Animal Health Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Toxicity : जनावरांतील वनस्पतिजन्य विषबाधा अन् उपाययोजना

Livestock Health : बऱ्याच वेळा जनावरांचे कुपोषण होत असेल, त्यांना संतुलित आणि पुरेसा आहार मिळत नसल्यास पोषणमूल्यांची गरज भरून काढण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी जनावरे विषारी वनस्पती खातात.

Team Agrowon

डॉ. मत्स्यगंधा पाटील

Plant Poisoning in Animals and its Remedies : कोणतेही घटक जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास ते विषबाधेसाठी कारणीभूत ठरतात. औषध हे योग्य मात्रेत उपचारास मदत करते, परंतु जास्त प्रमाणात घेतल्यास त्याची विषबाधा तयार होते. विषबाधा ही जनावराने कोणती वनस्पती किती प्रमाणात खाल्ली आहे यावर अवलंबून असते. विषारी झाडे, झुडपे ही जनावरात विषबाधा निर्माण करतात. अशा वनस्पतींची पाने, मुळे, खोड, फांद्या, फूल किंवा फळ जनावरांच्या खाण्यात आल्यास विषबाधा होते. वनस्पतिजन्य विषबाधा ही एकदम विषारी झाडे जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास किंवा दररोज थोड्या प्रमाणात जास्त कालावधीसाठी खाण्यात आल्यास विषबाधा होते.

आपल्याकडे वातावरण सारखे बदलत असते, त्यामुळे त्याचा चारा उपलब्धतेवर, झाडे-झुडपे यांच्या वाढीवर परिणाम होतो. पशुपालकांना आपल्या भागात आढळणाऱ्या विषारी वनस्पतींबाबत जास्त माहिती नसते, यामुळे जनावरे चरताना विषारी वनस्पती आहारात आल्यास अनवधानाने विषबाधा होते.

वनस्पतीमधील विषारी घटक

जीवसृष्टीच्या उत्क्रांतीसह, काही वनस्पतींनी विषारी पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्या वनस्पतींचे संरक्षण होते. परंतु अशा वनस्पतिजन्य विषारी घटकामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येते.

आपल्या देशात सुमारे वीस हजार फुलांच्या वनस्पती आहेत. अनेक वनस्पती अन्न, चारा, औषध आणि तंतू म्हणून वापरल्या जातात. काही फुलांच्या वनस्पती प्रजाती विषारी आहेत. काही वनस्पती औषधी म्हणून वापरल्या जातात, तर काही वनस्पती एकदम विषारी असतात. म्हणून अशा विषारी वनस्पतींबाबत माहिती महत्त्वाची आहे.

वनस्पतीमध्ये विषारी गुणधर्म हे अल्कलॉइड्स, ग्लुकोसाइड्स, सॅपोनिन्स, अमाइन्स, टॅनिन, रेझिन्स इत्यादी विषारी पदार्थांमुळे असतात. अशा विषारी पदार्थामुळे या वनस्पतीपासून जनावरे दूर राहतात. यामुळे वनस्पतीचे संरक्षण होते. काही वनस्पतींना संरक्षणासाठी काटे असतात. परंतु काटेविरहित वनस्पतीमध्ये विषारी रासायनिक घटक संरक्षणासाठी तयार होतात. हे घटक वनस्पतीच्या वाढीच्या काही विशिष्ट कालावधीसाठी, जीवनाच्या काही विशिष्ट टप्प्यावर जनावरांसाठी विषारी असतात.

विषारी वनस्पती या चारा पिके, चराऊ कुरणे, बागेमध्ये आढळून येतात. अशा वनस्पती खाण्यात आल्यास किंवा त्यांचा स्पर्श झाल्यासही जखमा होताना आपण पाहत असतो. विषबाधेची तीव्रता ही खाल्लेल्या वनस्पतीचे प्रमाण, वनस्पतीचा खाल्लेला भाग, वनस्पती कोणत्या हंगामात खाल्ल्या, झाडाचे वय, जमिनीतील ओलावा, वनस्पती खाण्यापूर्वी प्राण्याचे आरोग्य आणि जनावराचा आकार आणि वय यावर अवलंबून असते. तरुण जनावरे सामान्यतः वृद्ध जनावरांपेक्षा वनस्पतिजन्य विषबाधेसाठी अधिक संवेदनशील असतात.

जनावरे विषारी वनस्पती का खातात?

बऱ्याच वेळा जनावरांचे कुपोषण होत असेल, त्यांना संतुलित आणि पुरेसा आहार मिळत नसल्यास पोषणमूल्यांची गरज भरून काढण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी जनावरे अशा वनस्पती खातात.

चराऊ कुरणावर उपलब्ध चाऱ्याची प्रत आणि प्रमाणावर चरणाऱ्या जनावरांची संख्या ठरवावी. कमी जागेत जास्त जनावरे चारल्यास पोषणमूल्यांचा कमतरता होऊन अशी जनावरे इतर काहीही वनस्पती खातात. जनावरांना पुरेशा प्रमाणात चारा व पशुखाद्य दिल्यास शक्यतो विषारी वनस्पती खात नाहीत. जनावरांना पिण्यासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था असावी.

