Agriculture Crop
Agriculture Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Management : हिरवळीच्या खतांसाठी विविध पिकांचे नियोजन

Team Agrowon

डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. आनंद गोरे

भाग - २

ताग/बोरू

हे हिरवळीचे उत्तम खत आहे. ज्या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे ताग लागवड करावी. सर्व प्रकारच्या जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. मात्र आम्लधर्मीय जमीन तसेच पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होत नाही.

पावसाळ्याच्या सुरुवातीस हेक्टरी ५० ते ६० किलो बियाणे पेरावे. पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो­ऱ्यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० सेंमी उंच वाढले असताना नांगराच्या साह्याने जमिनीत गाडून टाकावे.

तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्का असते. या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते.

धैंचा

तागापेक्षा हे काटक हिरवळीचे हे पीक आहे. कमी पर्जन्यमान, पाणथळ ठिकाण, क्षारमय किंवा आम्लधर्मीय जमिनीत हे पीक तग धरू शकते. याच्या मुळांवर तसेच खोडावर गाठी असतात. या गाठीमध्ये रायझोबियम जिवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात.

पावसाच्या सुरुवातीस हेक्टरी २५ ते ४० किलो बियाणे पेरावे. पेरणीपूर्वी रायझोबियम जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया बियाण्यास करावी.

आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यांत ९० ते १०० सेंमी उंचीपर्यंत वाढले असता जमिनीत नांगराने गाडावे. धैंचापासून हेक्टरी १० ते २० टनांपर्यंत हिरव्या सेंद्रिय पदार्थांची निर्मिती होते. या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ टक्का इतके आहे.

भात लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते.

घेवडा

हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते. पाणथळ जमिनीस हे पीक योग्य नाही.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी करावी. प्रति हेक्टरी ५० किलो बियाणे पेरावे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जमिनीत गाडावे.

गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया)

झुडूप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच निरनिराळ्या पर्जन्यमानाच्या प्रदेशात चांगले येते.

या झाडाची लागवड दोन प्रकारे करतात. पहिल्या पद्धतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० सेंमी लांब ३ सेंमी व्यासाची दोन छाट कलमे निवडावीत. पावसाळ्याच्या सुरुवातीस बांधावर ३० सेंमी बाय ३० सेंमी बाय ३० सेंमी आकाराचा खड्डा करून कलमांची लागवड करावी किंवा पडीक जमिनीत लागवड करावी. दुसऱ्या पद्धतीत गादी वाफे तयार करून किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावीत. ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरुवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत.

पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून, दुसऱ्या वर्षांपासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळतो. या झाडाच्या फांद्यांची वरचेवर छाटणी करून नवीन फूट येते. त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते.

गिरिपुष्पाची पाने धैंचा, वनझाडांच्या पालापाचोळ्यापेक्षा जलद कुजतात. गिरिपुष्पाच्या पानांमध्ये सेंद्रिय कर्ब ३६ टक्के, नत्र २.७० टक्के, स्फुरद ०.५ टक्का व पालाश १.१५ टक्का असते. म्हणून नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करण्यासाठी गिरिपुष्प हिरवळीच्या खतांचा मोठा सहभाग आहे.

हिरवळीची पिकांचे नियोजन

मे-जून महिन्यात पिकाची पेरणी करावी किंवा बियाणे शेतात फेकून द्यावे, यासाठी बियाण्याचे प्रमाणे दीड पट जास्त वापरावे. यामुळे पिकाची दाट वाढ होते.

पिकाची पर्णीय वाढ पूर्ण झाल्यावर फुलो­ऱ्यात येण्याआधी म्हणजे पेरणीपासून ६ ते ८ आठवड्यांसाठी पीक नांगरून जमिनीत गाडावे. शेतात पाणी द्यावे. त्याचे पूर्ण विघटन झाल्यावर पुढील रब्बी पिकाची वेळेवर पेरणी करावी. या प्रकारात खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून जातो. पण त्याचा फायदा रब्बी हंगामात पेरलेल्या पिकास होतो. जमिनीची सुपीकता वाढविण्यास होतो.

हिरवळीचे पीक आंतरपीक म्हणून घेता येते. उदा. कापूस, मका व फळबागेत ताग, धैंचा, बरसीम, चवळी ही हिरवळीची पिके आंतरपीक म्हणून पेरून ६ ते ८ आठवड्यांनी जमिनीत गाडून टाकावीत.

हिरव्या पानांची पिके वापरावयाची असल्यास या पिकांची बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करावी. या पिकांची हिरवी कोवळी पाने गोळा करून ती पूर्व मशागतीच्या वेळी जमिनीत मिसळावीत.

पीक लागवडीचा हंगाम हरित वनस्पतीचे उत्पादन

(टन / हे) नत्राचे प्रमाण (टक्के) जमिनीत विरघळणारे नत्र (किलो / एकरी)

बोरू खरीप ८.५० ०.४३ ३६.५५

धैंचा खरीप, रब्बी ७.५० ०.४२ ३१.५०

चवळी खरीप, रब्बी ६.०० ०.४९ ४४.१०

मूग खरीप,उन्हाळी ३.०० ०.५३ १५.९०

उडीद खरीप ३.५० ०.८५ २९.७५

मटकी खरीप, रब्बी ३.५० ०.८५ २९.७५

गवार खरीप, रब्बी ६.०० ०.३४ २७.२०

बरसीम रब्बी ४.०० ०.४३ १७.२०

शेवरी बारमाही ७.५० २.४३ १८२.२५

गिरिपुष्प बारमाही २५ किलो/झाड २.५३ ६३० ग्रॅम / झाड

सुबाभूळ बारमाही २० किलो/झाड ८.२० ६४० ग्रॅम / झाड

डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६

(सेंद्रिय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Fund : पीएम किसानचा हप्ता २ हजाराने वाढणार ? अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता

Forest Encroachment : वन क्षेत्रातील पिकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई

Kharif Sowing : जूनमधील असमतोल पावसामुळे खरीप पेरण्यांमध्ये अडथळे

Agrowon Podcast : हळदीत काहीशी नरमाई; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहेत तूर दर ?

Kolhapur Rain : कोल्हापुरातील २४ बंधारे पाण्याखाली, पंचगंगेची पाणी पातळी ५ फुटांनी वाढली

SCROLL FOR NEXT