावश्यक वाढ टाळण्यासाठी पावसाळ्यापर्यंत तीन वेळेस कापणी करावी लागते.

Green Manuring
Green Manuering Crop : हिरवळीचे खते गाडताना काय काळजी घ्यावी?

उत्तम जैविक मल्चिंग

दीपक सांगतात, की हिरवळीच्या पिकांचे आच्छादन हा पॉली मल्चिंगला चांगला पर्याय आहे.
जैविक मल्चिंगमुळे ओलावा टिकून राहतो. मार्च, एप्रिलमध्ये काढणीवर आलेल्या केळीतही
त्याच्याच पानांचे अवशेष आच्छादन म्हणून उपयोगाला येता.

तणनियंत्रण चांगल्या प्रकारे करता येते. केळी पिकासाठी ‘फ्रूट केअर’ तंत्राचा वापर होतो. गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. वर्षभरातील विविध हंगामांतील लागवडीचा विचार करता २२ किलोपासून ते २८ किलोपर्यंतची रास मिळते.

दरांची स्थिती
दीपक सांगतात की मागील वर्षी केळीला किलोला २८ रुपयांपर्यंत दर पोचले होते. यंदा
अलीकडेच तोडणी केलेल्या केळीला मात्र केवळ ८ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.
आंब्याचा हंगाम व मागील वर्षी चांगले दर मिळाल्याने केळीची वाढलेली लागवड त्याचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

दीपक पाटील, ९७६४९५६०६२

पाटील बंधूंचा अनुभव

रूखनखेडा (ता.चोपडा) येथील अजय व विजय हे पाटील बंधूदेखील जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी व सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी ताग, धैंचांचा सातत्याने वापर करतात. त्यांची १८ एकर शेती आहे. दोन कूपनलिका आहेत. भर उन्हाळ्यात केळीच्या बागेत ते ताग, धैंच्या घेतात.

सात ते आठ एकरांत केळी असते. त्यातील निम्मे क्षेत्र मृग बहर केळी पीक असते. उन्हाळ्यात लागवड केलेल्या केळी पिकातील ताग दर २२ ते २५ दिवसांत कापून घेतला जातो. कापताना तो केळी झाडाच्या उंचीपासून एक फूट वरच्या भागातून कापला जातो.

त्याचे केळी झाडानजीक आच्छादन केले जाते. केळी लागवड मे महिन्यात असेल तर एकदा कापणी होते. पावसाळा सुरू होतानाच ताग पूर्ण कापून मग तो केळी झाडालगत सरीत ठेवला जातो. सततच्या पावसात तागाचे अवशेष पूर्णतः कुजून त्यातून सेंद्रिय खत तयार होण्यास मदत मिळते.

केळी लागवडीपूर्वी महिनाभर किंवा त्यापेक्षा अधिक काळ जमीन तापू देतात. हिरवळीच्या खतांसह जिवाणू खतांचा वापर करतात. सुमारे ११ महिन्यांत केळीची ९५ टक्के काढणी होते. सर्वसाधारणपणे २५ किलोची रास ते मिळवितात. जमीन सुपीकतेसाठी केळीसह अन्य पिकांचे अवशेषही ते जमिनीत गाडतात. पीक फेरपालट करतात. बेवड म्हणून हरभरा, कांदा पीक घेतात.

अजय पाटील, ९५२९८१५८०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com