Citrus Crop Management : लिंबूवर्गीय फळबागेचे तीव्र उन्हाळ्यातील व्यवस्थापन

Crop Management In Summer : संत्रा, मोसंबी व लिंबू फळबागांमध्ये नवीन आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहराची लहान फळांची फळगळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे विविध दुष्परिणाम दिसून येतात.
Citrus Crop
Citrus CropAgrowon

डॉ. योगेश इंगळे, डॉ. दिनेश पैठणकर

सध्या काही ठिकाणी वळवाच्या पावसाने दिलासा मिळाला असला तरी एकूणच उन्हाळ्यात तीव्र उष्ण तापमानाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे संत्रा, मोसंबी व लिंबू फळबागांमध्ये नवीन आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहराची लहान फळांची फळगळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे विविध दुष्परिणाम दिसून येतात. या दुष्परिणामांची दाहकता कमी करण्यासाठी करावयाच्या व्यवस्थापन माहिती घेऊ.

नवीन कलमे, रोपांची निगा

प्रखर उन्हामुळे मागील वर्षी लागवड केलेल्या कलमे, रोपांची कोवळे शेंडे सुकणे, पाने गळणे असे परिणाम दिसून येतात. रोपांभोवतीच्या मातीचे तापमान कमी राखण्यासाठी किमान २ ते ३ फूट परिघामध्ये सेंद्रिय पदार्थांचा (उदा. गवते, पालापाचोळा, कुटार, गव्हांडा, तणस इ.) १० सेंटिमीटर थर देऊन आच्छादन करावे. ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.

या रोपांच्या भोवती २ फूट परिघामध्ये गोलाकार पद्धतीने बोरू बी पेरावेत. बोरूची वाढ झपाट्याने होऊन सभोवताली सावली राहते. किंवा कलमांच्या भोवती तिन्ही बाजूने त्रिकोणात बांबू रोवून हिरव्या शेडनेटचा मांडव करावा. किंवा दक्षिण व पश्‍चिम बाजूंनी उन्हापासून संरक्षणासाठी तुराट्यांचा कूड लावावा.

नवीन बागेसाठी शक्यतो ठिबक करून घ्यावे. शक्य नसल्यास वय १ ते ३ वर्षे असलेल्या नवीन कलमांच्या जवळ छोटा सच्छिद्र पाण्याचा माठ अर्धा जमिनीत गाडून नियमित पाण्याची सोय करता येते. त्यात पाणी भरले की ठिबकत राहते. त्यामुळे सामान्यतः आठवडाभर मुळांच्या परिसरात ओलावा राहतो. या जोड आच्छादनाची असल्यास बाष्पीभवन पण अधिक होत नाही.

उन्हामुळे बाष्पीभवन व पर्णोत्सर्जनाचा वेग अधिक असतो. रोपांची पाने लवकर कोमेजतात. अशा वेळी पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे २० ते २५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. यामुळे पानांतील पर्णोत्सर्जनाचा वेग कमी होतो.

Citrus Crop
Citrus fruit Crop Management : सद्यःस्थितीतील लिंबूवर्गीय फळपिकांचे संरक्षण

विकसित मोठे झाडे व बागेचे नियोजन

पाण्याची कमतरता असणाऱ्या फळबागांमध्ये उन्हाळी हंगामात सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किंवा काळ्या रंगाच्या पॉलिथिन पेपरचे (१०० मायक्रॉन) आच्छादन केल्यास झाडाजवळ ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

या आच्छादनामुळे सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे तणाची वाढ होत नाही. जमिनीचा ओलावा व तापमान नियंत्रित राहून जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थाच्या कुजण्यातून उत्कृष्ट सेंद्रिय खत मिळते. आच्छादनामुळे उन्हाळ्यात पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढविता येते.

आच्छादनाचा वापर करताना सोबतच प्रति झाड २-३ किलो गांडूळ खत द्यावे. सेंद्रिय खतांचा वापर अधिक केल्यास जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्यास आंबिया बहर न घेता मृग बहराचे नियोजन करावे. मृग बहराकरिता पावसाळ्यात पावसाचे पाणी मिळते. थोड्या फार प्रमाणात ओलित व्यवस्थापनावर बहर घेता येतो.

हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही भारी जमिनीपेक्षा कमी असते. अशा जमिनीला वरचेवर पाणी द्यावे लागते. भारी जमिनीतील बागेला पाणी देण्याच्या पाळ्यांतील अंतर जास्त असले तरी चालते.

Citrus Crop
Citrus Crops : लिंबूवर्गीय पिकांचे व्हावे मूल्यवर्धन

सिंचनासाठी शक्यतो ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावी. यात पाणी व विद्राव्य खते मोजून देता येतात. पाण्यामध्ये ४० ते ५० टक्के आणि खतामध्ये ३० टक्क्यांपर्यंत बचत होते. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन करताना दररोजच्या बाष्पोत्सर्जनाच्या ८० टक्के पाणी द्यावे. यामुळे ४० टक्क्यांपर्यंत पाणी वाचते.

उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन खोडावरील साली तडकण्याचे प्रमाण वाढू शकते. खोडांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुरुवातीस खोडाला एक ते दीड मीटर उंचीपर्यंत बोर्डो मिश्रण लावावे. यामुळे सूर्यकिरण परावर्तित होऊन खोडाचे तापमान कमी राहते. तसेच बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणालाही मदत होते.

उष्णतेमुळे पर्णोत्सर्जन वाढते. झाडातील पाणी कमी होत असल्यामुळे झाडे निस्तेज व मलूल पडतात. अशा वेळेस फळझाडांवर बाष्परोधक केओलीन (२ टक्के तीव्रतेची) किंवा पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) (१ टक्का तीव्रतेची) फवारणी करावी. केओलीनची फवारणी हलके ओलित केल्यानंतर करावी.

ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, त्यांनी आंबिया बहर धरलेला असेल. या बहराची फळे टिकवून ठेवण्यासाठी ओलित सुरू ठेवावे. ठिबक सिंचन असल्यास १० वर्षांवरील संत्रा व मोसंबीच्या झाडांना १६० ते १९८ लिटर, तर लिंबू झाडांना १४४ ते १७८ लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड द्यावे.

ठिबक सिंचन नसल्यास, दांडाने ७ ते ८ दिवसांनी पाणीपुरवठा करावा. झाडाच्या ओळींमध्ये दोन्ही बाजूला दांड ओढावेत. त्यात आळीपाळीने पाणी सोडावे किंवा अर्ध आळे पद्धतीने आळीपाळीने पाणी द्यावे.

बागेत आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीलगत स्प्रिंकलर चालू ठेवावेत.

पाण्याचे खूपच दुर्भिक्ष असल्यास विकसित झाडाच्या मुख्य खोडाच्या ४ ते ५ फूट दूर चारही बाजूने २ ते ३ फूट खोल व १ फूट रुंद व्यासाचे खड्डे करावेत. त्यात पाणी भरावे. चारही बाजूंनी सावकाश पाणी उपलब्ध होत राहिल्याने झाड तग धरू शकते.

तापमान वाढ व उष्ण वाऱ्यामुळे लिंबूवर्गीय फळबागेमध्ये फळांची गळ संभवते. फळगळ नियंत्रणाकरिता २-४-डी* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा जिबरेलिक ॲसिड* १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) अधिक युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

फळांचा आकार वाढावा, या करिता जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम (१५ पीपीएम)+ पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) १ किलो प्रति १०० लिटर पाणी किंवा जिबरेलिक ॲसिड १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) + पोटॅशिअम नायट्रेट (१३:०:४५) ८०० ग्रॅम अधिक मोनो-पोटॅशिअम फॉस्फेट (०:५२:३४) ५०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी यांची फवारणी करावी.

चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

काळे डाग पडून लहान फळे गळत असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड* ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी ही फवारणी उपयुक्त ठरेल.

आंबिया बहरातील फळझाडांना नत्राची अर्धी मात्रा दिलेली नसल्यास त्वरित द्यावी.

संत्रा व लिंबू बागांमध्ये मृग बहर घ्यावयाचा असल्यास, झाडे मे महिन्यात ताणावर सोडावी. झाडाला ताण जमिनीच्या मगदुरानुसार ३० ते ५० दिवसांकरिता द्यावा.

(* लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस)

- डॉ. योगेश इंगळे, ९४२२७६६४३७

- डॉ. दिनेश पैठणकर, ९८८१०२१२२२

(भारतीय समन्वित फळे संशोधन प्रकल्प, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com