Rabbi Fodder Crops  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Fodder Crops : रब्बी हंगामातील चारा पिकांचे नियोजन

Rabbi Season : रब्बी हंगामामध्ये ज्वारी, मका, ओट ही एकदल चारा पिके आणि लसूण घास, बरसीम या द्विदल चारा पिकांची लागवड करावी.

Team Agrowon

डॉ. शिवाजी दमामे, डॉ. संदीप लांडगे
Fodder Crops : रब्बी हंगामामध्ये ज्वारी, मका, ओट ही एकदल चारा पिके आणि लसूण घास, बरसीम या द्विदल चारा पिकांची लागवड करावी. सुधारित जातींची निवड आणि लागवड नियोजनातून अधिक पोषणमूल्य असणारा सकस चाऱ्याचे उत्पादन शक्य आहे.

ज्वारी ः
१) अर्वषणप्रवण भागात हलक्या जमिनीत तग धरून राहण्याची क्षमता असल्याने निश्‍चित चारा उत्पादन देणारे पीक आहे. ज्वारीचा कडबादेखील जनावरांना खाद्य म्हणून देता येतो. या चाऱ्यात ८ ते १० टक्के प्रथिने असतात.
२) पूर्वमशागतीच्या वेळी शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. ऑक्टोबर महिन्यात पेरणी करावी.


३) रुचिरा, फुले गोधन, फुले अमृता, मालदांडी ३५-१, या जातींची ३० सेंमी अंतरावर पाभरीने पेरणी करावी. पेरणीपूर्वी प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे लागते.
४) हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. त्यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित ५० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.


५) १० ते १२ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
६) पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी) असताना कापणी करावी.
हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ५५० क्विंटल उत्पादन मिळते.

मका ः
१) हे जलद वाढणारे, पालेदार, सकस, रुचकर, अधिक उत्पादनक्षम, पौष्टिक तसेच भरपूर शर्करायुक्त पदार्थ असणारे चारा पीक आहे. या चाऱ्यापासून उत्तम दर्जाचा मुरघास तयार करता येतो. हिरव्या चाऱ्यात ९ ते ११ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
२) लागवडीसाठी सुपीक, निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन निवडावी. पुर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत द्यावे.


३) लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय आदी जातींची निवड करावी. पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. प्रति दहा किलो बियाणास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाची बीजप्रकिया करावी.
४) ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांत पाभरीने ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी.
५) प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश पेरणीच्यावेळी व उर्वरित ५० किलो नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा.


६) लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी पिकांचे नियमित सर्वेक्षण करावे. या किडीचा पतंग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे, कामगंध सापळ्यांचा वापर करावा. नियंत्रणासाठी अझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) ३० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
७) कापणी साधारणपणे पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी) असताना करावी.
८) हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन मिळते.

ओेट ः
१) हे भरपूर फुटवे असणारे एकदलवर्गीय चारा पीक आहे. ओट पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर आणि पौष्टिक असतो. खोड रसाळ, लुसलुशीत असते. चाऱ्यात ९ ते १० टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
२) पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत शेणखत, कंपोस्ट खत मिसळावे. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात दोन ओळींत ३० सेंमी अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी.
३) पेरणीसाठी फुले हरिता (बहू कापणीसाठी), फुले सुरभी किंवा केंट (एक कापणीसाठी) या सुधारित जातींचे हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर या जिवाणू सवंर्धकाची बीजप्रकिया करावी.


४) हेक्टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. यापैकी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी, तर उर्वरित ४० किलो नत्र पेरणीनंतर २५ दिवसांनी व ४० किलो नत्र पहिल्या कापणीनंतर प्रति हेक्टरी द्यावे.
५) पहिली कापणी ५० दिवसांत, दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ३५ दिवसांनी किंवा ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना करावी. दोन कापण्या घेताना पहिली कापणी जमिनीपासून १० सेंमी उंचीवर करावी.
दोन कापण्यांद्वारे हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन मिळते.

लसूणघास ः
१) हे द्विदलवर्गीय बहुवार्षिक चारा पीक असून हिरव्या चाऱ्यात प्रथिने, अ व ड जीवनसत्त्वे इत्यादी घटकांचे पुरेसे प्रमाण असते. हिरव्या चाऱ्यात १९ ते २२ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
२) हे पीक तीन वर्षांपर्यंत टिकणारे असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करावी. लागवडीपूर्वी जमिनीत शेणखत मिसळावे.


३) पेरणीसाठी खात्रीशीर, शुद्ध व जातिवंत बियाणे वापरावे. बऱ्याच वेळा बियाण्यामध्ये अमरवेल या परोपजीवी वनस्पतींच्या बियाण्याचा समावेश असण्याचा संभव असतो. त्यामुळे खात्रीशीर स्रोताकडूनच बियाणे खरेदी करावे.
४) पेरणीसाठी आर.एल. ८८, आनंद -३ या सुधारित जातींचे प्रति हेक्टरी २५ किलो बियाणे वापरावे. प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

५) पाणी समप्रमाणात देता येईल असे वाफे तयार करावेत. ३० सेंमी अंतरावर काकऱ्या पाडून त्यामध्ये हेक्टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. त्यानंतर अशा काकऱ्यामध्ये चिमटीने बी पेरून हाताने काकऱ्या बुजवून घ्याव्यात.
६) शेतकरी अनेकदा बी फोकून पेरणी करतात, परंतु ओळीत बियाणे पेरणी केल्यास खते देणे सोईचे होते. हात कोळप्याचा वापर करून आंतरमशागतीच्या खर्चात बचत होते. प्रत्येक चारा कापण्यानंतर २० किलो नत्र व ५० किलो स्फुरद (किंवा १०० किलो डीएपी) प्रति हेक्टरी द्यावे.


७) माव्याच्या नियंत्रणासाठी मेटाऱ्हाझियम अॅनीसोप्ली किंवा व्हर्टिसिलिअम लेकानी ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फुले व शेंगा खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येताच एचएएनपीव्ही. (फुले हेलीओकील) हेक्टरी १० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळी फवारणी करावी.

बरसीम
१) हे द्विदलवर्गीय चारा पीक आहे. हिवाळ्यात थंडीची कालावधी वाढल्यास अधिक कापण्या होतात. हिरव्या चाऱ्यात १७ ते १९ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
२) जमिनीची मशागत करून शेणखत मिसळावे. लागवडीसाठी वरदान आणि मेस्कावी या सुधारित जातींचे प्रति हेक्टरी ३० किलो बियाणे वापरावे. प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रकिया करावी.


३) या पिकास नत्र कमी तर स्फुरद जास्त लागते. हेक्टरी २० किलो नत्र, ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे.
४) पहिली कापणी पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी आणि नंतरच्या कापण्या २१ ते २५ दिवसांनी कराव्यात. कापणीपूर्वी ४ ते ५ दिवस आगोदर पाण्याची पाळी येईल असे नियोजन केल्यास चाऱ्याचे भरपूर उत्पादन मिळते.
५) ३ ते ४ कापण्यांद्वारे हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ६०० ते ८०० क्विंटल उत्पादन मिळते.


संपर्क ः डॉ. शिवाजी दमामे, ८२७५५९२२६२
(आखिल भारतीय समन्वयित चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT