Manchar News : आंबेगाव तालुक्यात सातगाव पठारासह अन्य गावांत २५ ते ३० दिवसांचे बटाटा पीक बहरले आहे. पावसाच्या दमदार सरींमुळे पिकाची जोमदार वाढ होत आहे. त्यामुळे बटाटा उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. पण ओढ्या-नाल्यांना पूर येण्यासाठी व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यासाठी अजून जोरदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पेठ, पारगाव, कोल्हारवाडी, कुरवंडी, थुगाव, भावडी, कारेगाव तसेच वाफगाव, वरुडे, वाकळवाडी, जऊळके, जैदवाडी (ता. खेड) हा परिसर बटाट्याचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. “सातगाव पठार भागात शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ‘१५३३’, ‘एफसी ११’, ‘मकेन’ आदी जातींच्या बटाटा पिकाची लागवड पावसाळ्यात केली आहे. साधारणतः ८० ते ९० दिवसांत हे पीक काढणी योग्य होते. सप्टेंबरच्या अखेरीस पीक काढणी योग्य होईल,” असे भावडी येथील शेतकरी अशोक बाजारे यांनी सांगितले.
‘‘जिल्हा बँकेच्या वतीने चार हजार ४७२ बटाटा उत्पादकांना आठ हजार १९७ एकर क्षेत्रासाठी जूनअखेर मंचर, पेठ, लोणी शाखेमार्फत कर्ज वितरित केले आहे,’’ असे बँकेचे विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड यांनी सांगितले.
कंपन्यांशी करार
“बटाटा बियाणे लागवड, औषध फवारणी, खते, काढणी व मजुरी असा एकरी ७० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. एकरी एकूण सरासरी सात ते दहा टन बटाटा उत्पादन निघते. या भागातील बटाट्याला वेफर्ससाठी मागणी आहे. अनेक शेतकऱ्यांनी उत्पादित बटाट्यासाठी विविध कंपन्यांबरोबर करार केले असून, १९ हजार रुपये टन असा दर निश्चित केला आहे,” असे शेतकरी भाऊसाहेब सावंत पाटील यांनी सांगितले.
मंचर कृषी मंडल कार्यक्षेत्रात सातगाव पठारचा समावेश आहे. या मंडल कार्यक्षेत्रात ११ हजार ६० एकर क्षेत्रात बटाटा लागवड झाली आहे. सर्वाधिक लागवड सातगाव पठारमध्ये आहे.नरेंद्र वेताळ, आंबेगाव तालुका कृषी अधिकारी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.