Pratap Pawar Article Agrowon
ॲग्रो विशेष

Pratap Pawar : बालमित्र आणि बरंच काही...!

Team Agrowon

बंड्या - त्याला आम्ही सर्व जण याच नावानं संबोधत असू - आणि मी एकमेकांच्या घरी नेहमी यायचो-जायचो. माझ्याप्रमाणे तोही शेंडेफळ होता. बंड्या जेमतेम दहावी-बारावीपर्यंत शिकला आणि मग त्यानं लष्करात नोकरी धरली. आमचा पत्रव्यवहार होत असे. सुट्टीत घरी आल्यावर तो आठवणीनं भेटायचा.
काटेवाडीत पहिली इयत्ता पास झाल्यावर बारामतीत आम्ही आमराईत राहायला आलो. नवीन शाळा, पत्र्याची का असेना, तिथं मला नवीन मित्र मिळाले. त्यातील एकाशी माझी घट्ट मैत्री झाली. आम्ही जवळच राहत असू. तसा तो नात्यातलाही निघाला. आमचे कौटुंबिक संबंधही जवळचे होते. अभ्यासात त्याला फारशी गती नव्हती. माझा पहिला नंबर असे. मला मिडल स्कूल स्कॉलरशिपमध्ये विशेष प्रावीण्य मिळालं होतं. याचं श्रेय आम्हा दोघांची तयारी करून घेणाऱ्या देशमाने गुरुजींना जातं.

बंड्या - त्याला आम्ही सर्व जण याच नावानं संबोधत असू - आणि मी एकमेकांच्या घरी नेहमी यायचो-जायचो. माझ्याप्रमाणे तोही शेंडेफळ होता. शाळेत जाण्याबाबत तो फारसा दक्ष नसे. त्याचं घर शाळेच्या रस्त्यावरच असल्यानं मी त्याला बोलवायला जात असे. घरातून निघताना तो त्याच्या वडिलांकडे एक पैशासाठी हट्ट धरत असे. त्याला काही वेळा छिद्राचा पैसा किंवा ढब्बू पैसा मिळत असे. रस्त्यातील दुकानात छिद्राच्या पैशाला चार रंगीबेरंगी गोळ्या मिळत, तर ढब्बू पैशाला सहा गोळ्या मिळत. मग तो मला एक गोळी देत असे. बाकीच्या गोळ्या वर्गात कुडुम कुडुम आवाज करत संपवत असे. साहजिकच त्या बालवयात त्याच्या या गोष्टींचा मला फार हेवा वाटायचा. आमच्या घरी असला काही प्रकारच नव्हता. त्यामुळे बंड्याचे आई-वडील किती चांगले आहेत याची मनात तुलना होत असे. आपण अभ्यासात चांगले असूनही आपल्या आई-वडिलांना त्याचं काहीच कौतुक नाही अशी भावना मनात दाटून यायची.
बंड्या जेमतेम दहावी-बारावीपर्यंत शिकला आणि मग त्यानं लष्करात नोकरी धरली. आमचा पत्रव्यवहार होत असे. सुट्टीत घरी आल्यावर तो आठवणीनं भेटायचा.

माझं लग्न झाल्यावर आम्ही मधुचंद्रासाठी बंगळूर, म्हैसूर, कोईमतूर इथं जायचं ठरवलं. घरी तशी प्रथा नव्हती; परंतु मी शेंडेफळ असल्यानं आणि वडीलबंधूंचीही मान्यता असल्यानं आम्ही गेलो. आई-वडिलांनी चेहऱ्यावर नापसंती दाखवली तरी आम्ही गेलोच. बंगळूरला गेल्यावर आधी कळवल्यानुसार - बंड्या तिथं असल्यानं - हॉटेलवर भेटायला आला; तेही रात्री दहा-साहेदहा  वाजता. दरवाज्यावर टकटक झाल्यानं मी नाइलाजानं दार उघडलं. नवीन लग्न झालेल्या जोडप्याची अशा वेळी काय मनःस्थिती असते ते सांगायला नकोच! पाहतो तर काय, समोर बंडोपंत उभे!
मी विचारलं : ‘‘काय रे, इतक्या रात्री?’’
‘‘काही नाही रे, तुझी फार आठवण आली म्हणून आलो,’’ बंड्यानं निर्विकारपणे सांगितलं. मी (मनातल्या मनातच!) कपाळावर हात मारला आणि गोड बोलून त्याची बोळवण केली.