ज्या जनावरांना टाकून दिलेली झाडे किंवा इतर विषारी पदार्थ असणाऱ्या तणयुक्त वनस्पती खाण्यासाठी दिल्या जातात त्यांना विषबाधा होण्याचा धोका असतो. म्हणून विषारी वनस्पतीची मुळे, पाने किंवा रोपे यांच्या अपघाती संपर्कात येऊ नयेत यासाठी आवारातील कचरा असलेल्या भागापासून जनावरांचा कळप दूर ठेवावा. नुकत्याच नांगरलेल्या जमिनीवरील उघडी पडलेली वनस्पतींची मुळे विषारी आहेत का, याची पाहणी करूनच अशा ठिकाणी जनावरांना चरायला सोडावे.

वनस्पतिजन्य विषबाधेची लक्षणे

आजाराची लक्षणे न दिसण्यापासून ते जनावरांचे पोट फुगणे (सुजलेले ओटीपोट), लंगडेपणा, वेदना होणे, डोळ्यातून पाणी येणे, पोटशूळ, तोंडाला फेस येणे, पचन बिघडणे, जळजळ होणे, वजन कमी होणे किंवा मृत्यू होणे अशी लक्षणे असू शकतात.

विषारी वनस्पती यकृत आणि मूत्रपिंडांचे भरून न येणारे नुकसान करतात. शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी करतात, रक्त गोठण्यास अडथळा आणतात, पेशी विभाजनास प्रतिबंध करतात, रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात किंवा प्राण्यांच्या त्वचेवर आणि डोळ्यांवर परिणाम करतात.

कोणत्या वनस्पतीची विषबाधा झाली आहे याचे लवकर निदान झाल्यास जनावरांचे शारीरिक नुकसान तसेच जनावरांचा मृत्यू टाळता येईल.

वनस्पतिजन्य विषबाधा टाळण्यासाठी उपाययोजना

एखाद्या अनोळखी ठिकाणी किंवा नवीन ठिकाणी जनावरे चरताना त्या भागातील विषारी वनस्पतींबाबत माहिती घ्यावी. आपल्या भागातील विषारी वनस्पतींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. अशी वनस्पती ओळखण्यासाठी प्रयत्न करावेत.

चराई क्षेत्राच्या भागात कोणत्या उद्योगातील, कारखान्यातील सांडपाणी वाहून येत आहे का? याबाबत माहिती घ्यावी. सांडपाणी येत असेल तर अशा ठिकाणच्या कुराणामध्ये जनावरे चारू नयेत.

दलदल किंवा कमी पर्जन्यमान असणाऱ्या भागातील वनस्पती जनावरांच्या आहारात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. विषारी द्रव्ये रोपे, पाने, मुळे, कोवळ्या कोंबांची फळे किंवा संपूर्ण झाडामध्ये आढळू शकतात. काही वेळा वनस्पतीचे फक्त काही भाग विषारी असू शकतात आणि विषाचे प्रमाण प्रत्येक हंगामात आणि वर्षानुवर्षे बदलू शकते. खुरटी झुडपे चारू नयेत.

विषबाधा झालेल्या जनावरांचे प्राथमिक आणि प्रभावी व्यवस्थापन

विषबाधा झालेल्या जनावराच्या आगमनानंतर, प्रारंभिक प्राधान्य म्हणजे श्‍वासोच्छ्वास आणि रक्ताभिसरणाची देखभाल करून या दोन्ही बाबी व्यवस्थित राहतील याची काळजी घ्यावी. इतर सर्व संभाव्य विषबाधा करणाऱ्या वस्तू जनावरांपासून दूर ठेवाव्यात. जनावरास विषबाधा झाल्याची शंका असल्यास पुढील गोष्टी कराव्यात.

विषबाधा कोणत्या वनस्पतीमुळे झाली आहे हे माहिती झाल्यास तत्काळ जनावरांना अशी वनस्पती खाण्यापासून प्रतिबंध करावा.

बाधित जनावरांना वेगळे करावे. कोळसा पूड किंवा रेचक पावडर द्यावी.

जनावरांच्या शरीरावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

शक्य असल्यास, पुढील निदानासाठी विषारी पदार्थाचे नमुने जवळ ठेवावेत.

त्वरित निदान आणि उपचारांसाठी तज्ज्ञ पशुवैद्यकांना संपर्क करावा. लवकरात लवकर उपचार सुरू करावेत.

डॉ. मत्स्यगंधा पाटील, ९८३४१३९५९६ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Vidhansabha Election : नांदेडमध्ये लोकसभेसह विधानसभेसाठी २५ वर्षांनंतर मतदान

Sugarcane Crushing : गाळपासाठी नांदेड विभागातील २५ साखर कारखान्यांना परवाना

Chhatrapati Sambhajinagar Vidhansabha Election : छत्रपती संभाजीनगर शहरात १२९०, ग्रामीणमध्ये १९८३ मतदान केंद्र

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, मका तसेच काय आहेत आजचे हरभरा दर?

Cotton Rate : दोन वेचणींतच खराटा; कापसाला कवडीमोल भाव

SCROLL FOR NEXT