बंगळूर, कोईमतूर इथं छान वेळ गेला. तिथून आम्ही म्हैसूरला आलो. वृंदावन गार्डनचं आकर्षण होतंच. सिनेमात सगळीच्या सगळी बाग नायक-नायिकेकरताच फुललेली असते. कुणीही त्यांच्या आसपास नसतं, त्यामुळे पळापळ करत गाणी म्हणायला त्यांना सोपं जातं; परंतु इथं तसं काहीच नव्हतं. अमाप गर्दी. त्यामुळे, ‘हातात हात दे’ म्हटलं तरी भारती संकोचत होती. सिनेमात दाखवलं जातं तशी झाडाआडची पळापळ करणं प्रत्यक्षात कसं अशक्य असतं याची प्रचीती आली. आपल्या प्रेमाचं प्रदर्शन सर्वांसमोर कसं करायचं हा विचार तिच्या संस्कारात होता. ती कोल्हापूरच्या सुशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्मलेली मुलगी. तीही थोरली. त्यामुळे शिस्तीचे सर्व प्रयोग तिच्यावर केले गेले होते! तरी बरं, तिचं सर्व आयुष्य मुख्यतः मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये गेलेलं होतं.
म्हैसूरमध्ये इतरत्र भटकत असताना एक छान प्राणिसंग्रहालय दिसलं. वेळ असल्यानं आम्ही तिथं गेलो. इकडं-तिकडं भटकंती झाल्यावर एका मोठ्या पिंजऱ्यात अतिशय देखण्या अशा ब्लॅक पँथरचं दर्शन झालं. काळ्या कुळकुळीत कांतीचं एक वेगळंच सौंदर्य होतं. लाल डोळ्यांत एक प्रकारची भेदकता होती. भारतीला जनावरांचं अतिशय प्रेम आहे. आमच्याकडे औंधला दोन कुत्री होती. ती म्हणजे भारतीची लाडकी बाळंच. आमचा कुत्रा ऑब्लिक्स तिच्या समजुतीप्रमाणे कधीच चुकत नसे! त्याची भाषा, भावना हे भारतीला सर्व समजत असे. थंडी वाजत असेल म्हणून अभिजितचा परदेशातून आणलेला स्पोर्ट्‌स शर्ट ती त्याला बिनधास्तपणे घालत असे. अर्थात, सर्व नातेवाइकांमध्ये, विशेषतः ऑब्लिक्सबद्दलचे तिचं प्रेम, हा आमच्या  सर्वांकडे एक चेष्टेचा, थट्टा करण्याचा विषय असायचा.

प्राणिसंग्रहालयातील या पॅंथरच्या जोडीचे मी भराभर १२-१५ फोटो काढले. विशेष म्हणजे, भारती पिंजऱ्याजवळ उभी राहिल्यावर तो जणू काही आज्ञाधारक बालकाप्रमाणे पोज देत असे. त्यामुळे हे प्रसंग फोटोत टिपणं आवश्यक होतं. हॉटेलवर आल्यावर ध्यानात आलं, की कॅमेऱ्याचं लेन्सपुढील झाकण काढायला मी विसरलो होतो! ही चुटपुट कायमची मनात राहिली. नंतर आम्ही बंदीपूरच्या जंगलात जायचं ठरवलं. तिथं हत्तीवर बसून वाघांच्या शोधात जाता येतं. वाघ कुठं असतील याचा माहुतांना अचूक अंदाज असतो. शिवाय, हत्तीची बारीक नजरही सोबतीला असतेच. आम्ही जंगलात एक-दोन मैल फिरलो तरीही वाघांचा कुठं पत्ताच नव्हता.
दरम्यान, भारतीच्या ध्यानात आलं, की तिची एक चप्पल पडली आहे. आता आली का पंचाईत. आमच्या बोलण्यावरून माहुताला शंका आली. काय झालं, अशी त्यानं चौकशी केली. घडलेला प्रकार आम्ही त्याला सांगितला. माझ्या बोलण्यात साहजिकच काळजीचा सूर होता. त्यानं भारतीच्या दुसऱ्या पायातील चप्पल मागितली आणि हत्तीला थांबवून त्याला वास घ्यायला ती चप्पल सोंडेसमोर धरली. हत्ती उलटा फिरला. सुमारे अर्धा-एक किलोमीटरवर मागं जाऊन हत्तीची सोंड तिथल्या पालापाचोळ्यात आपलं ‘संशोधन’ करू लागली. हत्ती एके ठिकाणी थांबला आणि पाचोळ्यातून त्यानं चप्पल शोधून काढली! सोंडेनं माहुताच्या ताब्यात दिली. आम्ही थक्क होऊन गेलो. अर्थात, या सेवेचं बक्षीस आम्ही आनंदानं दिलंच.

जंगलात वाघ कुठं दिसेना...मग माहूत म्हणाला : ‘बहुतेक तमिळनाडूकडील भागात हे वाघ गेले असावेत असं दिसतंय. त्यामुळे आता आपण परत फिरू या.’ पर्यटकांना जंगलात रोज घेऊन जाणाऱ्या या माहुताला हा बोध आता झाला आहे हे पटण्यासारखं नव्हतं; पण मुकाट्यानं आम्ही मूळ जागी आलो.
आमचं लग्न ऑगस्ट महिन्यात झाल्यानं या गमतीदार गोष्टींचा काळ डोळ्यांपुढं चित्रपटासारखा उभा राहिला. (साहजिकच आहे...नाही का?). अशा आठवणी आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात, त्रेपन्न वर्षं झाली तरी..!
मी पाचवीत होतो. होळीचा दिवस होता. माझे वडील सकाळी ११ वाजता आणि संध्याकाळी सात-साडेसात वाजता जेवत असत. त्यांची शिस्त ही पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घड्याळाच्या काट्याप्रमाणे असे. त्यामुळे आम्हीही सर्व जण त्याच वेळी जेवत असू. आता चौकोनी कुटुंबातही अनेकदा एकत्र जेवण होत नाही. घरी अर्थातच पुरणपोळीचा बेत होता. पुरणपोळी किंवा गोड पदार्थ मला आवडतात, तसंच बारामतीत स्वयंपाकपद्धतीत भरपूर तिखट हाही प्रकार असे. घरात नवीन पिढी, विशेषतः मृणाल आल्यावर, स्वयंपाक अगदी फिका असतो. अभिजित आणि नातवंडंही अजिबात तिखट खात नाहीत. त्यामुळे आजही माझ्या जेवणात हिरवी मिरची किंवा मिरचीचा ठेचा असतोच. मित्रांना याचं मोठं नवल वाटतं; पण ‘क्या करूँ? बचपनसे ही आदत से मजबूर हूँ ना!’

पुरणपोळीचं जेवण संपवून मी घराबाहेर आलो तर बंडोपंत समोर उभे. मी विचारलं : ‘‘काय रे, या वेळी (म्हणजे जेवणाच्या वेळी) आलास?’’
तो म्हणाला : ‘‘माझ्या आईनं तुला बोलावलं आहे.’’
मी म्हटलं : ‘‘ठीक आहे.’’
घरात तसं सांगून मी त्याच्या घरी गेलो. त्याचं घर म्हणजे पाच मिनिटांचा रस्ता. त्याचे आई-वडील माझ्यासाठीच जेवायचे थांबले होते असं जाणवलं. ताट-वाटी मांडली गेली. ‘जेवायला बस’ अशी जवळपास आज्ञाच झाली.
‘‘माझं जेवण झालं आहे,’’ असं मी सांगितलं. त्यावर पुन्हा ‘‘आज सणाचा दिवस आहे...नाही म्हणायचं नाही,’’ अशी प्रेमळ आज्ञा केली गेली. मुकाट्यानं पाटावर बसलो. दोन्ही बाजूंना त्याचे आई-वडील आणि मध्ये मी. एक पुरणपोळी (ती म्हणजे बारामतीतील) वाढली गेली. ती संपवत नाही तोच दुसरी वाढली गेली.

मी विनवणीपूर्वक म्हटलं : ‘‘माझं जेवण झालेलं आहे.’’
मात्र त्यांना त्यांचा आग्रह महत्त्वाचा वाटत होता. असं करता करता तब्बल पाच पुरणपोळ्या माझ्या पोटात कोंबल्या गेल्या. पोटातून कळा यायला लागल्या. माझ्या कमरेभोवती काळा करदोरा असे. तो तुटला. मी ताटावरून उठून गडबडा लोळायला लागलो तेव्हा त्याचं गांभीर्य सर्वांच्या ध्यानात आलं. मला ओवा वगैरे देऊन झोपायला सांगण्यात आलं. तेव्हापासून आजतागायत कुणी खाण्याचा आग्रह केल्यास किंवा जबरदस्ती केल्यास मला रागच येतो. शिवाय, आवश्यकतेपेक्षा मी कणभरही अधिक खात नाही. मी इतकी वर्षं बिनढेरीचा कसा याचं लोकांना आश्चर्य वाटतं. याचं श्रेय नियमित व्यायाम आणि खाण्यावरील आवश्यक तो संयम या बाबींना आहे.
सर्वांनाच हे शक्य आहे, हे तुम्हाला पटलं असेलच. या बाबी अमलात आणायच्या की नाही, हे ज्यानं त्यानं ठरवायचं आहे.
(प्रतिक्रिया नोंदवा : व्हॉट्सॲप क्रमांक
 ८४८४९ ७३६०२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

Weather Update : नक्षत्र बदलले; वातावरणात वाढला उन्हाचा चटका

SCROLL FOR NEXT